वर्ष २०१९ मध्ये श्रीमती अश्विनी प्रभु (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) या स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन या प्रक्रियेसाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) या पूर्णवेळ साधना करणार्यांची प्रक्रिया घेतात. या प्रक्रियेच्या वेळी श्रीमती अश्विनी प्रभु आणि अन्य साधक यांच्याकडून झालेल्या चुका अन् मनाची प्रक्रिया यांचे प्रसंग त्यांनी सांगितल्यावर सौ. सुप्रिया माथूर यांनी त्यांना पुढील दृष्टीकोन दिले. श्रीमती अश्विनी प्रभु यांना या प्रक्रियेतून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
(भाग १)
१. प्रसंग – परिस्थितीला दोष देणे
१ अ. दृष्टीकोन
१. ‘परिस्थिती कशीही असो, त्यात संयमच महत्त्वाचा असतो.
२. परिस्थिती सांगून क्षमायाचना करणे, हेसुद्धा एक प्रकारे स्पष्टीकरणच आहे.
३. साधनेत ‘मी कुठे न्यून पडलो ?’, याचा विचार करण्याचा प्रयत्न वाढला पाहिजे.
४. ‘परिस्थिती पालटायला हवी होती’, या विचारापेक्षा ‘त्या परिस्थितीत काय करायचे ?’, असा विचार करणे, ही साधना आहे.
५. ‘परिस्थितीत अडकून न रहाता, निर्माण झालेली ती परिस्थिती साधनेसाठीच आहे’, ही जाणीव अधिक झाली पाहिजे.
२. प्रसंग – बुद्धीला पटूनही परिस्थितीचा स्वीकार न होता प्रतिक्रिया येणे आणि त्यावर स्पष्टीकरण दिले जाणे
२ अ. दृष्टीकोन
१. आपल्याला स्वभावदोष निर्मूलनामध्ये स्वयंसूचना ५० टक्के आणि कृतीच्या स्तरावरील प्रयत्न ५० टक्के साहाय्य करतात.
२. समर्थनासह क्षमायाचना करणे काही उपयोगाचे नाही. ईश्वराला सर्वांची परिस्थिती ठाऊक आहे. साधकाची भक्ती, श्रद्धा आणि तळमळ यांनुसार ईश्वर त्यांना परिस्थितीचा स्वीकार करण्यासाठी अन् शिकण्यासाठी साहाय्य करतो.
३. त्यामुळे इतरांनी सांगितलेले ऐकणे, तसे प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करणे आणि प्रायश्चित्त घेणे आवश्यक आहे.
३. प्रसंग – सहनशीलता नसल्याने मनाविरुद्ध होताच कटकट वाटणे
३ अ. दृष्टीकोन
१. मनाविरुद्ध होताच सांगणार्याची कटकट वाटते आणि आपल्याला ते सहन होत नाही. अशा वेळी मनाला साधकत्वाची सवय लावली पाहिजे. आपल्या मनाविरुद्ध झाल्यावर लगेच नकारात्मक विचार आणि प्रतिक्रिया येऊ लागतात. ‘मला साधना उत्तम करायची आहे’, असा विचार असूनही प्रयत्न नसल्याने मनाची सिद्धता होत नाही आणि ‘आपल्यावर बंधन आहे’, असे वाटते.
२. प्रयत्नांमध्ये सवलत न घेता सतत शिकण्याच्या आणि जाणून घेण्याच्या स्थितीत असावे. त्यात स्वतःमध्ये पालट करण्याची तळमळ अधिक असली पाहिजे.
३. अयोग्य विचार आल्यावर त्यात योग्य पालट केला पाहिजे. पालटण्याची कृती न करता केवळ विचारातच राहिलो, तर परिणाम होत नाहीत.
४. कटकट वाटल्यास शिक्षापद्धतीचा उपयोग करावा. त्यासाठी कुठे कुठे अशा प्रकारचे विचार, प्रतिक्रिया येते आणि कटकट वाटते, याविषयी प्रती २ घंट्यांनी एकदा चिंतन करणे अपेक्षित आहे.’
देवाच्या कृपेमुळेच ही सूत्रे शिकता येत आहेत. त्याविषयी गुरुचरणी कृतज्ञता.
(क्रमश: उद्याच्या अंकात)
– श्रीमती अश्विनी प्रभु, मंगळुरू.