पू. प्रा. सु.ग. शेवडे यांनी लेखन केलेली ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
‘दुसर्याची वस्तू ही आपली नाही. त्यामुळे ती आपण संमती न घेता उचलून आणणे, ही चोरी आहे. दारू पिणे निषिद्ध आहे. आई-वडिलांचा आदर करावा, मोठ्या माणसांचा मान राखावा, देव आपल्यावर नित्य लक्ष ठेवून असतो; म्हणून ‘त्याला आवडेल’, असेच वागावे. देवाला न आवडणारे कर्म म्हणजे पाप, तर परोपकार हे पुण्यकर्म आहे, कर्तव्य पार पाडणे, हे पुण्यकर्म नाही. ते आवश्यक कर्म आहे’, या विचारांना आदर्श मानणे, सहस्रो वर्षांपासून आदर्श मानत रहाणे, हे भारतीय संस्कृतीचे लक्षण आहे.
It is better to light a candle than curse the darkness (म्हणजेच अंधार अंधार म्हणून रडत रहाण्यापेक्षा निदान एक तरी दिवा प्रथम लावावा, हे बरे) या विचाराने ‘भारतीय संस्कृती’ हे छोटेसे पुस्तक आमच्या नव्या पिढीला भारतीय संस्कृतीची तोंडओळख व्हावी; म्हणूनच लिहून प्रकाशित करत आहोत. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भारतीय संस्कृतीतील व्यक्तीजीवन आणि विविध प्रकारची बंधने अन् प्रकार’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(लेखांक ३)
लेखांक २. वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/803582.html
४. चतुर्विध आश्रम
भारतीय संस्कृतीनुसार प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाच्या ४ अवस्था आहेत. या ४ अवस्था, म्हणजेच ४ आश्रम – ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. हे ते आश्रम होते. भारतीय समाज या अवस्थांच्या पालनाला सदाचार म्हणतो. भारतीय मनोवृतीला या आश्रमांच्या मर्यादा मोडणे मान्य नाही.
एखाद्या माणसाने लग्न केलेले नाही; पण त्याचे विवाहबाह्य संबंध असतील, तर त्याला कुणी ब्रह्मचारी म्हणणार नाही. त्याचे तसे वागणे लोकांना रूचणार नाही. ‘त्यापेक्षा सरळ लग्न का करत नाही ?’, असेच बाकीचे लोक म्हणतील, म्हणजे ब्रह्मचारी हा खरा ब्रह्मचारी हवा. यथाकाळी विवाह व्हायला हवा. वय मोठे झाले आणि लग्न झालेले नसेल, तर तेही लोकांना बरे वाटत नाही. सामान्यपणे पंचविशीच्या आत पुरुषाचे लग्न व्हायला हवे.
४ अ. ब्रह्मचर्याश्रम : ब्रह्मचारी हा लग्न झाल्यावर गृहस्थ होतो.
४ आ. गृहस्थाश्रम : गृहस्थाची पत्नी ही गृहिणी असते. उभयतांनी कौटुंबिक दायित्व पार पाडायचे असते. त्यांना मुलेबाळे होऊन ती मोठी होतात, तेव्हा त्यांचे आई-वडील वृद्ध होतात. पती-पत्नीचे पवित्र नाते हा गृहस्थाश्रमाचा प्राण आहे. वैवाहिक बंधन हे संपूर्ण आयुष्यासाठी असते. विवाहविच्छेद हा अनेक समस्यांना जन्म देतो; म्हणून भारतीय संस्कृती विवाहविच्छेदाला मान्यता देत नाही. पटत नाही, मग कसे एकत्र रहायचे ? प्रश्न ठीक आहे; पण विच्छेदाचा मार्ग मोकळा झाल्यावर पटवून घेण्याची वृत्ती न्यून होते; म्हणून विवाहविच्छेद किंवा पुनर्विवाह या गोष्टींना भारतीय संस्कृतीत प्रतिष्ठा नाही.
४ इ. वानप्रस्थाश्रम : मुलांची लग्ने झाल्यावर वृद्धांनी कौटुंबिक गोष्टींत लक्ष घालू नये. त्यांना त्यांचा संसार अलिप्तपणे चालवू द्यावा. पूर्वी वार्धक्यात लोक वनात प्रस्थान ठेवत असत. वनातील आश्रमात रहात; म्हणून या कालखंडाला ‘वानप्रस्थाश्रम’ म्हणतात. सर्वांनीच वनात जायला हवे, असे नाही; पण ज्यात त्यात डोके न घालता स्वस्थपणे हरिनाम घ्यावे, हा या आश्रमाचा उद्देश आहे. यात विरक्ती महत्त्वाची आहे. यौवनात विषयोपभोगांना स्थान आहे. वार्धक्यात नाही.
४ ई. संन्यासाश्रम : याच्याच पुढची पूर्ण विरक्त स्थिती म्हणजे संन्यास. संन्यास सर्वांनाच अभिप्रेत नाही; पण वार्धक्याचा काळ पूर्ण विरक्त स्थितीत राहून विषयमुक्त रहाणे, म्हणजे संन्यास. जगण्यासाठीची उपचाराचीही विशेष धडपड न करता मृत्यूला सामोरे जाणे, हे या आश्रमाचे कार्य आहे. होईल ती ईश्वराची, समाजाची आणि धर्माची सेवा करावी, तीही निरपेक्षपणे करावी. तरुणींच्या खांद्यावर हात ठेवून चालणारा संन्यासी भारतीय समाजाला मान्य होत नाही.
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
– भारताचार्य, धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)
लेखांक ४. वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/804112.html