B’desh Clashes Over Ijtema Maidan : बांगलादेशात इज्तिमा मैदान कह्यात घेण्यावरून भारतीय आणि बांगलादेशी मौलानांच्या समर्थकांमध्ये हाणामारी : ४ जणांचा मृत्यू

(इज्तिमा म्हणजे मोठ्या संख्येने लोकांनी गोळा होणे आणि मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

बांगलादेशमधील इज्तिमा मैदानाचे हे एक कलात्मक चित्रण आहे, जे वार्षिक इज्तिमा मेळाव्यादरम्यानचे आध्यात्मिक आणि शांत वातावरण दर्शविते !

ढाका (बांगलादेश) : बांगलादेशातील टोंगी शहरात १७ डिसेंबर या दिवशी इज्तिमा कार्यक्रमाच्या आयोजनावरून मुसलमानांच्या २ गटांत झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक लोक घायाळ झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही बाजूंनी ७ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. या गटांमध्ये एक गट भारतातील तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांचा, तर दुसरा बांगलादेशातील मौलाना जुबेर यांचा होता. प्रशासनाने येथे सैन्याला तैनात केले आहे.

इज्तिमा कार्यक्रमाच्या आयोजनावरून मुसलमानांच्या २ गटांत हिंसाचार – एक गट भारतातील तबलिगी जमातचा तर दुसरा बांगलादेशातील मौलाना जुबेर यांचा !

१. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मौलाना साद यांच्या समर्थकांना शुक्रवार, २० डिसेंबरपासून टोंगी मैदानात ५ दिवसीय इज्तिमा आयोजित करायचा आहे. मौलाना जुबेर यांच्या समर्थकांना जमातवाल्यांनी येथे इज्तिमा आयोजित करावा, असे वाटत नाही. त्यामुळे जुबेर यांच्या समर्थकांनी इज्तिमा मैदानावर आधीच नियंत्रण मिळवले होते. १७ डिसेंबरला पहाटे मौलाना सादचे समर्थक मैदानात पोचले. यानंतर हाणामारी चालू झाली.

२. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर झुबेर समर्थक येथील इज्तिमा २ टप्प्यात करण्याऐवजी एकाच टप्प्यात करण्याची मागणी करत आहेत. मुसलमानांमध्ये फूट पाडण्यासाठी हसीना यांच्या पक्षाने २ टप्प्यात इज्तिमा चालू केल्याचा आरोप झुबेर समर्थकांनी केला आहे. तसेच मौलाना सादचे समर्थक भारताचे हस्तक असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.