अवतारी कार्य करण्यासाठी स्थूलदेहाची आवश्यकता असल्यामुळे ईश्वर अंशावतार घेऊन पृथ्वीवर जन्म घेत असणे आणि त्याच्यासह साधकही पुनःपुन्हा जन्म घेत असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना सप्तर्षींना एक प्रश्न विचारायला सांगितला होता. त्याचे महर्षींनी दिलेले उत्तर, त्यावर गुरुदेवांनी व्यक्त केलेले विचार आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे मनोगत पुढे दिले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी महर्षींना विचारायला सांगितलेला प्रश्न

‘एकदा गुरुदेवांनी मला सप्तर्षींना विचारायला सांगितले, ‘‘महर्षि सूक्ष्मातून कार्य करू शकतात, तसे आम्ही का करू शकत नाही ? माझी प्राणशक्ती एवढी अल्प असतांना महर्षि मला वाचवण्यासाठी एवढे आटोकाट प्रयत्न का करत आहेत ?’’

२. महर्षींनी दिलेले उत्तर

२ अ. मनुष्याला प्रत्यक्ष कृती, बोलणे आणि वागणे यांतून शिकवण्यासाठी स्थूलदेहाची आवश्यकता असणे : ‘अवतारी कार्य करण्यासाठी स्थूलदेहाची आवश्यकता असते, तरच लोकांना देवाचे कार्य कळते. मनुष्याला प्रत्यक्ष आपली कृती, बोलणे आणि वागणे यांतून शिकवण्यासाठी स्थूलदेहाची आवश्यकता असते. यालाच ‘अवतारी लीला’ असे म्हणतात.

२ आ. महर्षींचे कार्य पूर्णतः सूक्ष्मातील असून ‘अवतारांच्या कार्याविषयी लोकांना मार्गदर्शन करणे, अवतारांची ओळख जनसामान्यांना करवून देणे आणि ज्ञानदानाचे कार्य करणे’, असे असणे : आम्हा महर्षींचे कार्य वेगळे आहे. ‘अवतारांच्या कार्याविषयी लोकांना मार्गदर्शन करणे आणि अवतारांची ओळख जनसामान्यांना करवून देणे’, यासाठीच आम्ही एवढे ज्ञान सिद्धांच्या माध्यमातून नाडीपट्टीत लिहून ठेवले आहे. आमचे कार्य पूर्णपणे सूक्ष्मातील आहे. आम्ही केवळ ज्ञानदानाचे कार्य करत आहोत.

३. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे महर्षींच्या उत्तरावरील भाष्य !

३ अ. श्रीराम आणि श्रीकृष्ण पूर्णावतार असल्यामुळे त्यांचा देह तेजतत्त्वाचा असणे, त्यांना मनुष्यासारखे भोग नसणे; मात्र अंशावतारांच्या देहात पृथ्वी अन् आप या तत्त्वांचे प्रमाण अधिक असल्याने त्यांना देहभोग भोगावे लागणे : मी महर्षींचे उत्तर गुरुदेवांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘बरोबर आहे. श्रीराम आणि श्रीकृष्ण हे पूर्णावतार होते. ते १०० टक्के अवतार होते. त्यांचा जन्मच तेजतत्त्वापासून झाला असल्याने त्यांचा रंग निळा होता. आपण अंशावतार आहोत. आपल्यात पृथ्वी आणि आप या तत्त्वांचे प्रमाण अधिक असल्याने आपण मनुष्यासारखे आजारी पडतो अन् जन्म-मृत्यूच्या चक्रांत फिरत रहातो.’’

४. पूर्णावतार एका युगात एकदाच जन्म घेत असणे; परंतु अंशावतारांना ईश्वराच्या इच्छेप्रमाणे पुनःपुन्हा मानवी भोगासहित जन्माला यावे लागणे

ते पुढे म्हणाले, ‘‘पूर्णावतारांना मनुष्यासारखे भोग नसतात; परंतु अंशावतारांना देहभोग असतात. १०० टक्के देवतातत्त्व असणारे पूर्णावतार एका युगात एकदाच जन्म घेतात; परंतु अंशावतारांना ईश्वराच्या इच्छेप्रमाणे पुनःपुन्हा मानवी भोगांसहित जन्माला यावे लागते. महर्षि म्हणतात, ‘गुरुदेव, काही काळाने तुम्हाला पृथ्वीवर कार्य करण्यासाठी पुन्हा जन्माला यावे लागणार आहे.’

– (श्रीचित्‌शक्ति) सौ. अंजली गाडगीळ, कोळ्ळीमलई, तमिळनाडू. (१४.१.२०२१)

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी व्यक्त केलेले भावस्पर्शी मनोगत !

श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

‘अंशावताराने साधकांसाठी पुन्हा जन्म घेणे स्वीकारले आहे, तर साधकही त्यांच्यासह पुनःपुन्हा जन्म घेणे आनंदाने स्वीकारणार असणे : अवतार कधीही एकटा जन्माला येत नाही, तर त्याच्या व्यूहासह येतो. यानुसार आम्ही साधकही गुरुदेवांनी जन्म घेतल्यानंतर या ब्रह्मांडाच्या चक्रात पुन्हा जन्म घेणार, यात शंका नाही. ईश्वरेच्छेने वागणे, म्हणजे खरा मोक्ष असल्याने त्याचेही आम्हाला काही वाटणार नाही. जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत अडकणे, हे जर ईश्वराने आमच्यासाठी स्वीकारले आहे, तर ते आम्हीही आनंदाने स्वीकारू.’
– (श्रीचित्‌शक्ति) सौ. अंजली गाडगीळ, कोळ्ळीमलई, तमिळनाडू. (१४.१.२०२१)