Pooja Khedkar UPSC : यू.पी.एस्.सी.ने पूजा खेडकर यांची उमेदवारी रहित केली !

केंद्रशासनाच्या ‘कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागा’कडून ‘कारणे दाखवा नोटीस’ !

पूजा खेडकर

पुणे – वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी ‘यू.पी.एस्.सी.’ने (केंद्रीय लोकसेवा आयोगाने) (UPSC) रहित केली आहे. त्यांना यापुढे आयोगाकडून घेण्यात येणार्‍या कोणत्याही परीक्षेस बसता येणार नाही. तसेच पूजा खेडकर यांना केंद्रशासनाच्या ‘कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागा’कडून ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली आहे. खेडकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांविषयी त्यांनी २ ऑगस्टपर्यंत समक्ष येऊन लेखी खुलासा करावा, असे आदेश खेडकर यांना देण्यात आले आहेत.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी असतांना खेडकर यांनी खासगी गाडीला अंबर दिवा लावला, तसेच गाडीवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली. बैठकीसाठी स्वतंत्र दालन घेतले, अशा स्वरूपाच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे केल्या होत्या. या प्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांनी राज्यशासनाकडे पाठवला. त्यातून खेडकर यांच्यावर असलेल्या आरोपांविषयी त्यांनी समक्ष येऊन लेखी खुलासा करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.