Rooh Afza : हमदर्द लॅबोरेटरीज’ने ‘रूह अफजा’ सरबतच्या नावाखाली रसायन विकले !

ढाका दक्षिण सिटी कॉर्पोरेशनच्या तपासणीचा निष्कर्ष !

नवी देहली – ‘हमदर्द लॅबोरेटरीज’चे ‘रूह अफजा’ सरबत भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश येथे मोठ्या प्रमाणात विकले जाते. या संदर्भात बांगलादेशातील ढाका दक्षिण सिटी कॉर्पोरेशनने (डी.एस्.सी.सी.ने) केलेल्या तपासणीत या आस्थापनाने लोकांना फळांच्या रसाऐवजी रसायन विकल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच ‘हमदर्द लॅबोरेटरीज’ आस्थापन चोरीच्या प्रकरणी दोषी आढळले असून त्याला दंडही ठोठावण्यात आला आहे. डी.एस्.सी.सी.ने बाजारातून रूह अफजाचे नमुने गोळा केले होते, ज्याच्या तपासणीनंतर हे तथ्य समोर आले आहे. दुसरीकडे ‘हमदर्द’चा दावा आहे, ‘३६ प्रकारची फळे रूह अफजा बनवण्यासाठी वापरली जातात आणि १३ इतर हर्बल घटक जोडले जातात.’ ‘ब्लिट्झ’ या नियतकालिकाने या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.

१. ढाका दक्षिण सिटी कॉर्पोरेशनला असे आढळले की, हमदर्द खोटे दावे करून लोकांना मूर्ख बनवत आहे आणि त्यांचे मानसिक अन् भावनिक शोषण करत आहे. हमदर्द लॅबोरेटरीज रूह अफजामध्ये १३ हर्बल औषधे आणि ३६ प्रकारची फळे आणि फुले यांचा रस असल्याचा दावा करते. हे सरबत म्हणजे ‘पौष्टिक पेय’ असून ‘ते प्यायल्याने शरियातील निर्जलीकरण (डीहाड्रेशन) रोखले जाते’ असा दावा करते. प्रत्यक्षात उल्लेख केलेले घटक सरबतमध्ये नाहीत.

२. याखेरीज अहवालात आरोग्य तज्ञांच्या हवाल्याने म्हटले आहे की, रूह अफजा मोठ्या संख्येने लोकांसाठी, विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांसाठी गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकते.

३. बांगलादेशातील हमदर्दचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. हकीम महंमद युसूफ हारून भुईया यांनी रूह अफझाच्या विज्ञापनाविषयी लेखी क्षमा मागितली आहे.

४. या वादावरून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी ‘हमदर्द प्रयोगशाळा बांगलादेशा’ने ढाका येथील अधिकार्‍यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांनंतर ‘हमदर्द’ने क्षमा मागितली. यानंतर बांगलादेशातील महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी २० फेब्रुवारी या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि अन्न विभाग यांच्याकडे तक्रार प्रविष्ट (दाखल) केली.

संपादकीय भूमिका

‘रूह अफजा’ भारतातही विकले जाते, तर येथेही संबंधित यंत्रणांनी त्याच तपासणी करणे आवश्यक आहे !