हिंदुत्वनिष्ठांसाठी दिशादर्शक ‘सनातन प्रभात’ !

हिंदु राष्ट्राच्या चळवळींतील हिंदूंसाठी दैनिक हे हक्काचे व्यासपीठ !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक अन् महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांना हिंदूंचे संघटन करतांना विविध आव्हानांना सामोरे जावे लागते. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रौप्य महोत्सव विशेषांकाच्या निमित्ताने श्री. घनवट यांना हिंदूसंघटनाचे कार्य करतांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या माध्यमातून झालेले साहाय्य आणि आलेले अनुभव येथे देत आहोत.

हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधातील अभियान राष्ट्रीय स्तरावर पोचवण्यास साहाय्य

वाराणासी, उत्तरप्रदेश येथील हलालविरोधी आंदोलन

(टीप : हलाल म्हणजे इस्लामनुसार जे वैध ते)

‘हलाल अर्थव्यवस्थेची भयावहता स्पष्ट करणारे लेख ‘सनातन प्रभात’ समुहाने प्रसिद्ध केले. ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या संदर्भात ठिकठिकाणी होणार्‍या बैठका, शासनाची भूमिका, हलाल अर्थव्यवस्थेमुळे देशाची झालेली हानी, तसेच देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात निर्माण झालेला प्रश्न या सर्व गोष्टींना वेळोवेळी दैनिकातून प्रसिद्धी दिल्यामुळे मागील ३ वर्षांमध्ये ही चळवळ राष्ट्रीय स्तरापर्यंत पोचली आहे. परिणामी संपूर्ण देशभरामध्ये हलालचे षड्यंत्र उघड झाले आहे.

हिंदुत्वनिष्ठांना साधनेसाठी मार्गदर्शक ‘सनातन प्रभात’ !

सध्या समाजामध्ये विविध साधनामार्ग आणि साधनेच्या पद्धती आहेत. गुरुकृपायोगानुसार साधना करून अध्यात्मात प्रगती करणे आणि मोक्षप्राप्ती करणे यांविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’मधून विविध साधकांचे अनुभव अन् अनुभूती प्रसिद्ध होतात. त्याप्रमाणे साधना करून अनेक हिंदुत्वनिष्ठ, वाचक, धर्मप्रेमी अध्यात्मात प्रगती करत आहेत. त्यांचीही जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्ती व्हावी, यासाठी ‘सनातन प्रभात’मधील मार्गदर्शन, हे पुष्कळ मोलाचे ठरले आहे.

हिंदुत्वाच्या चळवळीचे हक्काचे व्यासपीठ ! 

श्री. सुनील घनवट

लोकमान्य टिळक यांचे दैनिक ‘केसरी’ प्रमाणे सध्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात प्रखर जनजागृती करणारे जर कोणते दैनिक असेल ? तर ते म्हणजे ‘सनातन प्रभात’ ! स्वातंत्र्यानंतरच्या ७६ वर्षांच्या कालावधीत पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये ‘कम्युनिस्टां’चा (साम्यवाद्यांचा) पगडा असल्यामुळे हिंदुत्वाची चळवळ त्याचसमवेत हिंदुत्वावर होणारे आघात, या सर्वांसाठी कोण कार्य करणार ? कोण त्याला व्यापक प्रसिद्धी देणार ? हा विचार, तसेच वस्तूनिष्ठ आणि सत्यनिष्ठ माहिती कोण पोचवणार ? असे प्रश्न २५ वर्षांपूर्वी धर्मनिष्ठ अन् राष्ट्रनिष्ठ नागरिकांच्या मनात होते. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमधून याचे उत्तर मिळाले. सध्याच्या पीत पत्रकारितेमध्ये आणि ‘पेड न्यूज’च्या (पैसे घेऊन बातम्या देण्याच्या) काळात हिंदुत्वनिष्ठांसाठी, हिंदु राष्ट्राच्या चळवळीसाठी एक हक्काचे व्यासपीठ, म्हणजे ‘सनातन प्रभात’ आहे. राष्ट्र आणि धर्म यांविषयी निष्ठेचे विचार, त्यांवर होणार्‍या आघातांचे विचार, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात तळागाळामध्ये अत्यंत तळमळीने झोकून देऊन आपापला खारीचा वाटा उचलणार्‍या विविध संघटना यांना व्यापक स्तरावर प्रसिद्धी ‘सनातन प्रभात’मधून मिळते.

मंदिर सरकारीकरणाविषयी योग्य दृष्टीकोन मिळणे !

वर्ष २००८ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र सरकार राज्यात साडेचार लाख मंदिरांचे सरकारीकरण करणार होते. त्या वेळी सर्वसाधारणपणे समाजामध्ये ‘मंदिरांचे सरकारीकरण झाल्यामुळे मंदिरांत अनेक सुधारणा झाल्या आहेत, विकास झाला आहे, स्वच्छता असते’, असे विचार होते. या कालावधीत मंदिर सरकारीकरणामुळे होणारी हिंदु धर्माची हानी, मंदिर संस्कृतीचा होणारा र्‍हास यांविषयीच्या विविध लेखमालिका दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध झाल्या. मदरसा आणि चर्च यांना कुणी हात लावत नाही; कारण मदरसा आणि मशीद यांसाठी वक्फबोर्ड आहे, चर्चसाठी ‘डायोसेसन सोसायटी’ आहे. ‘केवळ मंदिरांचेच सरकारीकरण का ?’, हा मूलभूत प्रश्न सरकारपर्यंत पोचवण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ने केले. या कालावधीत मंदिर सरकारीकरणाच्या विरोधातील आंदोलन गावागावांत पोचवण्याचा प्रयत्न ‘सनातन प्रभात’ने केला. त्यामुळेच एक मोठे जनआंदोलन उभे राहिले आणि तत्कालीन काँग्रेस सरकारला मंदिर सरकारीकरणाचा निर्णय मागे घ्यावा लागला. या संपूर्ण प्रक्रियेत सिंहाचा वाटा ‘सनातन प्रभात’चा होता.

पुढे जाऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत येणारे कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी देवस्थान, शिर्डीचे देवस्थान, पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, तुळजापूरचे श्री तुळजाभवानी मंदिर, मुंबई येथील श्री सिद्धिविनायक मंदिर, अशा सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील घोटाळे, भ्रष्टाचार, मंदिरांच्या भूमी हडपणे हे भयंकर दुष्परिणाम ‘सनातन प्रभात’ने लोकांपर्यंत पोचवले. या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील चळवळ उभी राहिली. सध्याचे केंद्रशासन मंदिरे भक्तांच्या कह्यात देण्याचा विचार करत आहे. यासाठी ‘सनातन प्रभात’ने व्यापक भूमिका निभावली आहे.

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या परिषदांच्या वृत्तांमुळे मंदिर विश्वस्त जोडले जाणे !

ओझर, महाराष्ट्र येथील मंदिर महासंघाच्या परिषदेचे उद्घाटन

वर्ष २०२३ पासून महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या माध्यमातून मंदिरांचे संघटन, समन्वय, संपर्कयंत्रणा, सुव्यवस्थापन यांसाठी विविध ठिकाणी मंदिर परिषदांचे आयोजन करण्यात येत आहे. ‘सनातन प्रभात’चा पुष्कळ वाचकवर्ग हा धार्मिक आहे. ‘सनातन प्रभात’मध्ये मंदिर परिषदांची वृत्ते प्रसिद्ध झाल्यामुळे अनेक मंदिरांचे विश्वस्त, पुरोहित, पुजारी यांनी स्वतः भ्रमणभाष करून ‘आम्ही मंदिर संघटनाच्या कार्यात सहभागी होत आहोत आणि आमच्या भागांमध्येही मंदिर परिषदेचे आयोजन करा’, अशी मागणी केली.

हिंदुत्वनिष्ठ प्रवक्त्यांसाठी दिशादर्शक !

अनेक वेळा हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या संदर्भात विविध वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांमध्ये माझ्या समवेत असलेल्या काही हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे प्रवक्ते यांनी सांगितले, ‘‘चर्चासत्रातील विषयाच्या संदर्भात नेमकी दिशा काय हवी ? हे ‘सनातन प्रभात’ वाचल्याने स्पष्ट झाले.’’ केवळ हिंदुत्वाच्या चळवळीतील कार्यकर्त्यांनाच नव्हे, तर वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांतील हिंदुत्वनिष्ठ प्रवक्त्यांनाही ‘सनातन प्रभात’मुळे योग्य दिशा मिळत आहे.