Masood Azhar : जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझहर पाकिस्तानातच !

तालिबानच्या कह्यात असल्याचे पाकचे दावे खोटे !

जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझहर

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताच्या सर्वांत मोठ्या शत्रूंपैकी एक असलेला आतंकवादी मसूद अझहर पाकमध्येच असल्याचे समोर आले आहे. गेल्या २ वर्षांपासून त्याच्या सुटकेसाठी पाक सरकार प्रयत्न करत असल्याचे सांगत होते. तो अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या संरक्षणात असल्याचा पाकचा दावा खोटा असल्याचे आता सिद्ध झाले आहे. यामुळे पुन्हा एकदा भारत पाकिस्तानला ‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या करड्या सूचीत टाकण्याची मागणी करू शकतो. ‘एफ्.ए.टी.एफ्.’ म्हणजेच फायनॅन्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स ही आतंकवादाला आर्थिक साहाय्य होऊ देणार्‍या देशांवर कारवाई करणारी जागतिक संस्था आहे.

मसूद अझहर पाकमध्ये असल्याचा हा आहे पुरावा !

जिहादी आतंकवादी संघटना जैश-ए-महंमदच्या सामाजिक माध्यमांच्या हँडल्सवरून एकाएकी मसूद अझहरचे नाव समोर आले आहे. तो प्रतिदिन सकाळी ९ ते १०, तसेच दुपारी ३ ते ४ या वेळेत त्याच्या समर्थकांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देणार आहे, असे जैश-ए-महंमदने सामाजिक माध्यमांवर ‘आस्क मी एनीथिंग’ नावाची सेवा चालू करत सांगितले. यासाठी दोन पाकिस्तानी भ्रमणभाष क्रमांकही जारी करण्यात आले आहेत. लोक टेलिग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि ‘एस्.एम्.एस्.’ यांचा वापर करून प्रश्‍न पाठवू शकतात. पाकचे कमकुवत सरकार पहाता मसूद अझहरने पुन्हा डोके वर काढल्याचे मानले जात आहे.

कोण आहे मसूद अझहर ?

मौलाना मसूद अझहर हा भारताचा ‘मोस्ट वॉन्टेड’ (हवा असलेला) आतंकवादी आहे. वर्ष २०१९ मधील पुलवामा आक्रमण, वर्ष २०१६ चे पठाणकोटमधील आक्रमण, तसेच वर्ष २००१ मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या आतंकवादी आक्रमणांमध्ये त्याचा हात आहे. १ मे २०१९ या दिवशी त्याला जागतिक आतंकवादी घोषित करण्यात आले. वर्ष १९९९ मध्ये कंदहार विमान अपहरण प्रकरणात मसूद अझहरची सुटका झाली होती.

संपादकीय भूमिका

जिहादी आतंकवादाचा जनक असलेला आणि आर्थिक डबघाईला गेलेला पाक आता काय करणार ?