Sri Lanka Housing Project : श्रीलंकेचे राष्ट्रपती विक्रमसिंघे यांच्या हस्ते तेथील तमिळी हिंदूंसाठी घरे बांधण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ !

भारताचेही आभार मानले

श्रीलंकेचे राष्ट्रपती विक्रमसिंघे

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी १९ फेब्रुवारी या दिवशी ‘इंडिया-लंका’ या भारतीय गृहनिर्माण प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचा शुभारंभ केला. श्रीलंकेतील तमिळी कामगारांसाठी भारताने दिलेल्या अनुदानाच्या सहाय्याने १० सहस्र घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. प्रकल्पाच्या शुभारंभाच्या वेळी भारतीय उच्चायुक्त संतोष झा हेही उपस्थित होते. या प्रकल्पाच्या अंतर्गत १० जिल्ह्यांत १ सहस्र ३०० घरे बांधण्यात येणार आहेत.

या वेळी राष्ट्रपती विक्रमसिंघे म्हणाले, ‘‘आमच्या सरकारने देशातील अल्पसंख्य तमिळ समुदायाच्या आर्थिक आणि सामाजिक अधिकारांचे रक्षण करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. भारत या प्रकल्पासाठी उदार साहाय्य करत आहे. मी भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. गृहनिर्माण प्रकल्पाचे प्राथमिक उद्दिष्ट कामगारांना घरे उपलब्ध करून देणे आणि त्याद्वारे त्यांना सक्षम करणे, हा आहे.’’

श्रीलंकेत तामिळ लोक राजकीय अधिकारांपासून वंचित आहेत !

श्रीलंकेत भूमी आणि घरे नसल्यामुळे भारतीय वंशाच्या हिंदु तमिळ समुदायाची गैरसोय होत आहे. श्रीलंकेतील तमिळी जनतेला राजकीय अधिकारांपासून वंचित ठेवले जाते. मे २०१७ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी श्रीलंका दौरा केला होता. त्या वेळी या तमिळींसाठी १० सहस्र घरे बांधून देण्याची घोषणा केली होती.