डिचोली येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी
डिचोली, १६ मार्च (वार्ता.) : बंगालमध्ये हिंदु समाज जीव मुठीत धरून जगत आहे. बंगालमध्ये हिंदूंचे दमन रोखण्यासाठी पश्चिम बंगालचे राज्य सरकार तात्काळ विसर्जित करून तेथे ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करावी, अशी मागणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रीय हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलनाच्या माध्यमातून केली. डिचोलीतील जुने बसस्थानक येथे १६ मार्च या दिवशी हे आंदोलन करण्यात आले.
‘गेली अनेक वर्षे बंगालमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत. नुकतेच संदेशखाली येथे हिंदु महिलांवर अनन्वित अत्याचार झाल्याचे उघड झाले. या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान शेख याला अटक करण्यात आली. शहाजहान शेख याने हिंदु महिलांवर अत्याचार केले. गावातील जी महिला आवडेल, तिला पक्ष कार्यालयात बोलावून तिच्यावर अत्याचार केले गेले. कित्येक हिंदु महिला याला बळी पडल्या. या प्रकरणांची बंगालमधील पोलीस आणि सरकार यांनी दखल घेतली नाही. बंगालमध्ये मंदिरांवर आक्रमण करून देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणे, हिंदुत्वनिष्ठ व्यक्तींच्या हत्या, हिंदूंच्या शोभायात्रांवर आक्रमणे किंवा हिंदूंच्या सणांच्या वेळी दंगली, असे प्रकार घडतच असतात. विधानसभा निवडणुकीच्या काळातही येथे बाँब फेकून दंगली करण्यात आल्या. अनेक हिंदू जीव वाचवण्यासाठी बिहारमध्ये स्थलांतरित झाले आहेत. बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अतिशय भयानक आहे. या कारणांमुळेच तेथे ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करणे आवश्यक आहे, असा सूर या आंदोलनाच्या माध्यमातून उमटला.
आंदोलनामध्ये सहभागी संघटना
भारत माता की जय; मातृशक्ती, डिचोली; हिंदु जनजागृती समिती; सनातन संस्था; रणरागिणी; अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्र, वाळपई; श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, डिचोली; डिचोली येथील शिवप्रेमी संघटना आणि श्री गोपालकृष्ण देवस्थान, शिरसई