China On Arunachal Pradesh : (म्हणे) ‘अरुणाचल प्रदेश चीनचा भाग !’ – चीन

पंतप्रधान मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील सेला बोगद्याचे उद्घाटन केल्यावर चीनचा थयथयाट !

बीजिंग (चीन) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये जाऊन सेला बोगद्याचे उद्घाटन केले. त्यानंतर चीनने या घटनेचा निषेध केला आहे. चीनने पुन्हा अरुणाचल प्रदेश त्याचा भाग असल्याचा दावा केला आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले की, अरुणाचल प्रदेशचे नाव ‘जंगनान’ आहे. चीन अरुणाचल प्रदेशला ‘दक्षिण तिबेट’ म्हणतो. हा चीनचा परिसर आहे. भारताच्या बाजूला बेकायदेशीरपणे स्थापन झालेल्या अरुणाचल प्रदेशला आमच्या सरकारने कधीही मान्यता दिली नाही. आजही आमचा विरोध आहे. हा चीनचा भाग आहे आणि भारत त्याच्या इच्छेनुसार येथे काहीही करू शकत नाही. भारत जे काही करत आहे, त्यामुळे सीमेविषयी दोन्ही देशांमधील वाद आणखी वाढू शकतो. पंतप्रधान मोदी यांच्या पूर्वेकडील दौर्‍याला आमचा विरोध आहे. आम्ही भारताकडे आमचा निषेधही व्यक्त केला आहे. भारताने उचललेल्या या पावलांमुळे प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर तणाव वाढणार आहे.

संपादकीय भूमिका

चीनने कितीही आकांडतांडव केला, तरी अरुणाचल प्रदेश भारताचाच भाग असून भारताचाच भाग रहाणार आहे, हे त्याने लक्षात ठेवावे !