गुरुसेवेचा अखंड ध्यास असणार्‍या आणि साधकांची साधना व्हावी, यासाठी अखंड धडपडणार्‍या सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !

फाल्गुन पौर्णिमा (२५.३.२०२४) या दिवशी सद्गुरु स्वाती खाडये यांचा ४६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून साधकांनी केलेले प्रयत्न पाहूया.

‘सद्गुरु स्वाती खाडयेताई यांच्या कार्याची व्यापकता आणि गतीशीलता यांची दैवी अनुभूती सर्वत्रचे साधक घेत आहेत. सद्गुरु स्वातीताई यांनी धर्मप्रसाराच्या अंतर्गत अनेक हिंदु राष्ट्र-जागृती सभांमध्ये सहस्रो हिंदूंना मार्गदर्शन केले आहे. गुरुसेवेचा अखंड ध्यास असणार्‍या सद्गुरु स्वातीताई यांनी वर्षभरात जिज्ञासू, हिंदु धर्माभिमानी, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि हितचिंतक यांना साधनेची गोडी लागावी, यासाठी साधनेविषयी मार्गदर्शन केले. त्यातून शेकडो जिज्ञासू साधनेच्या पुढच्या टप्प्यात येऊन ईश्वरप्राप्तीसाठी साधना करत आहेत, तसेच अनेक जिज्ञासूंचे दिशादर्शन होऊन त्यांचे साधनेचे प्रयत्न चालू झाले आहेत.

पू. (सौ.) मनीषा पाठक

सद्गुरु स्वातीताई आम्हा सर्वांना समष्टी सेवा आणि धर्मप्रसाराचे कार्य यांविषयी क्षणोक्षणी मार्गदर्शन करतात. धर्मप्रसारासाठी पश्चिम महाराष्ट्र, गोवा राज्य, बेळगाव, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा इत्यादी भागांत त्या भ्रमण करत असतात. त्यांच्या अखंड व्यस्ततेतही त्या साधकांच्या समष्टी सेवांमध्ये येणार्‍या अडचणी जाणून घेतात आणि अडचणी सोडवण्यासाठी साहाय्य करतात.

सद्गुरु स्वातीताईंनी शिबिरांतून ‘जिज्ञासूंचा अभ्यास कसा करावा ?, जिज्ञासूंना त्यांच्या प्रकृतीनुसार सेवा देणे, प्रेमभावाने जवळीक साधणे, त्यांच्या मनावर स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व बिंबवणे’ इत्यादी सूत्रांविषयी मार्गदर्शन केले. त्या समवेतच ‘स्वत:त कोणते ईश्वरी गुण आणायचे ?, व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा यांसाठी आवश्यक गुण, समष्टी सेवेत कोणत्या चुका टाळायला हव्यात ? आपल्यामध्ये साधकत्व येण्यासाठी कोणते प्रयत्न करावेत ?’, यांविषयी मार्गदर्शन केले. त्यांचेच मार्गदर्शन आणि प्रेरणा यांतून ‘विविध जिल्ह्यांतून साधकांनी केलेले प्रयत्न’ या लेखमालेतून जाणून घेणार आहोत.

– (पू.) सौ. मनीषा पाठक, पुणे

विहंगम गतीने धर्मप्रसार करणार्‍या, जिज्ञासूंना साधक टप्प्यात नेण्यासाठी अखंड मार्गदर्शन करणार्‍या सद्गुरु स्वाती खाडये यांच्या चरणी ४६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कोटी कोटी वंदन !

१. सद्गुरु स्वाती खाडयेताई समाजातील व्यक्तींशी संपर्क करत असतांना शिकायला मिळालेली सूत्रे

१ अ. सनातनच्या दैवी ग्रंथांचा उपयोग करणे : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी लिहिलेल्या सनातनच्या दैवी ग्रंथसंपदेतील काही ग्रंथ सद्गुरु स्वातीताई यांच्या समवेत असतात. जिज्ञासूंना प्रत्यक्ष संपर्कातून निवडक माहिती मिळते; परंतु जिज्ञासूंना ‘सनातनचे ग्रंथ दिल्याने त्यांना सातत्याने मार्गदर्शन मिळेल’, असा सद्गुरु स्वातीताईंचा भाव असतो. जिज्ञासू मोठ्या प्रमाणात या दैवी ग्रंथसंपदेचा लाभ करून घेतात.

१ आ. सनातन-निर्मित देवतांच्या सात्त्विक चित्रांचा उपयोग करणे : संपर्क करायला जातांना सद्गुरु स्वातीताई ‘३२ टक्के श्रीकृष्णतत्त्व असलेले सनातन-निर्मित श्रीकृष्णाचे चित्र, तसेच ३१.५ टक्के श्रीरामतत्त्व असलेले सनातन-निर्मित श्रीरामाचे चित्र’ स्वतः समवेत ठेवतात. ही चित्रे आकाराने मोठी असली, तरी या चित्रांना सुंदर वेष्टन (पॅकींग) करून प्रवासात ती चित्रे त्यांच्या समवेत असतात. संपर्काच्या वेळी आणि कार्यशाळांमध्ये त्या ही चित्रे दाखवतात. ‘या चित्रांच्या माध्यमातून श्रीकृष्ण आणि श्रीराम ही तत्त्वे कशी ग्रहण करता येतील ?’, याचे महत्त्वही त्या सांगतात. शेकडो जिज्ञासूंनी या चित्रांतील दैवी तत्त्वाच्या अनुभूती घेतल्या आहेत.

१ इ. जिज्ञासू आणि हिंदु धर्माभिमानी यांच्या साधनेतील अडथळे दूर करणे : जिज्ञासू आणि हिंदु धर्माभिमानी यांच्या साधनेतील अडथळे दूर होण्यासाठी साधनेची साधने जसे की, देवतांची सात्त्विक चित्रे, नामपट्ट्या, सनातनची ग्रंथसंपदा यांविषयी सद्गुरु स्वातीताई मार्गदर्शन करतात. परिणामी ‘अनेक जिज्ञासूंनी त्यांच्या साधनेतील अडथळे आणि अडचणी अल्प होत आहेत’, याची अनुभूती घेतली आहे.’

– (पू.) सौ. मनीषा पाठक, पुणे

सौ. रश्मी प्रवीण नाईक

२. सद्गुरु स्वाती खाडयेताईंनी केलेल्या मार्गदर्शनानुसार समाजातील जिज्ञासूंना घडवण्यासाठी पुणे जिल्ह्यातील साधकांकडून झालेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न

विविध जिल्ह्यांमध्ये सर्व वयोगटांतील जिज्ञासूंना साधनारत आणि सेवारत ठेवण्यासाठी सद्गुरु स्वातीताई यांनी प्रसारातील साधकांना मार्गदर्शन केले. त्या अंतर्गत पुणे जिल्ह्यात साधकांकडून झालेले प्रयत्न येथे दिले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांतील साधकांचे प्रयत्नही या लेखमालेतून आपण पहाणार आहोत. आम्हाला या सेवेतून ‘सद्गुरु स्वातीताईंचा संकल्प, त्यांची जिज्ञासू आणि साधक यांना पुढच्या टप्प्याला आणण्याची तळमळ अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा कृपाशीर्वाद’ यांची क्षणोक्षणी अनुभूती घेता आली.

२ अ. साधना सत्संगातील जिज्ञासूंनी त्यांचे कुटुंबीय आणि ओळखीच्या व्यक्ती यांना प्रवचन मालिकेत सहभागी करून घेणे : पुणे जिल्ह्यात जिज्ञासूंसाठी साधना सत्संग चालू आहेत. नवीन जिज्ञासूंसाठी प्रवचन मालिका चालू करावयाची होती. आम्ही त्याविषयीची माहिती साधना सत्संगातील जिज्ञासूंना दिली. त्यामुळे सत्संगातील जिज्ञासूंनी त्यांचे कुटुंबीय आणि समाजातील ओळखीच्या अनेक व्यक्ती यांना प्रवचन मालिकेत सहभागी करून घेतले.

२ आ. नवीन जिज्ञासूंसाठी अभ्यासवर्ग, सत्संग आणि अनौपचारिक भेटी यांचे नियोजन करून त्यांना साधनेच्या पुढच्या टप्प्यात नेणे : साधकांनी नव्याने जोडलेल्या जिज्ञासूंना संपर्क केले. जिज्ञासूंची क्षमता, साधनेची आवड आणि उपलब्ध वेळ यांचा अभ्यास करून साधकांनी नवीन जिज्ञासूंसाठी अभ्यासवर्ग, सत्संग अन् अनौपचारिक भेटी यांचे नियोजन केले. तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या साधनेविषयीच्या चौकटीही अधून मधून जिज्ञासूंना पाठविल्या. परिणामी नवीन जिज्ञासूंना साधनेच्या पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी दिशा मिळाली. त्यांना साधनेची गोडी लागली. त्यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी सारणीत चुका लिहिणे, स्वयंसूचना घेणे इत्यादी प्रयत्न चालू केले. जिज्ञासूंचा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्याप्रती भाव वाढला.

२ इ. जिज्ञासूंच्या कुटुंबियांनी घरी सामूहिक नामजप करणे : साधक निर्मितीच्या माध्यमातून अनेक कुटुंबीय जोडले गेले आणि त्यांनी घरी नामजप चालू केला. सर्वजण एकत्रित बसून १५ मिनिटे ते अर्धा घंटा सामूहिक नामजप करतात.

सुश्री (कु.) उज्ज्वला ढवळे

२ ई. नवीन जिज्ञासूंना सेवेत सहभागी करवून घेणे : सत्संग सेवकांनी समाजातील जिज्ञासूंचे शिक्षण आणि कौशल्य यांचा अभ्यास केला. प्राध्यापक आणि शिक्षक यांच्यासाठी सत्संगांचे नियोजन केले. त्यांच्यामध्ये काही संगणकीय ज्ञान असणारे अभियंता आहेत. त्यांना ऑनलाईन सत्संगांमध्ये चलचित्र दाखवणे, ‘स्क्रीन शेअरींग’, संस्थास्तरीय भाषांतर इत्यादी सेवा दिल्या. ज्यांना फलकलिखाण करणे कठीण आहे, अशांना विविध वसाहती आणि गर्दीची ठिकाणे येथे ‘ए ४’ आकारातील छापील प्रती लावणे इत्यादी सेवा दिल्या.

२ उ. नवीन जिज्ञासूंना संतांच्या सत्संगाचा लाभ होणे : साधकांनी प्रवचने, अभ्यासवर्ग आणि प्रत्यक्ष संपर्क यांतून जोडल्या जाणार्‍या चांगल्या जिज्ञासूंची निवड केली. अशा जिज्ञासूंसाठी पू. मनीषा पाठक आणि सद्गुरु स्वाती खाड्ये यांच्या भेटींचे नियोजन केले. त्या भेटींच्या वेळी मिळालेल्या संतांच्या मार्गदर्शनाचा जिज्ञासूंना पुष्कळ लाभ झाला.

२ ऊ. जिज्ञासूंनी सनातनचा आश्रम पाहिल्यावर त्यांचे साधनेचे प्रयत्न वाढणे : पुणे येथील १८० जिज्ञासूंनी देवद, पनवेल येथील सनातनचा आश्रम पाहिला. त्यामुळे त्यांना संस्थेच्या आश्रमांचे महत्त्व आणि संस्थेचे कार्य लक्षात आले. त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्याप्रती भाव वाढला आणि साधनेचे प्रयत्नही वाढले.

२ ए. जिज्ञासूंसाठी अभ्यासवर्ग घेऊन त्यांना सेवा शिकवणे : ग्रंथ प्रदर्शनांच्या ठिकाणी जोडलेले जिज्ञासू आणि गुरुपौर्णिमेनंतर प्रत्यक्ष प्रसारात जोडलेले जिज्ञासू यांना संपर्क करण्याची केंद्रातील साधकांना सेवा असते. साधकांनी जिज्ञासूंसाठी ‘भ्रमणभाषवरून संपर्क कसा करायचा ? आणि प्रत्यक्ष संपर्क कसा करायचा ?’, यांविषयी अभ्यासवर्ग घेतला. त्यानंतर जिज्ञासूंना अशा सेवा करून आनंद मिळाला, तसेच जिज्ञासूंसाठी वेगवेगळ्या विषयांवर शिबिरे घेतली. त्यांतून अनेक जिज्ञासू भावपूर्ण सेवा करू लागले. काही जिज्ञासूंना शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास होत असल्यास त्यांना आध्यात्मिक उपाय सुचवले. त्यांतून त्यांची श्रद्धा वाढली आणि त्यांना संस्थेविषयी आधार वाटला.

२ ऐ. जिज्ञासूंच्या अनौपचारिक भेटी घेऊन त्यांना भावजागृती विषयी शिकवणे : साधकांनी सण-उत्सवांच्या औचित्याने व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या मार्गदर्शनासाठी अनौपचारिक भेटी घेऊन ‘सेवांच्या माध्यमातून साधना कशी करू शकतो ? सेवा आणि सण-उत्सव साजरे करतांना भाव कसा ठेवू शकतो ? सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्याप्रती भाव कसा वाढवू शकतो ?, हे जिज्ञासूंना सांगितले. या सूत्रांचा अनेक जणांनी लाभ घेतला आणि भाववृद्धीसाठी प्रयत्न केले. काही जिज्ञासूंनी त्यांच्या घरी सनातनची सात्त्विक उत्पादने ठेवून वितरण करण्यास आरंभ केला.’

– सुश्री (कु.) उज्ज्वला ढवळे (वय ५६ वर्षे), चिंचवड, पुणे आणि सौ. रश्मी प्रवीण नाईक (वय ४८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), कोथरूड, पुणे.

३. प्रार्थना आणि कृतज्ञता !

‘एकूण २३४ जिज्ञासू व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा यांचे प्रयत्न करत आहेत. त्यांतील अनुमाने १०० जिज्ञासू ‘साधक’ या टप्प्यात आले आहेत. ‘अशी साधकपुष्पे सद्गुरु ताईंच्या चरणी अर्पण व्हावीत’, ही गुरुचरणी प्रार्थना !

वरील सर्व प्रयत्नांची दिशा ठरवणे, साधनेचे प्रयत्न करतांना येणार्‍या अडचणी सोडवणे, यांसाठी आम्हाला सद्गुरु स्वातीताई यांचे अखंड मार्गदर्शन लाभते. त्यांचीच कृपा आणि प्रेरणा यांमुळे साधकांकडून जिज्ञासूंना ‘साधक’ टप्प्याला आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. वाचक आणि जिज्ञासू यांना ‘साधक’ टप्प्याला आणण्यासाठी साधकांना अखंड दिशा देणार्‍या सद्गुरु ताई यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, सद्गुरु ताई यांच्याकडून मिळालेल्या समष्टी साधनेच्या मार्गदर्शनाचे अवलोकन होऊन तसे प्रयत्न आम्हाला करता येऊ दे अन् आम्हाला घडता येऊ दे, अशी तुमच्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’

– पू.( सौ.) मनीषा पाठक, पुणे

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक