‘रेबीज फ्री पुणे’ करण्यासाठी महापालिका १ लाख ८० सहस्र प्राण्यांना लस देणार !

आरोग्य विभागाचा महत्त्वपूर्ण उपक्रम !

पुणे – ‘रेबीज’ हा जीवघेणा आजार असून तो प्राण्यांच्या चाव्यापासून माणसाला होतो. त्याला प्रतिबंध म्हणून केंद्रशासनाच्या निर्देशानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने ‘रेबीज फ्री पुणे’साठी (रेबीजमुक्त पुणे) आवश्यक ती पावले उचलली आहेत. येत्या काही दिवसांमध्ये शहरातील १ लाख ८० सहस्र भटक्या कुत्र्यांना रेबीज लसीचा डोस देण्यात येणार आहे. त्यासाठी पशूवैद्यकीय विभागातील सर्व कर्मचार्‍यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. (सामान्य नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे, हे महापालिकेचे कर्तव्य असतांना आतापर्यंत भटक्या कुत्र्यांना लस का दिली गेली नाही ? केंद्र सरकारला निर्देश द्यावे लागावेत, हे प्रशासनासाठी लज्जास्पद ! – संपादक)

कुत्र्यांना रेबीज लसीकरण केल्यामुळे कुत्र्यांमध्ये रेबीजची लागण होत नाही. त्यांनी चावा घेतला, तरी माणसाला रेबीज होत नाही; म्हणून हे लसीकरण महत्त्वाचे आहे. शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्याही अधिक आहे. त्यांची उत्पत्ती वाढू नये, यासाठी नियुक्त केलेल्या संस्थांकडून या भटक्या नर किंवा मादी कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करण्यात येते आणि पुन्हा त्यांना सोडण्यात येते. त्या वेळी रेबीजची लस देण्यात येते; परंतु आता सर्वच कुत्र्यांना पकडून तेथेच लसीकरण केले जाणार आहे.

मनपाच्या पशूवैद्यकीय विभागप्रमुख डॉ. सारिका फुंडे म्हणाल्या, ‘‘शहरातील कुत्र्यांना पकडण्ो आणि नसबंदी यांसाठी आरोग्य विभागांकडून ५ संस्थांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्याकडून रेबीज लसीकरणही करण्यात येणार आहे. लसीकरण केले म्हणून ठराविक निशाणी केली जाणार आहे. ही लस १ वर्षासाठी मर्यादित असल्याने प्रत्येक वर्षी हे लसीकरण करण्यात येणार आहे.’’

संपादकीय भूमिका :

अभिनंदनीय निर्णय असला, तरी ‘उशिरा सुचलेले शहाणपण’, असेच म्हणावे लागेल !