आरोग्यम् धनसंपदा ।

आयुर्वेदाला पाचवा वेदच मानले जाते. ‘चरकसंहिता’ हा आयुर्वेदातील एक मूलभूत ग्रंथ आहे. या ग्रंथात आरोग्य उत्तम राखण्याचे महत्त्व पुढीलप्रमाणे सांगितले आहे.

धर्मार्थकाममोक्षाणाम् आरोग्यं मूलमुत्तमम् ।
– चरकसंहिता, सूत्रस्थान, अध्याय १, श्लोक १५

अर्थ : धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ साध्य करण्यासाठी ‘उत्तम आरोग्य असणे’ हा पाया आहे.

‘आरोग्यम् धनसंपदा ।’ विशेषांकाच्या निमित्ताने…


सायंकाळी दिवेलागणीला देवाकडे श्लोकरूपी प्रार्थना करतांना ‘आरोग्यम् धनसंपदा’ असा उल्लेख आपण अनेकदा केला किंवा ऐकला आहे. दिवेलागणीला श्लोक म्हणण्याची पद्धत भारतात जरी लोप पावू लागली असली, तरी आरोग्य ही धनसंपदा आहे, हे आता पाश्चात्त्यांना ते लक्षात येऊ लागले आहे. प्राचीन काळापासून दीर्घकाळ सुखकर अन् आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी मानवाची धडपड चालू आहे. त्यासाठी तो वेगवेगळी ‘टॉनिक्स’, शक्तीवर्धक औषधे आणि तारुण्य टिकवणार्‍या औषधांचा सतत शोध करत आला आहे.

‘रोग होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे, हे रोग झाल्यावर उपाय करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे (Prevention is better than cure.)’, अशा अर्थाची इंग्रजीत एक म्हण आहे. ‘रोग किंवा विकार होऊ नये, यासाठी दैनंदिन जीवनात आहार, विहार (क्रिया) इत्यादी कसे असले पाहिजे’, हे प्रत्येक मानवाला ज्ञात असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे जाणून घेण्यासाठीच २१ जून या दिवशी असलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने या अंकाचे प्रयोजन