छत्रपती संभाजीनगर – राज्यात प्रचंड दुष्काळ पडला असतांना खरिपासाठी कृषीमंत्र्यांनी जिल्हावार, विभागवार बैठक घेण्याची आवश्यकता असतांना कृषीमंत्री धनंजय मुंडे विदेशात गेले आहेत. शेतकर्यांना बियाण्यांसाठी रांगेत उभे करून ते स्वतः मात्र थंड हवेच्या ठिकाणी गेले आहेत. राज्याला लुबाडण्याचे काम चालू असून सत्ताधार्यांना सत्तेची मस्ती आली आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, दुष्काळ गंभीर असून पंचनामे होऊनही शेतकर्यांना साहाय्य मिळत नाही. मराठवाड्यात गंभीर संकट असताना कृषीमंत्री परदेशात कसे जाऊ शकतात ? मंत्री या महिन्यात परिस्थितीचा आढावा घेत असतात; मात्र मुंडे शेतकर्यांना वार्यावर सोडून गेले आहेत. निवडणूक संपल्यामुळे त्यांचे काम संपले असावे. सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नाही.