वर्ष २०२१ मधील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘गुरुपौर्णिमा’ विशेषांकातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर साधकांना जाणवलेली सूत्रे !

‘२३.७.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गुरुपौर्णिमा विशेषांकाच्या मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र आवृत्तीत पृष्ठ क्र. ३ वर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्र छापण्यात आले होते. त्या छायाचित्राखाली ‘या छायाचित्रातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांची त्वचा, डोळे आणि चेहर्‍यावरील भाव पहा. यांतून ‘त्यांचे वय किंवा अन्य काही गोष्टी यांविषयी काही वैशिष्ट्यपूर्ण जाणवते का ?’, याचा अभ्यास करा’, असे लिहिले होते. त्या छायाचित्राकडे पाहिल्यावर जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

२३.७.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गुरुपौर्णिमा विशेषांकात प्रसिद्ध झालेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र

३.७.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गुरुपौर्णिमा विशेषांकात प्रसिद्ध झालेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर काही क्षणांतच निर्गुणावस्था अनुभवणे आणि ‘त्यांच्यातील निर्गुण तत्त्वात मोठ्या प्रमाणात वृद्धी झाली असल्याने ते समवयस्कांच्या तुलनेत तरुण दिसत आहेत’, असे जाणवणे

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर काही सेकंदांतच निर्गुणावस्था अनुभवता येणे आणि त्या अवस्थेतून बाहेर आल्यावरही बराच काळ आनंदावस्था अनुभवणे

श्री. निषाद देशमुख

‘मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहू लागल्यावर काही सेकंदांतच माझे मन निर्विचार झाले. त्यानंतर मला जवळपासचे वातावरण आणि वेळ यांचे भान राहिले नाही. कधी व्यक्ती ध्यानावस्थेत असतांनाही तिला काही प्रमाणात स्वतःची जाणीव असते; मात्र मला या स्थितीत तसे काही जाणवत नव्हते. ‘ही निर्गुणावस्था असावी’, असे मला वाटले. त्या स्थितीतून बाहेर आल्यावरही मला बराच काळ आनंद जाणवत होता. निर्गुण तत्त्वामुळे स्थळ (स्वत:) आणि काळ (वेळ) यांचे विस्मरण होते. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रातून मोठ्या प्रमाणात निर्गुण तत्त्व प्रक्षेपित होऊन त्याचा परिणाम छायाचित्र बघणार्‍या व्यक्तीवर होऊन ती व्यक्तीही निर्गुणात जाते’, असे मला जाणवले.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील निर्गुण तत्त्वात पुष्कळ वृद्धी झाल्याने त्यांच्या देहावर काळाचा अल्प परिणाम होऊन ते समवयस्क लोकांच्या तुलनेत तरुण दिसत असणे

त्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पृष्ठ क्र. ९ वर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहावर समवयस्क वृद्ध व्यक्तींच्या तुलनेत अल्प सुरकुत्या पडतात आणि ते तरुण दिसतात’, असे त्यांचे वैशिष्ट्य सांगण्यात आले आहे. ते सूत्र वाचून माझ्या मनात विचार आले, ‘विश्वातील सर्व वस्तू आणि व्यक्ती मायेत, म्हणजे सगुणात असल्याने त्यांच्यावर काळाचा परिणाम होतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील निर्गुणतत्त्वात पुष्कळ मोठ्या प्रमाणात वृद्धी झाली आहे. यामुळे त्यांच्या देहावर काळाचा अल्प प्रमाणात परिणाम होतो किंवा होत नाही. त्यामुळे अन्य वृद्ध व्यक्तींप्रमाणे त्यांच्या चेहर्‍यावर सुरकुत्या पडत नाहीत आणि त्यांचे वय झाले असूनही इतरांच्या तुलनेत ते अधिक तरुण अन् उत्साही दिसतात.’

– श्री. निषाद देशमुख (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.७.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक