राज्यांतर्गत पीकस्पर्धांचे आयोजन
कोल्हापूर – रब्बी हंगाम २०२४ पासून तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर पीकस्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्यानुसार कृषी विभागाच्या द्वारे रब्बी हंगाम वर्ष २०२४ मध्ये सर्वसाधारण आणि आदिवासी गटांसाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या ५ पिकांसाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज प्रविष्ट करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.
वाहनतळासाठी भरावे लागते लाखो रुपयांचे भाडे !
पिंपरी – बस डेपो आणि वाहनतळ यांसाठी ‘पी.एम्.पी.एम्.एल्.’ला (पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडला) ३ ठिकाणी जागांची आवश्यकता आहे. या संदर्भात ‘पी.एम्.आर्.डी.ए.’कडे (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे) पत्रव्यवहारही झाला आहे; मात्र अद्याप निर्णय झाला नसल्याने यावर उपाययोजना निघाली नाही. त्यामुळे ‘पी.एम्.पी.एम्.एल्.’ला बस डेपो आणि वाहनतळ यांसाठी लाखो रुपयांचे भाडे भरावे लागत आहे.
अधिक लाभाचे आमीष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक !
नारायणगाव (जिल्हा पुणे) – ‘पी.एल्.सी. अल्टिमा’ या आस्थापनामध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिकाधिक परतावा मिळेल, असे आमीष दाखवून नारायणगाव आणि परिसरातील ७९ गुंतवणूकदारांची ७ कोटी ६७ लाख ९४ सहस्र ३०० रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात नितीन पोखरकर, राजेंद्र उपाध्ये यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी गुंतवणूकदार नितीन शेळके यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. गुन्हा नोंद होताच ते दोघेजण पसार झाले आहेत.
संपादकीय भूमिका : अधिक परताव्याची आमिषे दाखवून अनेकांना फसवणार्यांना कायद्याचे भय नसणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
न्यायाधिशांच्या उपस्थितीत होणार मृताचे शवविच्छेदन !
परभणी – येथे राज्यघटनेच्या प्रतिकृतीच्या विटंबनेच्या घटनेनंतर झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला आहे. सोमनाथ सूर्यवंशी याची कारागृहात प्रकृती बिघडली होती. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता आधुनिक वैद्यांनी त्याला मृत घोषित केले. न्यायाधिशांच्या उपस्थितीत शवविच्छेदन होणार आहे.
पुणे येथे सर्वांत नीचांकी तापमानाची नोंद !
पुणे – थंडीचा जोर वाढल्याने पुणे आणि परिसरात १६ डिसेंबर या दिवशी यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन्.डी.ए.) येथे सर्वांत अल्प ६.१ अंश सेल्सियस, शिवाजीनगर येथे ७.८, लोहगाव येथे १२, कोरेगाव पार्क येथे १३.१, चिंचवड येथे १४.५ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे.