Uttarakhand Encroachment Demolished : हल्द्वानी (उत्तराखंड) येथील अनधिकृत मदरसा प्रशासनाने पाडला !

मशीद हटवण्याचाही आदेश !

हल्द्वानी (उत्तराखंड) – येथील जिल्हा प्रशासनाने अतिक्रमणावर कारवाई करतांना बांभूळपुरा पोलीस ठाण्याच्या सीमेमध्ये असणार्‍या सरकारी भूमीवर बांधलेला मदरसा पाडला. याखेरीज तेथे असणारी मशीद हटवण्याचा आदेश दिला. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. प्रशासनाचे म्हणणे आहे की, अब्दुल मलिक नावाच्या व्यक्तीने सुमारे १ एकर सरकारी जागेवर अतिक्रमण केले होते. मशीद बांधण्याच्या नावाखाली तो येथील भूमी विकण्याचा व्यवसाय करत होता.

समाजवादी पक्षाच्या मुसलमान नेत्याचा विरोध झुगारून कारवाई !

कारवाई केली जात असतांना समाजवादी पक्षाचे नेते मतीन सिद्दीकी त्यांच्या समर्थकांसह निषेध करण्यासाठी तेथे पोचले. या वेळी प्रशासकीय अधिकार्‍यांशी त्यांची वादावादी झाली. महापालिका आयुक्त आणि नगर दंडाधिकारी यांनी त्यांचा विरोध झुगारून मरदशावर कारवाई केली. तसेच पुढील २ दिवसांत मशीद हटवण्यास सांगून सध्या नमाजपठणासाठी जागा सोडली. प्रशासनाने जागा नियंत्रणात घेऊन कुंपण करून जागा सरकारच्या मालकीची असल्याचे फलक लावले आहेत.

पूर्वीही येथे अतिक्रमणांवर करण्यात आली होती कारवाई !

काही महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने या जागेवर असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली होती. आता पुन्हा मशीद आणि मदरसा यांच्या नावाखाली या भूमीवर पुन्हा अतिक्रमण केले गेले होते. (एकदा कारवाई केल्यानंतर तेथे पुन्हा अतिक्रमण होत असतांना प्रशासन काय करत होते ? एकदा अतिक्रमण करणार्‍यांवर कठोर कारवाई झाली असती आणि भूमीचे संरक्षण करण्यात आले असते, तर पुन्हा अतिक्रमण झाले नसते. हे प्रशासनाला कळत नाही का ? – संपादक)

कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही. अतिक्रमण करणार्‍यांना स्वतःहून सरकारी जागा मोकळी केल्यास चांगलेच, अन्यथा प्रशासन कठोर कारवाई करील ! – जिल्हाधिकारी वंदना सिंह 

संपादकीय भूमिका

  • अशी कारवाई देशातील प्रत्येक अनधिकृत मदरसे, मशिदी, दर्गे आणि थडगे यांच्यावर केली पाहिजे. यासाठी हिंदूंनी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यावर दबाव निर्माण केला पाहिजे !
  • अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला विरोध करणार्‍या कायदाद्रोह्यांना अटक करून कारागृहात डांबले पाहिजे !
  • अनधिकृत बांधकामे होईपर्यंत प्रशासन झोपलेले असते का ?