Aligarh Shiva Temple : अलीगड (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांनी नियंत्रणात घेतलेले मंदिर हिंदूंनी केले मुक्त !

पोलिसांनी स्वच्छता करून प्रारंभ केली पूजा !

अलीगड (उत्तरप्रदेश) – येथील मुसलमानबहुल सराय रहमान भागात १८ डिसेंबर या दिवशी ५० वर्षांहून अधिक जुने शिवमंदिर सापडले. हे मंदिर अनेक वर्षे बंद होते. अखिल भारतीय करणी सेना आणि बजरंग दल या संघटनांना याची माहिती मिळताच त्यांचे कार्यकर्ते तेथे पोचले आणि त्यांनी मंदिर उघडण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच पोलीसही तेथे पोचले. या वेळी थोडा तणाव निर्माण झाला. बन्नादेवी पोलीस ठाण्याचे अधिकारी पंकज मिश्रा यांनी सांगितले की, मंदिर उघडून स्वच्छ करण्यात आले आहे. ‘मंदिराला सुरक्षा पुरवली जाईल आणि येथील पूजा बंद केली जाणार नाही’, असे आश्‍वासन त्यांनी दिले. अलीगडचे पोलीस अधीक्षक मृगांक पाठक यांनी सांगितले की, मंदिरावर बेकायदशीर नियंत्रण मिळवण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. याची चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल.

शिवलिंगाची तोडफोड ! – विहिंप

विश्‍व हिंदु परिषदेचे अलीगड जिल्हा प्रचार प्रमुख प्रतीक रघुवंशी म्हणाले की, येथील मंदिरातील मूर्तींची यापूर्वीच तोडफोड करून शिवलिंग गाडण्यात आले. हिंदु संघटनेच्या लोकांना याची माहिती मिळताच मंदिरातील ढिगारा हटवण्यात आला आणि तेथे मंदिरात शिवलिंग आढळून आले. स्वच्छतेनंतर येथे विधिवत् पूजा करण्यात आली.

स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, या भागात पूर्वी हिंदु कुटुंबेही रहात होती; परंतु कालांतराने त्यांनी घरे विकली आणि येथून निघून गेले. त्यानंतर हे मंदिर मुसलमानांच्या कह्यात गेले.

बरेलीमध्ये आणखी १५ मंदिरे मुसलमानांच्या नियंत्रणात ! – करणी सेना

करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानेंद्र सिंह चौहान म्हणाले की, या मंदिरावर वर्षानुवर्षे अन्य लोकांचे नियंत्रण असून येथे पूजा केली जात नाही. मंदिरातील मूर्तींचीही हानी झाली आहे. करणी सेनेने महानगरातील सुमारे १५ मंदिरे ओळखली आहेत जी मुसलमानांच्या नियंत्रणात आहेत. ही मंदिरे लवकरच मुक्त होतील.