हिंदूंची मंदिरे पाडणे आणि त्यांतील प्रचंड धनाची लूट करणे
हिंदूंची मंदिरे फोडून आणि त्यातील देवतांच्या मूर्तींचे भंजन करून येथील जनतेवर दहशत निर्माण करण्याचा मोगलांचा उद्देश होता. या दहशतीच्या जोरावरच त्यांनी लक्षावधी हिंदूंचे धर्मांतर केले. जे धर्मांतरित झाले नाहीत, त्यांची हत्या करण्यात आली. मंदिरांची प्रचंड लूट करण्यात आली.
१० व्या शतकात भारतात आलेल्या गझनीच्या महमूदाने १७ वेळा आक्रमण करून सोमनाथ मंदिराची तोडफोड करत मंदिराच्या संपत्तीची प्रचंड लूट केली होती. मंदिराला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या ५० सहस्र हिंदूंची कत्तल त्या वेळी गझनीच्या महमूदाने केली. सोमनाथ मंदिराच्या व्यतिरिक्त कांगडा, मथुरा आदी ठिकाणचीही मंदिरे त्याने पाडली होती.
आधी ज्ञानवापी मंदिर पाडून मशीद बनवलेले हे विश्वेश्वर, बनारसचे मंदिराचे युरोपिय चित्रकाराने काढलेले जुने चित्र.
बाबराने वर्ष १५२७ मध्ये प्रभु श्रीरामाचे जन्मस्थान अयोध्या येथे असलेले भव्य मंदिर उद्ध्वस्त केले आणि त्या ठिकाणी बाबरी मशीद उभारली. या वेळीही मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर करण्यात आले. वर्ष ११९४ मध्ये घुरीडांनी विश्वेश्वर मंदिर नष्ट केले आणि त्याजागी रझिया मशीद बांधली. मुइज्ज अल-दिन मुहम्मद इब्नने भारतावर आक्रमण करून काशी शहर उद्ध्वस्त केले. देहलीतील २७ मंदिरांना पाडून कुतुब मिनारजवळ कुव्वत-उल-इस्लाम मशीद बांधण्यात आली. कुतुबमिनारजवळ अनेक मंदिरांचे अवशेष सापडले आहेत, ज्यामध्ये गणेश मंदिरही आहे. औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेल्या या मंदिरांचा आणि मंदिरातील धनसंपत्तीच्या लुटीचा संपूर्ण लेखाजोखा त्याच्या बखरकाराने व्यवस्थितपणे मांडून ठेवला आहे.
औरंगजेबासह मोगल राज्यकर्त्यांनी पाडली हिंदूंची सहस्रो मंदिरे !
औरंगजेबाने उत्तर भारतातील अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. ९ एप्रिल १६६९ या दिवशी त्याने ‘काफिरांच्या सर्व शाळा आणि देवालये पाडून टाकण्यात यावीत’, असा एक फतवा काढल्याचेही या नोंदीमध्ये आढळते. या आदेशाचे पालन करत त्या वेळी अगणित मंदिरे पाडली गेली आणि गुरुकुले उद्ध्वस्त केली गेली. औरंगजेबाने उदयपूरवर आक्रमण करून उदयपुरातील तीन प्रमुख मंदिरांचा विध्वंस केला, तर ‘मेवाडमधील १७३ मंदिरे उद्ध्वस्त केली’, अशी नोंद या बखरीत आढळते.
ज्ञानव्यापीचे भव्य मंदिर पाडून त्याजागी मशीद बांधण्याचे कामही औरंगजेबानेच केले आहे. वर्ष १६४४ मध्ये गुजरातच्या सुभेदारीवर असताना औरंगजेबाने कर्णावतीनगरी (अहमदाबाद) येथील चिंतामणी गणेशाचे नवीन बांधलेले देवालय एका गायीची कत्तल करून बाटवले आणि पुढे त्याचे मशिदीत रूपांतर केले. गुजरातमधील अनेक देवालये त्याने या काळात पाडली.
कुतुमुद्दिन एबक याने काशीचे भव्य मंदिर पाडले अशी ऐतिहासिक नोंद आहे. राजा तोरडमल याने हे मंदिर पुन्हा बांधले. वर्ष १७०१ मध्ये औरंगजेबाने सोमनाथाचे मंदिर अशा रीतीने फोडले की, ते पुन्हा बांधताच येणार नाही. त्या वेळी तेथील शिवलिंगही त्याने लुप्त केले. वरील सर्व माहिती विकिपीडियावर सविस्तरपणे उपलब्ध आहे. ही माहिती केवळ नोंदीच्या आधारावरील आहे; याखेरीज देशभरातील सहस्रो मंदिरे आक्रमकांनी पाडली आहेत, ज्यांची कुठे नोंदही नाही.
जी मंदिरे आक्रमकांनी तलवारीच्या बळावर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, त्या मंदिरांचे बांधकाम एवढे कौशल्यपूर्ण आणि भक्कम होते की, बलशाली आक्रमकांना यांपैकी कित्येक पुरातन मंदिरे संपूर्णपणे उद्ध्वस्त करता आली नाहीत. अनेक ठिकाणी या मंदिरांचे कळस पाडण्यात आले; मात्र खांब पाडता आले नाहीत. त्यामुळे त्याच खांबांचा आधार घेत या ठिकाणी मशिदी बांधण्यात आल्या. त्यामुळे आज या ठिकाणच्या सर्वेक्षणात प्राचीन मंदिरांचे अवशेष, शुभचिन्हे आणि शिलालेख आढळतात.
रामजन्मभूमी उत्खननात सापडलेले अवशेष