मराठवाड्यात धरणे आटली ! भयावह दुष्काळ !

  • धरणे आटली ! शेकडो गावांची स्थिती भीषण !

  • शेतकर्‍यांनी जनावरे विक्रीस काढली ! फळबागा तोडल्या !

छत्रपती संभाजीनगर  – मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती शेवटच्या टप्प्यात भयावह झाली आहे. मे अखेरीस येथे पाणीटंचाई तीव्र झाली आहे. पाणी आणि जनावरांना चारा यांचा अभाव झाला आहे. जनावरांना प्यायला पाणी नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी जनावरे विक्रीस काढली आहेत. सध्या तेथील बाजारात अशा जनावरांची संख्या अधिक आहे.

मराठवाड्यात १ सहस्र ५६१ गावांना दुष्काळाची सर्वाधिक झळ बसली आहे. १ सहस्र ८६९ टँकरनी पाणीपुरवठा चालू आहे. त्यात सर्वाधिक ७०० टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चालू आहेत. जिल्हा प्रशासनाने टँकरची संख्या वाढवूनही गावोगावी पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे.

भूजल खोल गेल्यामुळे विहिरीत पाणी नाही. शेततळे, बंधारे, तलाव कोरडे पडल्यामुळे पाणीपुरवठा योजनांवर परिणाम झाला आहे. फळबागांची सर्वाधिक हानी झाली आहे. काही भागांत शेतकर्‍यांनी त्यांनी आलेल्या नैराश्यातून फळबागेतील झाडे तोडली आहेत.

गोदावरी नदीवरील १५ बंधार्‍यात ११.३९, तर विभागातील एकूण ८७७ प्रकल्पात १०.७५ टक्के पाणीसाठा आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा ५ टक्के इतकाच आहे. हा पाणीसाठा जून अखेरपर्यंत पुरेल, असा अंदाज तज्ञांना आहे.

शेकडो गावे पाण्यासाठी अवलंबून असणार्‍या मध्यम आणि लघु प्रकल्पातील पाणीसाठा संपला असून परिसरातील गावांतील गावकरी आता पाण्याच्या शोधासाठी वणवण फिरत आहेत. गावांसह मोठ्या शहरांना टंचाईच्या झळा बसल्या आहेत.

मे महिन्यात धरणांनी तळ गाठला आहे. जून महिन्यापर्यंत पाणी उपलब्ध करण्याचे आव्हान शासनासमोर आहे. विभागातील ११ मोठ्या धरणांतील ५ धरणे कोरडी आहेत. विभागातील ११ मोठ्या धरणांत १३.२५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ७५ मध्यम प्रकल्पांत ५.४० टक्के आणि ७४९ लघु प्रकल्पांत ६.११ टक्के साठा आहे. गोदावरी नदीवरील १५ बंधार्‍यात ११.३९ टक्के आणि तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ बंधार्‍यात ४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.