रत्नागिरी – सूक्ष्म लघु मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या पुढाकाराने १९ आणि २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत २ दिवसांचा ‘रत्नागिरी औद्योगिक महोत्सव’ जलतरण तलाव, साळवी स्टॉप येथे आयोजित करण्यात आला आहे.
नवउद्योजकांसह ‘पीएम् विश्वकर्मा योजने’चा लाभ स्थानिकांना मिळवून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते १९ फेब्रुवारी या दिवशी या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिली.
या वेळी केंद्रीय उद्योग मंत्रालयाचे निर्देशक राहुलकुमार मिश्रा म्हणाले, ‘‘या कार्यक्रमाला एम्.एस्.एम्.ई. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित रहाणार आहेत. एम्.एस्.एम्.ई. मंत्रालयाच्या विविध योजनांविषयी, तसेच त्यांना सरकारच्या पीएम् विश्वकर्मा योजनेची जनजागृती करून देणे आणि योजनेचा लाभ घेणे, हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. या प्रदर्शनादरम्यान ६० कक्षांचे प्रदर्शन असून येथील उद्योजक त्यांची उत्पादने प्रदर्शित करतील.
२० फेब्रुवारीला एम्.एस्.एम्.ई.द्वारे विक्रेता विकास कार्यक्रमही आयोजित केला जाईल. ज्यामध्ये हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल कॉर्पाेरेशन, कोकण रेल्वे आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम सहभागी होतील. तांत्रिक सत्रादरम्यान, प्रत्येक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामधील (PSU मधील) वरिष्ठ अधिकारी त्यांच्या संस्थेची विक्रेता नोंदणी प्रक्रिया समजावून सांगतील आणि तांत्रिक सत्रादरम्यान त्यांच्या आवश्यकताही स्पष्ट करतील. कार्यक्रमादरम्यान उद्योजकांची ई-मार्केट प्लेस नोंदणीही केली जाईल.’’