Ethylene Oxide Conspiracy : ५२७ भारतीय खाद्य उत्पादने कर्करोगाला कारणीभूत असल्याचा युरोपीयन युनियनचा फुकाचा दावा !

काही दिवसांपूर्वी भारतीय आस्थापनांच्या ४ प्रसिद्ध मसाल्यांवर सिंगापूर आणि हाँगकाँग यांनीही केला होता असाच आरोप !

नवी देहली – भारतीय आस्थापनांच्या ४ मसाल्यांमध्ये कर्करोग निर्माण करणारे रसायन असल्याचा सिंगापूर आणि हाँगकाँग या देशांकडून आरोप झाल्यानंतर आता युरापीयन युनियनकडूनही तत्सम आरोप करण्यात आला आहे. ‘युरोपीयन फूड सेफ्टी अ‍ॅथॉरिटी’ने केलेल्या तपासणीच्या वेळी ५२७ भारतीय उत्पादनांमध्ये ‘इथिलीन ऑक्साईड’ नावाचा पदार्थ सातत्याने आढळून आला असून तो कर्करोगास कारणीभूत आहे, असा दावा या संस्थेकडून करण्यात आला आहे.

‘युरोपीय संस्थेने या रसायनाचा वापर थांबवण्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही’, असेही तिच्याकडून सांगण्यात आले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या अहवालानुसार, युरोपीयन युनियनमधील अन्न सुरक्षा अधिकार्‍यांना सप्टेंबर २०२० ते एप्रिल २०२४ या कालावधीत हा घातक पदार्थ आढळल्याचे सांगितले जात आहे. या उत्पादनांमध्ये अक्रोड आणि तीळ, औषधे, मसाले आणि इतर खाद्यपदार्थ यांचा समावेश आहे.

‘इथिलीन ऑक्साईड’ म्हणजे काय ?

‘इथिलीन ऑक्साईड’ हा रंगीत वायू आहे, जो कीटकनाशक म्हणून वापरला जातो. तथापि हे रसायन मुळात वैद्यकीय उपकरणे निर्जंतुक करण्यासाठी सिद्ध करण्यात आले होते. असे म्हटले जाते की, ‘इथिलीन ऑक्साईड’च्या संपर्कात आल्याने लिम्फोमा आणि ल्युकेमिया यांसह इतर कर्करोगांचा धोका वाढू शकतो.

‘रॅपिड अलर्ट सिस्टम फॉर फूड अँड फीड’ ही एक ऑनलाइन प्रणाली आहे जी युरोपीय देशांमध्ये अन्न सुरक्षा मानकांचे परीक्षण करते. त्याची आकडेवारी दर्शवते की, ५२५ खाद्यपदार्थ आणि २ खाद्य उत्पादने यांमध्ये हे रसायन सापडले आहे. त्यांपैकी ३३२ उत्पादने थेट भारताशी संबंधित आहेत, तर उर्वरित उत्पादनांसाठी अन्य देशांनाही उत्तरदायी धरण्यात आले आहे.

कर्करोगजन्य पदार्थाचे प्रमाण किती आहे ? हे पहाणे आवश्यक ! – प्रसिद्ध कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. शेखर साळकर, मणिपाल रुग्णालय, गोवा

डॉ. शेखर साळकर

यासंदर्भात ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने गोव्यातील मणिपाल रुग्णालयातील प्रसिद्ध कर्करोग शल्यचिकित्सक आणि वरिष्ठ सल्लागार डॉ. शेखर साळकर यांची प्रतिक्रिया घेतली. या वेळी डॉ. साळकर म्हणाले की, या खाद्यपदार्थांमध्ये ‘इथिलीन ऑक्साईड’चे प्रमाण किती आहे ? हे पाहिले पाहिजे. जर ते १ पी.पी.एम्. (१० लाख एककात १ एकक) असेल, तर कुठलीच हानी होऊ शकत नाही. याउलट ‘प्रोसेस्ड’ अथवा ‘पॅक्ड’ खाद्यपदार्थांमध्ये कर्करोगजन्य पदार्थ अधिक असतात. दुसरीकडे अमेरिकेत प्रत्येक १ लाख लोकांमागे ४०० लोक कर्करोगग्रस्त होतात. भारतात हेच प्रमाण केवळ १०० आहे. आपण नेहमीच अन्न शिजवून ग्रहण करतो. त्यामुळे मूळ खाद्यपदार्थात कर्करोगजन्य गोष्ट असली, तरी शिजवतांना वाफेतून ती बाहेर पडते.

डॉ. साळकर पुढे म्हणाले की, मुळात भारतीय खाद्यपदार्थांवर अशा प्रकारे आरोप होत असतील, तर त्यात ‘भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण संस्थे’ने लक्ष घातले पाहिजे आणि असे होऊ नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ते केले नाहीत, तर भारतीय खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेकडे पूर्वग्रहदूषितपणे पाहिले जाईल. अशा आरोपांमुळे शेवटी देशाची प्रतिमा डागाळली जाते. जर स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय आस्थापनांचा यामागे कुटील हेतु असेल, तर याने त्यांचीच हानी होणार आहे, हे त्यांनीही लक्षात ठेवले पाहिजे, असेही डॉ. साळकर या वेळी म्हणाले.

संपादकीय भूमिका

एकाएकी अशा प्रकारे आरोप होऊ लागणे, यामागे भारतविरोधी धोरण असल्याचे नाकारले जाऊ शकत नाही. ५२७ भारतीय उत्पादनांमध्ये कर्करोगास कारणीभूत घटक असते, तर भारतात कर्करोग्यांची रीघच लागली असती. त्यामुळे ‘भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण संस्थे’ने अशा आरोपांना सडेतोड उत्तर दिले पाहिजे !