|
नसी देहली – ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ या विमान आस्थापनाचे २०० वरिष्ठ कर्मचारी एकत्र सुटीवर गेले आहेत. त्या सर्वांनी आजारपण हे सुटीचे कारण सांगितले आहे. यामुळे आस्थापनाची ८० हून अधिक उड्डाणे रहित झाली आहेत. टाटा उद्योग समूहाच्या विमान आस्थापनावर आलेल्या या संकटामुळे उड्डाणे रहित करण्यात आलेल्या शहरांमध्ये प्रामुख्याने कोची, कालिकत आणि बेंगळुरू यांचा समावेश आहे.
१. आस्थापनाने म्हटले की, उड्डाणे रहित केल्यामुळे फटका बसलेल्या प्रवाशांना एकतर पूर्ण परतावा मिळेल किंवा ते कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता त्यांचे उड्डाणाची वेळ आणि दिनांक पुन्हा ठरवू शकतात.
२. दुसरीकडे ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार काही कर्मचारी हे गैरव्यवस्थापन आणि कर्मचार्यांच्या भेदभावपूर्ण वागणुकीचा निषेध करत आहेत. त्यामुळेच त्यांनी आजारपणाचे कारण सांगून सुटी घेतली आहे.
३. वृत्तात पुढे म्हटले आहे की, एअर इंडिया एक्स्प्रेसचे ‘एआयएक्स कनेक्ट’सह विलीनीकरण प्रक्रिया चालू झाल्यापासून कर्मचार्यांमध्ये असंतोष वाढत आहे.
४. दीड वर्षापूर्वी ‘एअर एशिया इंडिया’चे संपूर्ण समभाग ‘टाटा सन्स’ने खरेदी केले होते. त्यानंतर ‘एअर इंडिया एक्सप्रेस’मध्ये विलीन होण्यापूर्वी एअरलाइनचे नाव पालटून ‘एआयएक्स कनेक्ट’ करण्यात आले. ‘एअर एशिया इंडिया’ या नावाने शेवटचे उड्डाण ३१ ऑक्टोबर २०२३ या दिवशी झाले आणि आता ते ‘एअर इंडिया एक्सप्रेस’साठी उड्डाणे चालवते.