Bengal Ram Navami Violence : बंगालमध्ये रामनवमीला ३ ठिकाणी हिंसाचार : १८ जण घायाळ

मुर्शिदाबादमध्ये मिरवणुकीत फोडण्यात आले गावठी बाँब !

कोलकाता (बंगाल) – रामनवमीच्या दिवशी बंगालमध्ये काही ठिकाणी हिंसाचार झाला. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा शहरातील शक्तीपूर येथे मशिदीजवळ रामनवमीची मिरवणूक आल्यानंतर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण करण्यात आले. येथे छतांवरून दगडफेक करण्यात आले. (‘छतांवर दगड ठेवण्यात आले आहेत का ?’, याची तपासणी मिरवणुकीपूर्वी पोलिसांनी का केली नाही ? – संपादक) या वेळी गावठी बाँब फोडण्यात आल्याचेही म्हटले जात आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. शक्तीपूरमध्ये हिंदू अल्पसंख्य आहेत. जिल्ह्यातील माणिक्याहार आणि राज्यातील मेदिनीपूरच्या इग्रा येथेही हिंदूंच्या मिरवणुकीवर आक्रमण करण्यात आले. तिन्ही ठिकाणी झालेल्या हिंसाचारात १८ जण घायाळ झाले आहेत. यांमध्ये २ अल्पवयीन मुले, १ महिला आणि काही पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. परिसरात तणावाचे वातावरण आहे. तणावाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने मोठ्या प्रमाणात केंद्रीय फौजफाटा तैनात केला आहे. याप्रकरणी पोलिसांचे अधिकृत वक्तव्य अद्याप आलेले नाही.

माणिक्याहार आणि  मेदिनीपूर येथेही आक्रमण

१. शक्तीपूरप्रमाणेच मुर्शिदाबाद जिल्ह्यातील माणिक्याहार भागातही मिरवणुकीवर आक्रमण करण्यात आले. माणिक्याहार परिसरातही आक्रमकांनी हिंदूंची घरे आणि अनेक घरे यांना आग लावली आणि ती लुटली.

२. बंगालमधील मेदिनीपूरच्या इग्रा येथेही मिरवणुकीवर आक्रमण करण्यात आले.  घायाळांना उपचारार्थ रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आले आहे.

भाजपची तृणमूल काँग्रेसवर टीका

१. विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ममत बॅनर्जी यांचे पोलीस हिंसाचार नियंत्रित करण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. ‘हिंदूंवर उघडपणे आक्रमण झाले आणि ममता बॅनर्जी यांचे पोलीस मूक प्रेक्षक राहिले’, असा आरोप त्यांनी केला.

२. भाजपचे प्रदेश सरचिटणीस जगन्नाथ चट्टोपाध्याय म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे राज्य पोलिसांचे काम आहे. आम्ही निवडणूक आयोगाला तेथील पोलिस अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची विनंती करतो.

३. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी हिंसाचाराच्या घटनेची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

४. भाजप माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी हिंसाचाराचे काही व्हिडिओ ‘एक्स’वर शेअर केले आहेत. त्यांनी लिहिले आहे की, ममता बॅनर्जी रामनवमीच्या मिरवणुकीचे संरक्षण करण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरल्या. ममता बॅनर्जी यांची गेल्या काही दिवसांपासून प्रचार सभांमध्ये लोकांना भडकावणारी प्रक्षोभक भाषणे या हिंसाचाराच्या घटनेला उत्तरदायी आहेत.

तृणमूल काँग्रेसची भाजपवर टीका

दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने भाजपवर निवडणुकीपूर्वी तणाव निर्माण केल्याचा आरोप केला आहे. तृणमूलचे नेते शंतनू सेन म्हणाले की, भाजप निवडणुकीपूर्वी दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा हिंसाचाराच्या घटनांचा आम्ही निषेध करतो. हे भाजपचे काम आहे.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध

मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे घायाळांना पहाण्यासाठी आलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘परत जा’ अशा घोषणा दिली. या वेळी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. अधीर रंजन चौधरी यांच्यावर भाजप नेत्याला धक्का दिल्याचा आरोप करण्यात आला.

गेल्या वर्षीही झाला होता हिंसाचार !

गेल्या वर्षी रामनवमीच्या दिवशीही बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. उत्तर दिनाजपूरच्या दालखोला, हावडा येथील शिवपूर आणि रिसरा आणि हुगळीच्या श्रीरामपूरमध्ये रामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमणे झाली होती. यात अनेक जण घायाळ झाले होते. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा या आक्रमणांचे अन्वेषण करत आहे.

मुर्शिदाबाद येथील हिंसाचारामागे भाजप ! – ममता बॅनर्जी यांचा आरोप

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रामनवमीच्या दिवशी मुर्शिदाबाद येथे झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी भाजपवरच आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की,  मुर्शिदाबादमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत स्फोट झाला. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. सर्व काही पूर्वनियोजित होते. मुर्शिदाबादच्या उपमहानिरीक्षकांना रामनवमीच्या एक दिवस आधी काढून टाकण्यात आले, जेणेकरून ते (भाजप) राज्यात हिंसाचार भडकावू शकतील. आदल्या दिवशी त्याच ठिकाणी भाजपच्या एका आमदाराने गोंधळ घातला. रामनवमीच्या मिरवणुकीत तलवारी का घेऊन आला होता ? मला ‘भाजप आयोगा’ला (निवडणूक आयोगाला) विचारायचे आहे की, रामनवमीच्या आधी उपमहानिरीक्षकांना का हटवले ? हे भाजपला साहाय्य करण्यासाठी केले होते का ?

ममता बॅनर्जी यांनी रामनवमीच्या आदल्या दिवशी भाजपवर आरोप करतांना ‘भाजप रामनवमीच्या दिवशी राज्यात दंगली घडवून आणेल’, असा दावा केला होता.

संपादकीय भूमिका

  • गेल्या वर्षीही बंगालमध्ये रामनवमीच्या वेळी अशाच प्रकारच्या घटना घडल्या होत्या आणि या वर्षीही तशीच घटना घडली. यातून तृणमूल काँग्रेसचे सरकार हिंदूंच्या रक्षणासाठी निष्क्रीयच रहाते, हेच स्पष्ट होते !
  • तृणमूल काँग्रेस मुसलमानप्रेमी आणि हिंदुद्वेषी पक्ष असल्याने असे यापूर्वीही घडले आहे, आताही घडत आणि पुढेही असेच घडणार. हे पहाता केंद्र सरकारने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लावणेच आवश्यक आहे !