मतदारांना कायम ‘राजा’ संबोधणारी, कायम महापुरुषांच्या विचारांवर चालत असल्याचा दावा करणारी नेतेमंडळी कोणताही अधिकारी असो, कुणीही मोठा नेता असो, कुणी कुणाचाच आदर ठेवत नाहीत, अशी सध्याची स्थिती आहे. आपला आदर्श लोकांनी का घ्यायचा ? हेही आजची नेतेमंडळी सांगू शकत नाहीत. फक्त हाती असलेली सत्ता आणि त्या ओघाने आलेला पैसा यांच्या जोरावर ते कुणाशी कसेही वागू शकतात, हे यापूर्वी घडलेल्या अनेक उदाहरणांवरून दिसून आले आहे. पूर्वीच्या काळी कोणत्याही पक्षातील लोकप्रतिनिधी विविध आश्वासने देऊन, भूलथापा मारून, तसेच ‘आम्ही जनतेचे कैवारी आहोत’, असे जनतेला सांगून सत्ता मिळवत होते. जसजसा काळ पालटत गेला, तसतशी जनतेची, म्हणजेच मतदारांची विचार करण्याची प्रक्रिया पालटली आहे. मतदार आता जागृत होत असून तो लोकप्रतिनिधींशी कसे वागायचे ? आणि उद्धट लोकप्रतिनिधींना कसे उत्तर द्यायचे ? हे तो सध्या कृतीतूनही दाखवत आहे. पूर्वी हीच जनता लोकप्रतिनिधींना केवळ शिव्या देणे किंवा त्यांच्यावर आरोप करून सोडून देत असे. आता मात्र जनता उमेदवारांना विविध मार्गाने धडा शिकवत आहे. निवडणुकीत विविध आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करणे, इतर कार्यक्रमांत राष्ट्र अन् देश हिताच्या विरोधात बोलणे, हिंदूंवर अत्याचार होत असतांना तिकडे दुर्लक्ष करून मुसलमानांचे लांगूलचालन करणे याची वारंवारता घटना घडू लागल्याने अशा उद्दाम उमेदवारांना जनता आता श्रीमुखात लगावून धडा शिकवत आहे. त्यामुळे निवडणुकीत पारदर्शी, राष्ट्रहित, जातीभेद न बाळगता जनतेची विकासकामे आणि जनहिताचा विचार करणार्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी जनता प्रयत्न करत आहे.
…अशा घटना का घडतात ?
या लोकशाहीत राजाकडे एकहाती सत्ता प्राप्त झाल्यानंतर तेथे ‘हम करेसो कायदा’ असे होऊ लागले. त्यामुळे सर्वच पक्षांतील लोकप्रतिनिधींचे वागणे मनमानी होऊ लागले. आता काळानुसार त्यांच्या वागण्याला जनताच धडा शिकवत आहे. प्रभु श्रीराम अगदी सामान्य माणसांचेही म्हणणे ऐकत असत; पण आताचे सर्वपक्षीय शासनकर्ते तर कुणाचेच ऐकायला सिद्ध नाहीत. हीच लोकशाहीची वस्तूस्थिती आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींना मारहाण करण्याच्या घटना घडत आहेत. १७ मे या दिवशी आम आदमी पक्षाच्या कार्यालयातून काँग्रेसचे उत्तर-पूर्व देहली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कन्हैया कुमार हे बाहेर पडल्यानंतर त्यांना एका व्यक्तीने श्रीमुखात लगावली. या वेळी त्यांच्यावर शाईफेकही करण्यात आली, तसेच आम आदमी पक्षाच्या स्थानिक नगरसेविका छाया गौरव शर्मा यांच्याशीही जमावाने गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मारहाणीनंतर २ व्यक्तींचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये ‘भारत तेरे टुकडे होंगे’ असे कुणाला म्हणू देणार नाही. कन्हैया कुमारला चांगलीच अद्दल घडवली आहे. या सगळ्यात माझेही डोके फुटले आहे’, असे ही व्यक्ती सांगतांना दिसत आहे. त्यामुळे अशा घटना का घडत आहेत ? याला लोकप्रतिनिधींची घातक विचारसरणी आणि वक्तव्ये कारणीभूत आहेत. येथून पुढे जनता असे सहन करणार नाही, हेच यातून दिसून येत आहे. याला कारणीभूत जनता नव्हे, तर लोकप्रतिनिधीच आहेत. याचा विचार लोकप्रतिनिधी आणि निवडणुकीतील उमेदवार यांनी करणे आवश्यक आहे.
काही वेळा राजकारण्यांच्या उद्दामपणाच्या घटना नेहमी पहायला मिळतात. पुणे येथील एका कार्यक्रमात एका आमदारांनी एका पोलीस हवालदाराच्या कानशिलात लगावल्याचे समोर आले. खरे तर लोकप्रतिनिधी कर्तव्यावरील कर्मचार्यावर हात उचलून कायदा हाती कसा घेऊ शकतात ? या प्रकरणी पोलिसांनी त्या आमदारांच्या विरोधात गुन्हा नोंदवला; पण आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेता लोकप्रतिनिधींना कोणतीही शिक्षा होत नाही. काही वर्षांपूर्वी सामाजिक माध्यमांवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात लिखाण केल्याकारणाने एका अभियंत्याला त्यांच्या निवासस्थानी नेऊन अमानुष मारहाण केली. आमदारांच्या उपस्थितीत अशी मारहाण होणे, हे कोणत्या निकषात बसते ? काही घटनांमध्ये असेही आढळले आहे की, लोकप्रतिनिधी शासकीय कार्यालयात घुसून तेथील अधिकार्याला मारहाण किंवा दमदाटी करतात. गेल्या काही वर्षांमध्ये लोकप्रतिनिधींकडूनच कायदा हाती घेतल्याच्या घटना सर्रास दिसून येत आहेत. वरील सर्व घटनांचा विचार केल्यास लोकप्रतिनिधींचे वागणे हे गुंडांप्रमाणे होऊ लागले आहे.
गेली अनेक वर्षे शेकडो शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. असे असूनही त्यांच्या पदरी सर्वपक्षीय शासनकर्त्यांकडून आश्वासनांच्या पलीकडे काहीही पडत नाही. वर्षानुवर्षे शेतकरी अस्मानी संकटाला तोंड देत आला आहे आणि यापुढेही तो तसाच तोंड देत रहाणार आहे. शेतकर्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती होत नसल्याने तोही आज संबंधित लोकप्रतिनिधींना धडा शिकवण्याची भाषा करत आहे. पर्यायाने असेही म्हणता येईल की, जनता लोकप्रतिनिधींच्या वागण्याला न भुलता सूज्ञ होत आहे आणि तीच लोकप्रतिनिधींना विविध मार्गाने धडा शिकवत आहे. त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी मतदानाची टक्केवारी अल्प झाल्याचे वा काही गावांनी मतदानावर बहिष्कार झाल्याचे आढळत आहे, असे कुणाला वाटल्यास आश्चर्य ते काय ?
राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश नसल्याचा परिणाम !
पूर्वीच्या काळी धर्मसत्ता ही राजसत्तेवर अंकुश ठेवत असे. धर्मसत्तेतील धर्मगुरूंनी राजाला राज्यकारभाराविषयी काही सांगितले, तर राजा त्यांच्या आज्ञेचे पालन करत असे. भले मग कुणाला मृत्यूदंडाची शिक्षा असो वा अनैतिक वागण्याचे प्रकरण असो. जसजसा काळ पालटत गेला, तसतसे धर्मसत्तेचे वर्चस्व संपुष्टात येऊन राजसत्तेचे वर्चस्व आले. सध्याच्या राजसत्तेत धर्मसत्तेचा अंकुश नसल्याने लोकशाहीत मनमानी कारभार चालू झाला आहे. प्रसिद्ध लेखक व.पु. काळे यांनी म्हटल्याप्रमाणे ‘माझाच आदर्श ठेवा’, हे सांगण्याचे धाडस देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकाही नेत्याजवळ नाही’, यातच सर्व काही आले. ‘एकदा का कोणत्याही लोकप्रतिनिधींच्या हाती सत्ता आली की, त्यांना समाजात पालट करण्याऐवजी सत्ता त्यांच्यातच (लोकप्रतिनिधींमध्ये) पालट घडवून आणते आणि हे इतक्या असंख्य वेळा घडलेले आहे की, अपवाद म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तो नियमच होऊन बसलेला आहे’, असे ओशो यांनी म्हटले आहे. हेच आता घडणार्या विविध घटनांवरून दिसत आहे. त्यामुळे जनतेनेच आता जागृत होऊन उद्दाम असलेल्या उमेदवारांना मतपेटीद्वारे नाकारायला हवे अन् देशात सुराज्य आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. याचसमवेत जर लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर उद्दामपणे वागत असेल, तर त्याला परत माघारी बोलावण्याचा अधिकारही (राईट टू रिकॉल) जनतेने मिळवायला हवा !
उद्दाम उमेदवारांना जनतेने मतपेटीद्वारे नाकारून देशात सुराज्य आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत ! |