वर्ष २०१९ मध्ये श्रीमती अश्विनी प्रभु (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) या स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन या प्रक्रियेसाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) या पूर्णवेळ साधना करणार्यांची प्रक्रिया घेतात. या प्रक्रियेच्या वेळी श्रीमती अश्विनी प्रभु आणि अन्य साधक यांच्याकडून झालेल्या चुका आणि मनाची प्रक्रिया यांचे प्रसंग त्यांनी सांगितल्यावर सौ. सुप्रिया माथूर यांनी त्यांना पुढील दृष्टीकोन दिले. श्रीमती अश्विनी प्रभु यांना या प्रक्रियेतून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
८ फेब्रुवारी या दिवशी या सूत्रांचा काही भाग आपण पाहिला. आज पुढील भाग पाहूया.
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/762667.html
(भाग २)
४. प्रसंग – ‘साधनेचे प्रयत्न होत नसतांना आपल्या साधनेचा आढावा घेतला जाऊ नये’, असे वाटणे
४ अ. दृष्टीकोन
१. ‘साधनेचे प्रयत्न होत नसतात, त्या वेळी आपला उत्साह अल्प असतो. साधनेत मनाचा सहभाग पुष्कळ असला पाहिजे. मनात उत्साह असला, तर प्रत्येक कृती योग्य वेळीच होते. मनाच्या स्थितीचा परिणाम कृतीवर होतो आणि सवलत घेणे, चालढकलपणा अन् निरुत्साह वाढतो.
२. उत्साह वाढवण्यासाठी दिवसभरात ५ वेळा आत्मनिवेदन करावे. सतत अनुसंधानात राहिल्यास चैतन्य आणि उत्साह वाढतो अन् तत्परतेने कृती करता येते. कृतीला भावाचे प्रयत्न जोडून प्रत्येक कृती केल्यास त्यातून साधना होते.
३. मनुष्य व्यावहारिक जीवनात पुष्कळ आशावादी असतो. अनेकदा विफल झाला, तरी तो प्रयत्न सोडून न देता पुनःपुन्हा प्रयत्न करतो. साधनेतसुद्धा हा भाग वाढला पाहिजे. जीवन हे संपूर्णतः प्रारब्धावर अवलंबून असते; परंतु योग्य क्रियमाणाचा वापर केल्यास प्रारब्ध सुसह्य होते. त्यासाठी सर्व प्रारब्धाच्या विचारांचाही आध्यात्मिक दृष्टीनेच विचार केला पाहिजे.
४. आपण पूर्णवेळ साधना करण्यासाठी संसार सोडतो. इतका त्याग केल्याचे फळ आपल्याला मिळणारच आहे; परंतु ते मिळवण्याची गती वाढवली पाहिजे. आपल्या क्षमतेवरच केवळ निर्भर न रहाता ईश्वरावर निर्भर राहिलो, तर उत्साह आणि तत्परता येते.
५. प्रसंग – कृतीच्या स्तरावरील चुका पुनःपुन्हा होणे
५ अ. दृष्टीकोन
१. मनाच्या कोणत्या अयोग्य विचारामुळे चुकीची कृती होते, याकडे लक्ष द्यावे. ‘मन एकाच वेळी अनेक विचार करत असते. ते कोणत्या विचारात आहे ? साधनेनुसार कार्यरत झाले आहे कि अनावश्यक विचारांत आहे ?’, याकडे लक्ष दिले पाहिजे. विचारप्रक्रिया लिहिली पाहिजे. मनातील विचारांकडे लक्ष दिल्याविना त्यावर साधनेचे संस्कार करणे शक्य नाही. मनाकडे लक्ष नसल्यास कितीही सेवा, कार्य केले, तरी परिपूर्णता येत नाही.
२. आपण कुठेही आणि काहीही करत असलो, तरी प्रक्रिया सगळीकडे सारखीच चालली पाहिजे. आश्रमात असतांना सर्व कृती व्यवस्थित आणि शिस्तबद्ध करतो. बाहेर किंवा घरी गेल्यावर स्वच्छंद, दोषपूर्ण स्वभाव दिसून येतो; कारण आश्रमात दाखवण्यासाठी प्रयत्न करत असतो. घरी कोणतेच बंधन नसल्याने प्रक्रिया थांबते. तसे होऊ नये; म्हणून मनाकडे सतत लक्ष दिले पाहिजे.
३. परात्पर गुरुदेवांनी मन अर्पण करण्यासाठीच व्यष्टी साधना सांगितली आहे, तरीही ‘आपल्याकडून कृतीच्या स्तरावर प्रयत्न का होत नाहीत ?’, हे शिकायचे असेल, तर मनात येणार्या विचारांविषयी चिंतन झालेच पाहिजे. काही समजले नाही, तर इतरांचे साहाय्य घ्यावे.
६. प्रसंग – घरी गेल्यावर स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेकडे दुर्लक्ष होणे
६ अ. दृष्टीकोन : आश्रमात असतांना आपण स्वतःला साधनेचे बंधन घालून प्रयत्न करतो. घरी गेल्यावर तसे करत नाही. त्यामुळे स्वभावदोषांची तीव्रता वाढते आणि पुन्हा उफाळून येणार्या स्वभावदोषांची तीव्रता न्यून करण्यासाठी वेळ अधिक लागतो. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या केलेल्या प्रयत्नांवरही परिणाम होतो. प्रक्रियेत खंड पडल्यामुळे अधिक श्रम घ्यावे लागतात. त्यासाठी सातत्य ठेवण्याला अधिक महत्त्व द्यावे.’
(क्रमश:)
– श्रीमती अश्विनी प्रभु, मंगळुरू. (१३.७.२०१९)
भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/763286.html