भारतीय संस्कृतीतील कुटुंबजीवन !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांनी लेखन केलेली ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !

प्रकरण २ – (लेखांक ४)

लेखांक ३. वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/803954.html

१. विवाह आणि जन्म-मृत्यू हे कुटुंबात येण्या-जाण्याचे मार्ग !

‘भारतीय समाजातील प्रत्येक व्यक्ती ही कुटुंबातील अविभाज्य घटक आहे. या कुटुंबात नवनव्या व्यक्ती येत असतात. जुन्या जातात. प्रत्येकाचे जाण्याचे आणि येण्याचे मार्ग ठरलेले आहेत.

अ. आपल्या मुलाचे लग्न झाले की, नवीन सून घरात येते. या नव्या दांपत्याला यथावकाश मुले होतात.

आ. ही मुले कुटुंबाचे नवे सदस्य असतात, म्हणजेच विवाह आणि जन्म हे कुटुंबात येण्याचे मार्ग !

मुलीचे लग्न झाले. ती आपल्या घरातून जाते. कुणाचा मृत्यू होतो, तेही कुटुंबातून जातात, म्हणजे पुन्हा विवाह आणि मृत्यू हे जाण्याचे मार्ग आहेत. मृत्यूमुळे एक विषय संपतो, तसा तो मुलीच्या लग्नाने संपत नाही. ती ज्या घरात जाईल, त्या घरात ती पूर्णपणे एकरूप होणे महत्त्वाचे आहे. एकदा ती तेथे रुजली, रमली, म्हणजे तो विषय संपतो. अन्यथा एका नव्या उपाधीचा आरंभ होऊ शकतो.

मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी आणि कुटुंबाची चांगली जडणघडण होण्यासाठी एकत्र कुटुंबपद्धत अपरिहार्य !

भारताचार्य, धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे

‘दुसर्‍याची वस्तू ही आपली नाही. त्यामुळे ती आपण संमती न घेता उचलून आणणे, ही चोरी आहे. दारू पिणे निषिद्ध आहे. आई-वडिलांचा आदर करावा, मोठ्या माणसांचा मान राखावा, देव आपल्यावर नित्य लक्ष ठेवून असतो; म्हणून ‘त्याला आवडेल’, असेच वागावे. देवाला न आवडणारे कर्म म्हणजे पाप, तर परोपकार हे पुण्यकर्म आहे, कर्तव्य पार पाडणे, हे पुण्यकर्म नाही. ते आवश्यक कर्म आहे’, या विचारांना आदर्श मानणे, सहस्रो वर्षांपासून आदर्श मानत रहाणे, हे भारतीय संस्कृतीचे लक्षण आहे.

It is better to light a candle than curse the darkness (म्हणजेच अंधार अंधार म्हणून रडत रहाण्यापेक्षा निदान एक तरी दिवा प्रथम लावावा, हे बरे) या विचाराने ‘भारतीय संस्कृती’ हे छोटेसे पुस्तक आमच्या नव्या पिढीला भारतीय संस्कृतीची तोंडओळख व्हावी; म्हणूनच लिहून प्रकाशित करत आहोत. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भारतीय संस्कृतीतील व्यक्तीजीवन आणि विविध प्रकारची बंधने अन् प्रकार, चतुर्विध आश्रम’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

२. कुटुंबाचे संवर्धन करतांना कोणती काळजी घ्यावी ?

कुटुंबात येणारी नवी अपत्ये त्या घराची परंपरा, संस्कार, भाषा, वृत्ती या सर्व दृष्टींनी कुटुंबाचे संवर्धन करणारी व्हायला हवी असतील, तर त्यात अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे आपल्या सुनेची निवड, तिच्या माहेरचा वंश, घराणे, प्रतिष्ठा, सांपत्तिक स्थिती इत्यादी नीट पारखून घ्यायला हवी. स्त्री हे क्षेत्र आहे. पुरुष हे बीज आहे. सुक्षेत्री शुद्ध बिजापासून उत्तम अंकुर फुटतात; पण त्यानंतर खतपाणी हेही महत्त्वाचे असते; म्हणून त्या मुलांवर चांगले संस्कार करणे अत्यावश्यक असते. अशा प्रकारे कुटुंबाची जडणघडण होत असते.

३. कुटुंब हा भूतलावरील स्वर्ग होण्यासाठी परस्परांशी सौहार्दपूर्ण आणि जिव्हाळ्याचे संबंध असावेत !

आपले आई-वडील, आपण, आपली पत्नी आणि मुले मिळून एक सुंदर संच सिद्ध होतो. सर्व मंडळींनी आपापली कर्तव्ये व्यवस्थित पार पाडली आणि आपल्या मर्यादा सांभाळून वागले, तर ते घर भूतलावरील स्वर्ग होईल. स्वर्ग बनण्यासाठी संपत्ती हेच सर्वस्व नाही, तर तो आवश्यक भाग आहेच; पण कुटुंबातील घटकांचे परस्परांशी सौहार्दपूर्ण आणि जिव्हाळ्याचे संबंध हाच कौटुंबिक सौख्याचा प्राण आहे.

४. घर नव्हे, अरण्य ते कोणते ?

एक संस्कृत कवी म्हणतो –

यत्र नास्ति दधिमन्थनघोषो यत्र नो लघुलघूनि शिशूनि ।
यत्र नास्ति गुरुगौरवपूजा तानि किं बत गृहाणि वनानि ।।

अर्थ : जेथे दही घुसळल्याचा आवाज येत नाही, जेथे छोटी छोटी बालके नाहीत, जेथे वडील मंडळींच्या वडीलपणाचा आदर नाही, ती कसली आली आहेत घरे ? ती तर अरण्ये होत !

५. सर्वांना सामावून घेणार्‍या एकत्र कुटुंबपद्धतीचे लाभ

भारतात एकत्र कुटुंबपद्धत होती. अजूनही काही ठिकाणी ती आहे. मोठमोठी घरे. बाजूला ऐसपैस बागबगीचा आगर, जवळच ५-५० गुरांचा गोठा. कामाला ४ गडी, मोलकरणी. घरात वृद्ध आई-वडिलांसह रहाणारे ४-५ पुत्र आणि त्यांचे परिवार, अशी ५-२५ मंडळी एकत्र, एकाच ठिकाणी रहात. त्यातच एखादा अविवाहित काका, एखादी अविवाहित किंवा विधवा आत्या. एखादा अशक्त किंवा अपंग किंवा रुग्ण असलेला भाऊ किंवा बहीण. सर्व भावांच्या मुलांपैकी एखादे अपंग किंवा मतीमंद अपत्य. असा मोठा रामरगाडा असायचा; पण सगळी मंडळी एकमेकांचा आदर करून आणि मर्यादा सांभाळून वागायची. कधी भांड्याला भांडे लागायचे; पण त्यातून वैर निर्माण व्हायचे नाही.

अशा कुटुंबात अनुत्पादक व्यक्तीलाही स्थान होते. प्रत्येक माणूस जन्मभर कमावणारा नसतो. कित्येक माणसे कधीच कमावती नसतात; पण म्हणून काही ती कुटुंबाबाहेर फेकली जात नसत. त्यांनासुद्धा घरात सन्मान्य वागणूक मिळायची. माझ्या माहितीतील एका कुटुंबात एक पांगळी मुलगी आहे. आता ती साठीची असेल. ती स्वतः उभी सुद्धा राहू शकत नाही, तरी सर्व आनंदी आहेत. एका घरात एक मतीमंद मुलगा होता; पण एकत्र कुटुंबामुळे तो कुणाला ओझे वाटत नव्हता.

५ अ. संरक्षण : एकत्र कुटुंबात प्रत्येक व्यक्तीला इतरांचे संरक्षण असते. पती-पत्नीत जरी भांडण झाले, तरी एक दुसर्‍यावर हात टाकू शकत नाही. त्या दृष्टीने संरक्षण असते.

६. विभक्त कुटुंबपद्धतीचे दुष्परिणाम !

विभक्त कुटुंबात अशा बालकांमुळे सारे कुटुंबच कष्टी असते आणि सचिंतही असते. ते मूल म्हणजे त्या कुटुंबाला शाप वाटते. सध्याच्या काळात पती-पत्नी दोघेही नोकरी करतात. असल्या मुलाला पाळणाघरातही कुणी घेत नाहीत. त्याला सांभाळायला कुणी बाई मिळत नाही. मिळाली तर अवाच्या सवा पैसे घेते. याखेरीज त्याला काहीच कळत नसल्याने ती त्याला कशी सांभाळत असेल, ते देवच जाणे !

एकत्र कुटुंबात जशा उफाळलेल्या भावनांना दाबून ठेवावे लागते, तशी आवश्यकता विभक्त कुटुंबांना वाटत नसल्याने काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रि‌पू घरात ठाण मांडून बसतात. पूर्णपणे स्वतंत्रता असल्यामुळे आणि इतर माणसांचा घरात अडसर नसल्यामुळे केव्हाही शृंगार, विलास, कामचेष्टा यांना बहर येऊ शकतो. अमर्याद कामोपभोगामुळे मनुष्याचे तेज, यौवन, सामर्थ्य लवकरच संपुष्टात येते. राग आल्यास पती-पत्नी मुक्तपणे भांडतात. कधी कधी एकमेकांवर हात टाकायलाही कमी करत नाहीत. क्रोधावर संयमाने मात करावी लागते. तो संयम सर्वांपाशी असतोच, असे नाही. एकत्र कुटुंबात इतर मंडळी भोवताली असल्यामुळे काम-क्रोधावर संयम ठेवावाच लागतो. काही स्त्रिया अत्यंत तोंडाळ असतात; पण त्यांनासुद्धा आपल्या वाणीवर मर्यादा घालावी लागते.

विभक्त कुटुंबात लज्जा, शालीनता, मर्यादा, संयम या सर्व गोष्टी सहज हद्दपार होऊ शकतात. विभक्त आधुनिक कुटुंबात मुलांचे लाडही नको तेवढे होतात आणि त्यांना मारझोडही पुष्कळ होते. आपल्या नातवंडाला पाठीशी घालणारी आजी तिथे नसते ना ?

६ अ. लोभामुळे उदारता नष्ट होते ! : लोभ हाही एक महारिपू आहे. समजा ४ भाऊ आहेत. एकाला १५ सहस्र रुपये वेतन आहे. बाकीच्या तिघांना प्रत्येकी ५ सहस्रांच्या आतच मासिक प्राप्ती आहे. एकत्र राहिल्यास चौघांची प्राप्ती एकत्र होऊन ३० सहस्र रुपये, सर्व १७-१८ माणसांच्या कुटुंबासाठी सामाईक ‍व्यय होतात, म्हणजे १५ सहस्र कमावून सुद्धा आपल्या वाटणीचा व्यय जेमतेम ६-७ सहस्र रुपयेच होतो. बाकीचे त्या सगळ्यांसाठी व्यय होतात. ‘आमचे पैसे आम्हीच, आमच्यासाठी का वापरू नयेत ?’, असा विचार लोभापायी उत्पन्न होतो. तर्कदृष्ट्या विचार चुकीचा नाही; पण मी दुसर्‍यांसाठी काही करणे लागतो, हा उदार विचार नाहीसा होतो.

६ आ. मोहाचे प्रकार ! : केवळ पैशांच्या विचाराने विभक्त झाले, तर एकत्रित रहाण्याचे लाभ मिळत नाहीत. अशा कुटुंबात मोहही अमर्याद असतो. एकेका स्त्रीकडे दोन-दोनशे साड्या असलेली कुटुंबे मी पाहिली आहेत. (कोण्या एका दाक्षिणात्य महिला नेत्याजवळ १४ सहस्र साड्या आहेत, असे वाचले होते.) हा मोह नव्हे तर काय ? वर्षावर्षाला गाड्या पालटणे, उच्च दर्जाची आणि भारी किमतीची शेकडो खेळणी मुलांसाठी आणून ठेवणे. भारी ‘इंटिरियर डेकोरेशन’ (अंतर्गत सजावट) करणे, उच्च दर्जाचे फर्निचर, भारी भारी उपभोगाची साधने, हिर्‍या-माणकांचे बहुमूल्य दागदागिने वारंवार खरेदी करणे इत्यादी. हे सर्व आवश्यकतेपेक्षा मोहाचेच प्रकार आहेत. त्याचा आस्वाद घेतांना आपले आई-वडील, भाऊ-बहीण यांच्या‍विषयीची कणव तर सोडाच; पण आठवणही नामशेष होते.

आज मी हे मिळवले, माझ्यासारखा श्रीमंत कोण आहे ? माझ्यासारखे ऐश्वर्य कुठे आहे ? ५-२५ रुपये दुसर्‍यांसाठी व्यय केले, तर माझ्यासारखा दाता कोण आहे ? असा मद उत्पन्न होतो आणि आपल्यापेक्षा श्रेष्ठ कुणी दिसले, तर मनोमन त्याच्याविषयी मत्सर वाटू लागतो.

(क्रमशः)

– भारताचार्य, धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.

(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)