Vladimir Putin : व्लादिमिर पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ !

वाजपेयी युगापासून मोदी युगापर्यंत राहिलेले बहुधा एकमेव आंतरराष्ट्रीय राष्ट्रप्रमुख !

व्लादिमीर पुतिन

मॉस्को (रशिया) – व्लादिमीर पुतिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची पाचव्यांदा शपथ घेतली. मॉस्कोमधील ‘ग्रँड क्रेमलिन पॅलेस’मध्ये ७ मे या दिवशी भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता त्यांचा शपथविधी सोहळा झाला. हा सोहळा अनुमाने १ घंटा चालला. यामुळे आता पुढील ६ वर्षे ते या पदावर रहाणार आहेत. रशियामध्ये मार्च महिन्यात झालेल्या मतदानात पुतिन यांना तब्बल ८८ टक्के मते मिळाली होती. युक्रेनबरोबर पुकारलेल्या युद्धामुळे पुतिन यांच्या या शपथविधी समारोहावर पश्‍चिमी देशांनी बहिष्कार टाकला आहे.

पुतिन यांनी वर्ष २००० मध्ये प्रथम राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यानंतर ते २००४, २०१२ आणि २०१८ मध्येही राष्ट्रपती झाले. याआधीच्या निवडणुकीत त्यांना ७७ टक्के मते मिळाली होती. याचा अर्थ आता रशियामधील त्यांची लोकप्रियता आणखी वाढली आहे. वर्ष २०१८ मध्ये शपथविधी सोहळ्यात जर्मनीचे माजी चांन्सलर गेरहार्ड श्रॉडर उपस्थित होते. पुतिन यांच्या या प्रदीर्घ कार्यकाळामुळे ते वाजपेयी युगापासून मोदी युगापर्यंत राहिलेले बहुधा एकमेव आंतरराष्ट्रीय राष्ट्रप्रमुख असावेत.

पुतिन वर्ष २०३६ पर्यंत रशियाचे अध्यक्ष राहू शकतात !

रशियाच्या राज्यघटनेनुसार आतापर्यंत कोणतीही व्यक्ती सलग दोन वेळा राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नव्हती, मात्र जानेवारी २०२० मध्ये पुतिन यांनी घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रपतीपदाची ही मर्यादा रहित केली. यासाठी रशियात सार्वमतही घेण्यात आले. यात ६० टक्के मतदारांनी भाग घेतला, ज्यात ७६ टक्के लोकांनी पुतिन यांच्या निर्णयाचे समर्थन केले. त्यामुळे पुतिन यांना वर्ष २०३६ पर्यंत राष्ट्राध्यक्ष रहाण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे म्हटले जात आहे. यामुळेच ते सोव्हिएत युनियनवर जवळपास तीन दशके राज्य करणार्‍या स्टॅलिन यांना मागे टाकू शकतात.

पुतिन जगातील सर्वांत श्रीमंत राजकारणी !

‘फोर्ब्स’नुसार व्लादिमिर पुतिन यांना वर्ष २०१३ ते २०१६ या काळात जगातील सर्वांत शक्तीशाली व्यक्ती घोषित करण्यात आले होते. पुतिन हे रशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असल्याचे म्हटले जाते, अर्थात् याला अधिकृत दुजोरा नाही. काही जणांच्या मते तर ते जगातील केवळ सर्वांत श्रीमंत राजकारणीच नव्हेत, तर सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत.