पुणे येथील ‘हिंदु सेवा महोत्सवा’चा उद्घाटन समारंभ !
पुणे, १९ डिसेंबर (वार्ता.) –माणूस धर्मापासून दूर गेल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. विश्वामध्ये शांती ठेवण्याची शिकवण आम्हाला सांगून जगात वर्चस्व स्थापण्याचा प्रयत्न केला जातो; परंतु युद्ध थांबत नाही. जगामध्ये शांती ठेवायची असल्यास भारताची आवश्यकता आहे, हे जगाला समजले आहे. आपले जीवन सेवामय झाले पाहिजे. मी आहे, मला देणारा समाज आणि परमेश्वर आहे. हेच जीवनाचे ध्येय आहे, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मांडली. हिंदु आध्यात्मिक सेवा संस्था, शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या वतीने येथील स.प. महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित ‘हिंदु सेवा महोत्सवा’च्या उद्घाटन समारंभामध्ये ते बोलत होते.
या वेळी ‘रामजन्मभूमी न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि, ‘इस्कॉन’चे गौरांग प्रभु, ज्योतिषाचार्य लाभेश मुनी, महोत्सवाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, ‘हिंदु आध्यात्मिक सेवा संस्थे’चे अध्यक्ष अशोक गुंदेचा, ‘शिक्षण प्रसारक मंडळा’चे अध्यक्ष एस्.के. जैन व्यासपिठावर उपस्थित होते.
कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांचे मनोगत
आयुष्याचा मार्ग आनंदी करण्यासाठी असलेल्या सनातन संस्थेचा लाभ करून घ्यावा ! – विद्याधर नारगोलकर, अध्यक्ष, पुणे सार्वजनिक सभा
आज माझा भाग्याचा दिवस आहे, या प्रदर्शन कक्षेच्या सेवेची संधी दिली. अध्यात्मशास्त्रानुसार देवघर कसे असावे ? याची माहितीही या प्रदर्शन कक्षामध्ये देण्यात आली आहे. अध्यात्मविषयक संपूर्ण माहिती असणारे विविध ग्रंथ येथे आहेत. हे ग्रंथ वाचल्यास त्याचा लाभ आपल्या कुटुंबाला आणि राष्ट्रासाठीही होईल. गेली २५ वर्षे सनातन संस्था लोकांसाठी, धर्मासाठी, हिंदुत्वासाठी झटत आहे आणि जगामध्ये हिंदु राष्ट्र निर्माण व्हावे, यासाठी प्रयत्नरत आहे. आपल्या आयुष्याचा मार्ग आनंदी करण्यासाठी सनातन संस्था आहे. याचा सर्वांनी लाभ करून घ्यावा, हीच माझी श्रीरामाच्या चरणी प्रार्थना आहे. अधिकाधिक लोकांनी या कक्षाला भेट द्यावी आणि येथे असलेल्या अनमोल ग्रंथसंपदेचा लाभ करून घ्यावा.
‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या कक्षाला अधिकाधिक भाविकांनी भेट द्यावी ! – दिलीप देशमुख, माजी सहधर्मादाय आयुक्त, पुणे
मंदिर विश्वस्तांचे संघटन करण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाची भूमिका अत्यंत मोलाची आहे. मंदिरांचा विकास व्हावा, मंदिरांमध्ये हिंदु धर्माची पुनर्स्थापना व्हावी, हिंदूंमध्ये जागृती व्हावी यांसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ पुष्कळ चांगले काम करत आहे. त्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाने दोन अधिवेशने घेतली. तिसरे अधिवेशन शिर्डीमध्ये होणार आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने लावण्यात आलेल्या कक्षाला अधिकाधिक भाविकांनी भेट द्यावी, असे मी आवाहन करतो.
मान्यवरांनी दिली कक्षाला भेट !
नवनीत मित्र मंडळाचे अध्यक्ष, तसेच कसबा मतदारसंघाचे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री. संतोष फडतरे, तसेच संयोजक-धर्माचार्य आणि संत संपर्क सेवक अन् राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. दिनेश मराठे यांनी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या कक्षाला सदिच्छा भेट दिली.
‘बटेंगे तो कटेंगे’ हे बरोबरच त्यासमवेत ‘घटेंगे तो भी कटेंगे’ हेही तितकेच महत्त्वाचे आहे – प.पू. स्वामी गोविंददेव गिरिप.पू. स्वामी गोविंददेव गिरि म्हणाले, ‘‘भारतीय परंपरामध्ये दानाचा अर्थ ‘चॅरिटी’ नाही. दान म्हणजे ‘शेअरिंग’ (वाटणे) करणे ! म्हणजे आपल्यापाशी जे आहे, त्यात इतरांचाही सहभाग आहे, अधिकार आहे. हा अधिकार आध्यात्मिक कारणाने आहे; म्हणून मी जे देतो, ते आपली कृपाच आहे, असा विचार असतो. ‘बटेंगे तो कटेंगे’ हे बरोबरच आहे, त्याचबरोबर ‘घटेंगे तो भी कटेंगे’ (न्यून झाल्यास कापले जाऊ) , हेही तितकेच महत्त्वाचे आहे.’’ |
ह.भ.प. चोरगे महाराज यांच्या हस्ते हिंदु जनजागृती समितीच्या कक्षाचे उद्घाटन !
सेवा प्रदर्शन कक्षामधील ‘हिंदु जनजागृती समिती’च्या कक्षाचे उद्घाटन ह.भ.प. चोरगे महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. समितीकडून धर्मशिक्षणवर्ग, प्रशिक्षणवर्ग, प्रथमोपचारवर्ग घेतले जातात. याविषयीचे कक्ष, तसेच हिंदु राष्ट्राविषयक ग्रंथांचे प्रदर्शन कक्ष येथे लावले आहेत. हिंदु सेवा महोत्सवामध्ये अनेक देवस्थाने, मठ, मंदिरे, आध्यात्मिक संस्था यांच्या सेवा कार्याचे प्रदर्शन कक्ष लावण्यात आले आहेत. हे सर्व कक्ष संयोजकांनी विनामूल्य दिले आहेत, तसेच सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांचेही कक्ष लावले आहेत.
श्री. विद्याधर नारगोलकर यांच्या हस्ते ‘सनातन संस्थे’च्या प्रदर्शन कक्षाचा प्रारंभ !
‘सनातन संस्थे’च्या प्रदर्शन कक्षाचा प्रारंभ श्री. विद्याधर नारगोलकर यांच्या हस्ते करण्यात आला. साधना, आयुर्वेद, बालसंस्कार आदी अनेक विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शन, तसेच संस्थेकडून चालवण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती प्रदर्शन कक्षामध्ये ठेवण्यात आली आहे. सण-उत्सव साजरे करण्याचे शास्त्र, साधना आदी विविध विषयांचे ग्रंथ येथे ठेवले आहेत. २२ डिसेंबरपर्यंत हा महोत्सव असेल.
श्री. दिलीप देशमुख यांच्या शुभहस्ते ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या प्रदर्शन कक्षाचा शुभारंभ !
‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या प्रदर्शन कक्षाचा शुभारंभ पुण्याचे माजी सहधर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आला. महाराष्ट्रातील सर्व मंदिरांचे संघटन करणे, मंदिरे सरकारीकरणाच्या विरोधात लढा उभारणे, मंदिर व्यवस्थापनातील समस्यांचे निराकरण करणे, मंदिरातील पावित्र्य राखणे, वस्त्रसंहिता आदी उपक्रमांचे फलक आणि माहितीपत्रक याठिकाणी ठेवण्यात आले आहेत.