चित्रकुट (मध्यप्रदेश) येथील वनवासी श्रीराममंदिराच्या पुजार्‍यांना ठार मारण्याची धमकी

  • मंदिर बळकावण्याचा भूमाफियांचा प्रयत्न !

  • पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा पुजार्‍यांचा आरोप

चित्रकुट (मध्यप्रदेश) – येथील नयागावमधील वनवासी श्रीराममंदिरात रहाणारे बाल मुकुंद आचार्य गुरु श्री शंकरन प्रपन्नाचार्यजी महाराज यांनी त्यांना ठार मारण्याची धमकी दिली जात असल्याची माहिती दिली आहे. हे श्रीराममंदिर हस्तांरित करण्यासाठी त्यांना ही धमकी दिली जात आहे. ‘२ जून या दिवशी माझ्यावर आक्रमण करून माझ्याकडील साहित्यही लुटून नेण्यात आले’, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणी तक्रार करूनही पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

बाल मुकुंद आचार्य यांचे म्हणणे आहे की,

१. यादव कुटुंबांनी ४० वर्षांपूर्वी हे मंदिर बांधून मला येथे पुजारी म्हणून नियुक्त केले होते. माझ्याकडे याची लेखी कागदपत्रे आहेत.

२. आता धमक्या देणारे मंदिर कह्यात घेऊन तेथे हॉटेल बांधण्याच्या उद्देशाने मला येथून हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सर्व जण गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत.

३. १० वर्षांपूर्वी पुंगारिया बाबांना त्यांच्या आश्रमात रॉकेल ओतून जाळण्यात आले आणि त्यांचा आश्रम कह्यात घेण्यात आला होता. तेथे आता हॉटेल बांधले जात आहे. त्याच लोकांची गुंडगिरी चालू असून पोलीस त्यांच्या विरोधात तक्रारही नोंदवून घेत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे कोणत्याही पदावर असलेल्या पोलीस निरीक्षकाला त्यांच्या आश्रमात विनामूल्य रहाण्याची सोय केली जाते. यामुळे पोलीस गुंडांना साथ देतात. म्हणूनच त्यांचे धाडस वाढले आहे. ते त्यांना हव्या त्या भूमीवर नियंत्रण मिळवतात आणि त्याचे हॉटेलमध्ये रूपांतर करतात.

४. मला धमकी आल्यावर मी चित्रकुट पोलीस ठाण्यात तक्रार केली होती; मात्र त्यावर मला पोचपावती मिळालेली नाही. तक्रार केल्याने २ जून या दिवशी पहाटे वरील आरोपींनी तलवारी, बंदुका घेऊन मंदिराच्या ठिकाणी येऊन माझे साहित्य लुटून नेले. मला मंदिरातून बाहेर काढले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे. याविषयी तक्रार करूनही कारवाई झालेली नाही.

५. यापूर्वी ३० मे या दिवशी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने संबंधित गुंडांवर कारवाई करण्याचा आदेश पोलिसांना दिला होता; मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

संपादकीय भूमिका

मध्यप्रदेशात भाजपचे राज्य असतांना भूमाफियांकडून अशा प्रकारचे कृत्य केले जाते आणि पोलीस कारवाई करत नाहीत, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! या प्रकरणी सरकारने तात्काळ नोंद घेऊन कारवाई करून मंदिराच्या पुजार्‍यांना संरक्षण दिले पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !