Ayodhya Ram Mandir : अयोध्येत देशातील सर्वांत मोठा धनुष्यबाण बसवणार !

३ सहस्र ९०० किलोची गदाही बसवण्याचा निर्णय

देशातील सर्वांत लांब धनुष्यबाण

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – अयोध्येत देशातील सर्वांत लांब धनुष्यबाण बसवण्यात येणार आहे. या धनुष्यबाणाची लांबी ३३ फूट आणि वजन ३ सहस्र ४०० किलो आहे.  धनुष्यबाणासमवेत ३ सहस्र ९०० किलो वजनाची गदाही असेल. हा धनुष्यबाण आणि गदा नेमकी कुठे बसवण्यात येणार आहे ?, हे अद्याप ठरलेले नाही. गदा, धनुष्य आणि बाण हे पंच धातूपासून बनवले आहेत. हे राजस्थानमधील शिवगंज, सुमेरपूर येथील ‘श्रीजी सनातन सेवा संस्थे’ने ते बनवले आहेत. तेथून ते अयोध्येत आणण्यात येणार आहे.

१. ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, धनुष्यबाण आणि गदा कारसेवकपूरम्मध्ये ठेवण्यात येईल, त्यानंतर ते कुठे बसवायचे ?, याचा निर्णय घेतला जाईल.

२. यापूर्वी राजस्थानमधील भिलवाडा येथे १७ फूट लांब आणि ९०० किलो वजनाचा धनुष्य बसवण्यात आला आहे, तर इंदूरमधील पितृ पर्वतावर देशातील सर्वांत वजनदार अन् सर्वांत लांब गदा बसवण्यात आली आहे. तिचे वजन २१ टन आणि लांबी ४५ फूट आहे.

३. दुसरीकडे अलीगडहून ४०० किलो कुलूप अयोध्येला आणण्यात आले आहे. १० फूट लांब आणि ४ फूट रुंद असलेल्या या कुलुपाची जाडी ९.५ इंच आहे. त्याची ४ फूट लांब किल्ली ३० किलो वजनाची आहे. हे कुलूप सिद्ध करण्यासाठी अडीच लाख रुपये खर्च झाले. कुलुपांचा व्यवसाय करणारे श्री. सत्यप्रकाश यांची इच्छा होती की, श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी मंदिराला कुलूप भेट द्यावे; पण प्राणप्रतिष्ठा होण्याच्या ४१ दिवस आधी त्यांचा मृत्यू झाला.