US On India Pak : (म्हणे) ‘आम्ही यात पडणार नाही; पण भारत-पाकिस्तान यांनी तणाव टाळावा !’ – अमेरिका

पंतप्रधान मोदी यांच्या आतंकवाद्यांना त्यांच्या घरात घुसून ठार मारण्याच्या वक्तव्यावर अमेरिकेने व्यक्त केली प्रतिक्रिया

मॅथ्यू मिलर

न्यूयॉर्क (अमेरिका) – काही दिवसांपूर्वी उत्तराखंड येथे निवडणूक सभेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातून आतंकवाद संपवण्यासाठी केंद्रशासन घेत असलेल्या कठोर निर्णयांविषयी वक्तव्य केले होते. मोदी म्हणाले होते की, आज भारतात मोदींचे सशक्त सरकार आहे. आतंकवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारले जाते. यावर अमेरिकेने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, अमेरिका यात पडणार नाही; परंतु आम्ही भारत आणि पाकिस्तान या दोघांनाही सांगू इच्छितो की, शक्यतो संघर्ष टाळावा अन् चर्चेतून उपाय काढावा.

सौजन्य : ET NOW

गेल्या काही काळापासून पाककडून भारतावर सातत्याने ‘टार्गेट किलिंग’चा (लक्ष्यित हत्यांचा) आरोप करण्यात येत आहे.

दैनिक ‘लोकसत्ता’चे भारतविरोधी वार्तांकन !

अमेरिकेने भारतावर केलेल्या वक्तव्याला म्हटले ‘मोलाचा सल्ला’ !

भारताला वेठीस धरण्याच्या अमेरिकेच्या छुप्या डावाला ‘मोलाचा सल्ला’ म्हणणे, हे एकप्रकारे भारताच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या प्रतिमेचे हनन करण्यासारखेच आहे, हे ‘लोकसत्ता’वाले लक्षात घेतील का ?

दैनिक ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर याची बातमी प्रसारित झाली आहे. त्यामध्ये अमेरिकेने भारताला ‘मोलाचा सल्ला’ दिल्याचे म्हटले आहे. त्यात म्हटले आहे, ‘‘भारत-पाकिस्तान वादात आम्हाला हस्तक्षेप करायचा नाही; परंतु दोन्ही देशांनी सामंजस्याने संवाद साधावा, असा मोलाचा सल्ला अमेरिकेने भारताला दिला आहे.’’

संपादकीय भूमिका 

एकीकडे ‘आम्ही भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये पडणार नाही’, असे म्हणायचे आणि दुसरीकडे भारताला यावरून फुकाचा सल्ला द्यायचा, याला काय म्हणावे ? भारताने त्याचे अखंडत्व टिकवण्यासाठी घेतलेल्या निर्णयांविषयी अथवा कृतींविषयी अमेरिकेला बोलण्याचा अधिकार नाही, हे भारताने अमेरिकेला ठणकावून सांगितले पाहिजे !