मिरज येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने ममता बॅनर्जी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन !

मिरज (जिल्हा सांगली), १२ मार्च (वार्ता.) – बंगालमध्ये ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या राष्ट्रीय मंत्र्यांना अटक करून त्यांच्यावर चुकीचे गुन्हे नोंद केल्याच्या निषेधार्थ १२ मार्च या दिवशी दुपारी १२ वाजता येथील गांधी चौक येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सांगली शाखेच्या वतीने ममता बॅनर्जी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या विरोधात घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक हाती धरले होते.

मिरज येथे ममता बॅनर्जी यांच्या पुतळ्याचे दहन करून घोषणा देतांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते

‘बंगालमध्ये संदेशखाली भागात हिंदु महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ५ मार्च या दिवशी देशव्यापी निदर्शने केली होती, तसेच विद्यार्थी परिषद वारंवार त्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून रस्त्यावर उतरली होती.

११ मार्च या दिवशी झालेल्या बंगालमधील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री श्री. याज्ञवल्क्य शुक्ल उपस्थित होते. ‘त्या वेळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या काही गुंडांनी आंदोलनास वेगळे रूप देऊन पोलिसांच्या सहकार्याने परिषदेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली’, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे.