मंदिरांमुळे उद्योगधंदे आणि लोककला यांचा झालेला विकास !

श्रीराममंदिर बांधकाम चालू असतांना काही बुद्धीप्रामाण्यवादी, राजकारणी यांनी सांगितले, ‘मंदिर बांधून काय होणार ? मंदिर बांधून नोकर्‍या मिळतात का ?’ मंदिराच्या संदर्भात असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते. मंदिराच्या आध्यात्मिक लाभासह अन्य अनेक लाभ मोठ्या प्रमाणात भारतीय समाज अनेक पिढ्या अनुभवत आहे. याविषयी या लेखातून अवगत करण्याचा हा प्रयत्न ! यातून मंदिरांनी त्या त्या प्रदेशात अस्तित्वाने कसे कार्य केले आहे ? याची माहिती मिळते.

१. तीर्थक्षेत्री येणारा भक्त-भाविक हाच तेथील उत्पादनांचा ग्राहक आणि प्रचारक

ज्या तीर्थक्षेत्री आणि अन्य ठिकाणी भाविक, भक्त अन् सामान्यजन जातात, त्याच ठिकाणी स्थानिक उत्पादित होणार्‍या वस्तू, साहित्य, कापड यांची पुष्कळ खरेदी करत असे आणि आताही करतात. परिणामी संबंधित भागातील उद्योगधंद्यांचा विकास होतो, अनेक दुकानदार नावारूपाला येतात, अनेक उत्पादने प्रसिद्ध होतात.

पूर्वीच्या काळी विज्ञापने नव्हती, सामाजिक माध्यमे नव्हती, दीडशे वर्षांपूर्वी तर वर्तमानपत्रेही नव्हती; मात्र लोक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी येऊन कपडे, वस्तू आणि अन्य गृहोपयोगी वस्तू त्यांतील वैशिष्ट्ये जाणून खरेदी करत होते. त्याचप्रमाणे त्या वैशिष्ट्यांचा स्वतः मौखिक प्रसार करून नातेवाईक, मित्रमंडळी आणि स्वत:च्या परिसरातील लोक, शेजारी यांना सांगत असत. परिणामी याद्वारे त्या उत्पादनाचा प्रसार अधिकाधिक होऊन जेव्हा संबंधित लोक तीर्थक्षेत्रांना भेटी देत, तेव्हा तेथील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू, साहित्य, कपडे खरेदी करत असत.

२. वाराणसीमध्ये हस्तकला आणि मिठाईला प्रसिद्धी

श्री. यज्ञेश सावंत

‘वाराणसी म्हणजे काशी हे हिंदु धर्मियांसाठी आयुष्यात एकदा तरी तीर्थक्षेत्री जाऊन यावे’, असे श्रद्धास्थान आहे. लाखो भाविक प्रत्येक दिवशी वाराणसी येथे भेट देतात. येथे येणार्‍या भाविकांचा राबता असल्यामुळे काशीनगरी नेहमी गजबजलेली असते. या ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या सिल्कच्या बुट्टीदार पिशव्यांचे उत्पादन होते आणि लोक त्या मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. सोने आणि चांदी यांच्या धाग्यांसह रेशीमच्या उत्पादनासाठी काशी प्रसिद्ध झाले आहे. रेशमी बनारसी साड्या, शालू यांना पुष्कळ मागणी असून त्यांचा खपही अधिक आहे, तसेच येथे चटई विणकाम केंद्र सिद्ध झाले असून लाकडी खेळणी, काचेच्या बांगड्या आणि पितळेच्या वस्तू यांचे उत्पादन होते.

काशीला गेलेली व्यक्ती तांब्याच्या वस्तूमध्ये गंगाजल घेऊन येते, अशी प्रथा आहे. असे कितीतरी लोक घेऊन येतात ? या सर्वांना तांब्याच्या वस्तू, पितळेच्या वस्तू उपलब्ध करण्यासाठी त्या वस्तू बनवण्याचे उद्योग विकसित झाले. या उद्योगांमधून अंगठ्या, लॉकेट, समया, पूजेची अन्य भांडी सिद्ध करण्याचे उद्योग चालू झाले. वाराणसी येथे येणार्‍या लाखो लोकांचा पाहुणचार तेथील प्रसिद्ध मिठाया, दूधाचे पदार्थ आणि चाटचे प्रकार यांद्वारे केला जाई. परिणामी वाराणसी येथे मिठाईचे शेकडो प्रकार आहेत आणि त्या एकाहून एक चांगल्या असतात.

३. द्वारकेमुळे बुट्टीदार आणिनक्षीकामाच्या पिशव्यांना मागणी

द्वारकेत बुट्टीदार आणि नक्षीकाम केलेल्या अनेक आकार अन् प्रकारांतील पिशव्या, तोरणे, कपडे यांचा धंदा नावारूपाला आला आहे. द्वारका येथे येणार्‍या लाखो भाविकांमुळे ही उत्पादने भारतात सर्वदूर पसरली आहेत. अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणच्या दुकानांमध्ये ही उत्पादने आपल्याला आढळतात. यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. येथील बहुतांश दुकानांमध्ये ही उत्पादने अधिकाधिक आकर्षक स्वरूपात दिसतात.

४. तमिळनाडूतील कांजीवरम साड्यांना देशभरात मागणी

दक्षिणेत विशेषत: तमिळनाडूमध्ये कांचीपूरम्, मदुराई येथे उत्पादित होणार्‍या कांजीवरम (कांचीपूरम्) रेशमी साड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या साड्यांना वर्ष २००५-२००६ मध्ये भारत सरकारने अधिकृतरित्या ‘भौगोलिक चिन्ह’ म्हणून मान्यता दिली आहे. कांचीपूरम् येथे या साड्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. या साड्यांना तमिळनाडू सरकारच्या वतीने राज्याचे उत्पादन म्हणून विकले जाते. कांचीपूरम् या तमिळनाडू येथील मंदिरांच्या राजधानीचे शहर (अधिक संख्येत मंदिरे असणारा प्रदेश) असल्यामुळे येथे वर्षभर भाविक-भक्तांची वर्दळ असते. दर्शनाला आलेल्या भाविकांमुळेच खरे तर या साड्यांची विक्रमी विक्री होते. भाविक महिला, मुली किमान एकतरी साडी समवेत घेऊन जातात. या भाविकांमुळेच या व्यवसायाला चालना मिळाली आहे, हे दिसून येते. विणकाम कला खरेतर यामुळे टिकून राहिली आहे.

महाराष्ट्रातील शक्तीपीठांपैकी तुळजाभवानीदेवी, महालक्ष्मीदेवी, रेणुकादेवी आणि सप्तश्रुंगीदेवी यांना प्रत्येक भक्त साडीचोळी, खण-नारळ अर्पण करतोच. देवीला अर्पण करण्यासाठी चांगल्या दर्जाच्या रेशमी साड्यांची खरेदी केली जाते. या साड्या मिळण्यासाठी त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यातून साडी उद्योग तेजीत आहे. देवीला अर्पण केलेल्या साड्यांना विशेष मागणी असते.

रामनाथी (गोवा) येथे नऊवारी साड्या अर्पण करतात, धोतर अर्पण करतात. यातून देवाला ते वस्रदान देत असल्यामुळे धोतर, नऊवारी साडी यांचा प्रकार टिकून रहाणार आहे. तो कालबाह्य होणार नाही. यातून मंदिरातील एका कृतीमुळे एक प्रकारे संस्कृती टिकून रहाण्यासही साहाय्य होते.

५. मदुराईला सोन्याची बाजारपेठ

मदुराई येथे जगप्रसिद्ध मीनाक्षीदेवीचे मंदिर आहे. येथे अशी प्रथा निर्माण झाली आहे की, देवीचे दर्शन घेतल्यानंतर थोडेतरी सोने म्हणजे सोन्याचा अलंकार, वस्तू देवीचा प्रसाद म्हणून घरी घेऊन जायचे. परिणामी मदुराईसारख्या शहरात सोन्याची १ सहस्रांहून अधिक दुकाने आहेत, म्हणजे प्रत्येक ४ दुकानांनंतर १ सोन्याच्या दागिन्याचे दुकान आहे. यामुळे सोन्याचा व्यवसाय वाढला नाही तर नवल ! एका मंदिराने सोन्याच्या व्यापार्‍याला, उद्योगाला चालना दिली आहे. सहस्रो कारागिरांना काम मिळाले आहे, लाखोंचे पोटपाणी अवलंबून आहे.

६. शिर्डीमुळे शाली आणि येवल्याच्या पैठणी यांना मागणी

शिर्डीला गेल्यावर साईबाबांना अर्पण करण्यासाठी भक्त शालीची खरेदी करतो. या शाली, चादरी यांची मागणी, त्यांचे उत्पादन त्यामुळे साहजिकच मोठ्या प्रमाणात वाढते. भारतातील भक्तांची संख्या आणि मिळणारे अर्पण यांमध्ये शिर्डी देवस्थान आघाडीवर आहे. येथे येणारे भाविकच अनेक उत्पादनांची विक्री वाढण्यासाठी कारणीभूत ठरले आहे. त्यामध्ये एक म्हणजे शिर्डीजवळ असलेल्या नाशिक येथील येवला पैठणी ! या पैठणीची भूरळ हिंदु महिला, मुली यांना आहेच; मात्र तिच्या प्रसाराचे मुख्य कारण बनले आहे, ते शिर्डी येथे येणारे भाविक आणि भक्त ! आज मात्र जगाच्या कानाकोपर्‍यात पैठणीचा प्रसार झाला आहे.

अशाच प्रकारे सोलापुरी चादरी, कांबळे (ब्लँकेट) यांचा व्यवसाय खरे तर तुळजापूर येथे येणारे देवीभक्त, पंढरपूर येथे येणारे वारकरी यांच्यामुळे वाढला आहे.

७. कोलकात्याला हस्तीदंती बांगड्यांचा व्यवसाय तेजीत !

कोलकात्याला गेल्यावर तेथे पांढर्‍या आणि लाल शंख पोळ, हस्तिदंती बांगड्या प्रसिद्ध आहेत. या बांगड्या घालणे, हे दैवी शक्तीचे प्रतीक मानले जाते. कोलकात्याला महाकालीदेवी प्रसिद्ध आहे. बांगड्या या दैवी ऊर्जेचे वाहक असल्यामुळे या बांगड्या, म्हणजे कोलकात्यामध्ये हिंदु स्त्रीच्या अविभाज्य आभूषणांपैकी एक आहे. परिणामी हिंदु धार्मिक प्रतीक म्हणून मान्यता पावल्याने कोलकाता येथे गेलेली प्रत्येक भाविक महिला या बांगड्या खरेदी करण्यासाठी उत्सुक असते. त्यामुळे केवळ कोलकात्यापुरता किंवा बंगालपुरता बांगड्या मर्यादित न रहाता भारतभरात गेल्या.

८. शेतकर्‍यांचा विकास

मंदिरांमध्ये अभिषेक, प्रसाद बनवणे यांसाठी दूध आणि दुधाचे पदार्थ लागतात. देवाला महाप्रसादाचा भोग चढवण्यासाठी फळे, भाज्या लागतात. अनेक प्रकारची फुले, पाने प्रतिदिन लागत असतात. ही मागणी अर्थातच शेतकरी पूर्ण करत असतो. त्यामुळे यातून एक प्रकारे शेतीमालाला मागणी वाढते. शेतकर्‍याला आर्थिक लाभ होऊन अनेक कुटुंबांचे पोषण होते.

९. कलांचा विकास मंदिरांमुळेच !

पूर्वी वेगळे व्यासपीठ किंवा कार्यक्रम सादर करण्यासाठी वेगळी व्यवस्था नव्हती. राजदरबारी किंवा मंदिराच्या ठिकाणीच कलाकाराला कलेचे सादरीकरण करावे लागे. मंदिरांमध्ये मोठी सभागृहे होती. कलांचे सादरीकरण मंदिरातच व्हायचे आणि कलाकाराच्या कलागुणांचा सन्मान व्हायचा, तर श्रोतुवर्गाला कलेच्या माध्यमातून दैवी ऊर्जेचा अनुभव यायचा. परिणामी कलांचा विकास, जोपासना आणि कला जतन करणे शक्य झाले.

१०. बांधकाम व्यवसाय तेजीत

तीर्थक्षेत्री भक्तांच्या निवासासाठी अनेक धर्मशाळा, खोल्या, उपाहारगृहे, हॉटेल्स यांची बांधकामे करावी लागतात. त्यातून त्यातून बांधकाम व्यवसाय तेजीत येतो. भक्तांसाठी अनेक व्यवस्था उभाराव्या लागतात.

११. देवतांच्या उत्सवांच्या वेळी कोट्यवधींची उलाढाल !

प्रत्येक देवतेचा मुख्य उत्सव, जत्रा असते. काही उपउत्सवही असतात. तेथे सहस्रो, लाखो भक्त जमतात. त्या वेळी लोक कोट्यवधींची उलाढाल होते. मंदिरांमुळेच अठरापगड जातीचे लोक एका छताखाली एकत्र येतात. सामाजिक समरसतेचे यापेक्षा अन्य उदाहरण असू शकते का ?

१२. मंदिरांमुळे पर्यटन उद्योग वाढीस

मंदिरांना भेट दिल्यावर भाविक, भक्त आसपासच्या ठिकाणांनाही सहकुटुंब भेटी देतात. तेथे मुक्काम करतात. परिणामी पर्यटन उद्योगही आपोआपच वाढीस लागतो.

सरकारला १ सहस्र, १० सहस्र आणि त्याहून अधिक नोकर्‍या देणार्‍या आस्थापनांचे कौतुक वाटते. येथे लाखो लोकांची आणि त्यांच्या कुटुंबांचे पिढ्यान्‌पिढ्या पालनपोषणाचे दायित्वच निभावणार्‍या मदिरांवर कुदृष्टी का असते ? काशी, महाकालेश्वर येथे सुसज्ज मार्ग (कॉरिडॉर) बनवणे, ‘मंदिराचा जीर्णाेद्धार करण्याऐवजी ते पैसे गरिबांना द्या’, असे म्हणणार्‍यांना मंदिरांद्वारे चाललेले अफाट कार्य, म्हणजे  चपराकच आहे. मंदिरे भक्त, भाविक यांचा उदरनिर्वाह करण्यास सक्षम आहेत, हेच खरे !

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (२४.२.२०२४)


मंदिरांमुळे मूर्तीकला, शिल्पकला, चित्रकला टिकून रहाणे

श्रीराममंदिरातील शिल्पकला

देवाच्या मूर्तीसाठी कपडे, दागिने सिद्ध करणे यांचे परंपरागत उद्योग आहेत. शिल्पकला, मूर्तीकला याही मंदिरांशी निगडित असल्याने त्या मंदिरांमुळेच टिकून राहिल्या आहेत. लाखो लोकांना पिढ्यान्‌पिढ्या व्यवसायही उपलब्ध झाला आहे. देवतांचे चित्रे सिद्ध करण्याची, म्हणजे अनेक प्रकारांतील चित्रकलाही टिकून राहिली आहे आणि त्या कलाकारांचे पोटपाणीही यातून सांभाळले जात आहे.

पूजाविधीतील संस्कृत मंत्र आणि देवतांचे गुणगान करणारी संस्कृत श्लोक, स्तोत्रे यांमुळे संस्कृत भाषा अनेक युगे टिकून राहिली आहे.

– श्री. यज्ञेश सावंत


मूर्ती घडवणार्‍या राजस्थानी संगमरवरी कलेचा विकास

मंदिरांतील नक्षीकामाचे प्रातिनिधीक छायाचित्र

राजस्थानमध्ये मूर्ती घडवणे, मंदिरे उभारणे यांसाठी आवश्यक तो संगमरवरी दगड, लाल दगड उपलब्ध आहे. मूर्ती आणि मंदिरांतील नक्षीकाम यांसाठी त्यांची आवश्यकता भासल्याने असे कौशल्य असणार्‍या कलाकारांच्या कलागुणाचा विकास होण्यास हातभार लागला. आतातर पुष्कळ प्रसिद्धी मिळाली आहे. ही कला खरे तर मंदिरांमुळेच टिकून आहे. स्थापत्य कला ही पिढ्यान्‌पिढ्या अनेक घरांमध्ये आढळून येते.

– श्री. यज्ञेश सावंत