सोलापूर येथील ‘हिंदुस्थानी कॉवेनंट चर्च हायस्कूल’ या इंग्रजी शाळेचा संतापजनक प्रकार
सोलापूर – येथील ‘हिंदुस्थानी कॉवेनंट चर्च हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाने’ इंग्रजी माध्यमातील इयत्ता ९ वी आणि ५ वी मध्ये शिकत असलेल्या ४ विद्यार्थ्यांना दुसर्या सत्राचे शुल्क भरण्यास विलंब झाल्याने त्यांना चाचणी परीक्षेस बसू न देता वर्गाबाहेर काढले. या विद्यार्थ्यांनी या संदर्भात पालकांना सांगितल्यावर पालकांनी याचा जाब प्राचार्यांना विचारला, तसेच उर्वरित शुल्कही भरले. याचा राग मनात धरून शाळेने पोलिसांकडे तक्रार केली. यामुळे पोलीस संबंधित पालक आणि ४ विद्यार्थी यांना ‘पोलीस गाडीत’ बसवून सदरबझार पोलीस ठाण्यात घेऊन गेले. येथे त्यांची चौकशी करून सोडून देण्यात आले.
या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या संपूर्ण घटनेचा खुलासा करण्याची नोटीस लवकरच महाविद्यालयात देण्यात येणार आहे, अशी माहिती सोलापूर महापालिकेचे प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संजय जावीर यांनी दिली आहे. या संदर्भात काही स्थानिक नागरिकांनी आरोप केले आहेत की, या शाळेत एका महिला पोलीस अधिकार्याची मुले शिकतात. त्या महिला अधिकार्याने स्वत:च्या अधिकाराचा चुकीचा वापर करत शाळेत पोलीस गाडी पाठवून पालक आणि विद्यार्थ्यांना गाडीत बसवून पोलीस ठाण्यात आणले.
झालेला प्रकार चुकीचा असून या संदर्भात चौकशी समिती नेमली असून अहवाल आल्यावर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. या संदर्भात शाळा व्यवस्थापनाने ‘शुल्क भरण्यास नकार दिला म्हणून असा कोणताही प्रकार आम्ही केला नाही, तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून वंचित ठेवलेले नाही’, असा खुलासा केला आहे.