|
रत्नागिरी – पुणे येथील गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या वतीने सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशीलाच्या आधारे विविध जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्याने विविध विकास निर्देशांकाविषयी प्रथम क्रमांक नोंदवला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील समारंभात जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याला केंद्रशासनाचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. अनंत नागेश्वरन् उपस्थित होते.
जिल्ह्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि पायाभूत विकासाची शास्त्रशुद्ध पद्धतीने नोंद करून त्याआधारे सिद्ध करण्यात आलेल्या ‘जिल्हा निर्देशांक’ अहवालाचे मुंबईत प्रकाशन करण्यात आले. जिल्हा सामाजिक आणि आर्थिक समालोचन आधारावर ५४ निर्देशांकाची माहिती येथील जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडे मागवण्यात आली होती. त्यामध्ये विशेषतः एक सहस्र व्यक्तींमध्ये जिल्ह्यात असणार्या रस्त्यांची लांबी, पक्क्या घरांची संख्या, बँकांची संख्या याविषयीचे निकष होते. या माहितीच्या आधारावर गोखले अर्थशास्त्र संस्थेने जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण केले होते.
निर्देशांकांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करू ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह
पुरस्काराला उत्तर देतांना जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह म्हणाले की, जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आपल्या सर्वांसाठी हा सन्मान अभिमानास्पद आहे. रत्नागिरी जिल्हा पुरस्कार मिळविणार्या ८ जिल्ह्यांपैकी एक आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाशिवाय राज्यस्तरावर अव्वल स्थानावर उभे रहाणे शक्य नव्हते. मला निश्चिती आहे की, पुढील वर्षी या निर्देशांकांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी आम्ही सर्व जण आमच्या धोरणात आणखी प्रगती करू.