पंढरपूर विठ्ठल मंदिर विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांना वेग !

मंदिराला ७०० वर्षांपूर्वीच्या मूळ स्वरूपात आणण्याचे ध्येय !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – विठ्ठल मंदिराच्या विकासासाठी ७३ कोटी रुपयांच्या आराखड्यातील कामांना प्रारंभ झाला आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालू असून हे काम पुढील दीड ते दोन वर्र्षांत टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाणार आहे. विठ्ठल मंदिराला त्याच्या पुरातन स्वरूपात आणण्यासाठी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी काढून टाकायचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. संपूर्ण मंदिराला पुरातन काळातील दगडी लाद्या बसवण्यात येत आहेत. मंदिरातील नंतरच्या काळात बसवण्यात आलेले मार्बल, ग्रॅनाईट आणि याच पद्धतीच्या चकचकीत फारशा काढून टाकण्यात येत आहेत. या दगडांमुळे गाभार्‍यात पुष्कळ मोठ्या प्रमाणात दमटपणा रहात असल्याने याचा त्रास भाविकांना होत होता, तसेच देवाच्या मूर्तीवरही याचा विपरीत परिणाम जाणवत होता. विठ्ठल सभामंडपातील पेशवेकालीन भव्य सागवानी लाकडी सभामंडपालाही उजाळा देण्याचे काम चालू असून यामुळे मंदिराची शोभा वाढू लागली आहे.

मंदिरातील पुरातन वास्तूशिल्पाचे आयुर्मान वाढणार

मंदिरात १४ शतकांनंतर अनेक प्रकारे पालट करण्यात आले. सध्या मूळ दगडी बांधकामाची डागडुजी आणि पॉलिशिंग करण्याचे काम पुरातत्व विभाग अत्यंत बारकाईने करत आहे. यामुळे मंदिरातील पुरातन वास्तूशिल्पाचे आयुर्मान किमान पुढील ५०० ते ७०० वर्षांनी वाढणार असल्याचे पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास वाहणे यांनी सांगितले.

सध्या विठ्ठल मंदिरातील सोळखांबी, चौखांबी आणि गाभारा, तसेच रुक्मिणीमातेचा गाभारा येथे काम चालू आहे. या भागात असणारे दगडी खांब पुरातत्व विभाग शास्त्रोक्त पद्धतीने स्वच्छ करत असल्याने नक्षीदार खांब, छत आणि फ्लोरिंग यांचे मूळ दगडी आकर्षक वैभव दिसू लागले आहे. विठ्ठल मंदिरातील दगडांवर अत्यंत सुंदर नक्षीकाम आता अतिशय आकर्षकरितीने समोर येऊ लागले असून शेकडो वर्षांपूर्वी लोकांनी त्यावर लिहिलेला मजकूर दिसू लागला आहे. आता पुरातत्व विभाग हे मजकूर नोंदवण्याचे काम करणार असून मंदिराच्या इतिहासाची मोठी माहिती यामुळे समोर येऊ शकणार आहे.