InheritanceTax in India : भारतात अमेरिकेप्रमाणे वारसा कर लावण्यावर चर्चा व्हावी ! – सॅम पित्रोदा

  • काँग्रेसच्या विदेशातील शाखेचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांचे विधान !

  • हे पित्रौदा यांचे वैयक्तिक विधान असल्याचे काँग्रेसचे मत

(वारसा कर म्हणजे एखाद्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीतील ५५ टक्के संपत्ती सरकारजमा करणे)

सॅम पित्रोदा

नवी देहली – अमेरिकेत वारसा कर आहे. भारतातही वारसा कर लागू करण्यावर चर्चा व्हायला हवी. जर एखाद्या व्यक्तीकडे १० कोटी डॉलर्सची (८३ कोटी रुपयांहून अधिक) संपत्ती असेल, तर त्याच्या मृत्यूनंतर त्याची ४५ टक्के संपत्ती त्याच्या मुलांकडे जाते, तर ५५ टक्के संपत्ती सरकार जमा होते. भारतात असा कोणताही कायदा नाही. जर येथे कुणाची संपत्ती १० अब्ज रुपये असेल, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांना सर्व संपत्ती मिळते. जनतेसाठी काहीच उरत नाही.

मला वाटते की, लोकांनी अशा विषयांवर चर्चा केली पाहिजे, असे विधान काँग्रेसचे विदेशातील शाखेचे (इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे) अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केले. पित्रोदा यांच्या या वक्तव्यापासून काँग्रेसने स्वतःला दूर केले आहे. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. याचा पक्षाशी काहीही संबंध नाही.

सौजन्य Business Today

काँग्रेसला तुमची संपत्ती लुटायची आहे ! – पंतप्रधान मोदी यांची टीका

पित्रोदा यांच्या या विधानावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली आहे. ते एका सभेत म्हणाले की, काँग्रेसला पालकांकडून मिळालेल्या वारसाहक्कावरही कर लावायचा आहे. तुम्ही तुमच्या श्रमाद्वारे जमवलेली संपत्ती तुमच्या मुलांपर्यंत जाणार नाही. ‘काँग्रेसचे पंजे’ तीही तुमच्याकडून हिसकावून घेतील. काँग्रेसचा मंत्र आहे, ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी.’ म्हणजे जोपर्यंत तुम्ही जिवंत असाल तोपर्यंत काँग्रेस तुम्हाला अधिक कर लावून मारेल. ज्यांनी संपूर्ण काँग्रेस पक्षाला वडिलोपार्जित संपत्ती मानून ती त्यांच्या मुलांना दिली, त्यांना असे वाटत नाही की, सर्वसामान्य भारतियांनी त्यांची संपत्ती त्यांच्या मुलांना द्यावी.

सौजन्य Business Today

माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला ! – सॅम पित्रोदा यांची सारवासारव

सॅम पित्रोदा यांच्या विधानावरून टीका होऊ लागल्यावर आणि काँग्रेसने त्यांच्या विधानाशी असहमत असल्याचे सांगितल्यावर पित्रोदा यांनी सामाजिक माध्यमांवर पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, माझ्या विधानाचा विपर्यास करणे दुर्दैवी आहे. ‘५५ टक्के मालमत्ता बळकावणार’ असे कुणी सांगितले ? भारतात असे काही केले जाईल, असे कोण म्हणाले ? भाजप आणि प्रसारमाध्यमे इतके घाबरले का ? मी केवळ अमेरिकेच्या वारसा कराचे उदाहरण दिले होते. मी वस्तुस्थिती सांगू शकत नाही का ? मी म्हणालो की, या सूत्रांवर चर्चा करणे आवश्यक आहे. याचा काँग्रेससह कोणत्याही पक्षाच्या धोरणाशी संबंध नाही.

संपादकीय भूमिका

भारताच्या इतिहासात अशा प्रकारचा कायदा कधीच नव्हता आणि कधीच होऊ शकणार नाही. जर कायदा करायचाच असेल, तर तो राजकारण्यांसाठी करावा, असेच भारतीय जनता सांगेल !