सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खासगी अनुदानित शाळा या शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेतच विनामूल्य पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. त्यासाठी पाठ्यपुस्तकांचे १५ मेपासून तालुकानिहाय वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. गणपति कमळकर यांनी दिली. या वेळी मुलींना चॉकलेटचा खोका देण्यात येणार आहे.
इयत्ता पहिली ते आठवीतील कोणताही विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित राहू नये, त्याला पाठ्यपुस्तकांच्या अभावी शिक्षणात अडचण येऊ नये, शाळेत सर्व मुलांची १०० टक्के उपस्थिती रहावी, शाळा सोडून जाण्याचे (गळतीचे) प्रमाण शून्यावर यावे, यासाठी ‘समग्र शिक्षा’ अंतर्गत विनामूल्य पाठ्यपुस्तके ही योजना चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत आगामी शैक्षणिक वर्षासाठी ही पुस्तके देण्यात येत आहेत. जिल्ह्यातील ८ तालुक्यांत एकूण ५८ सहस्र ७२४ पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहेत.