Karnataka Hanuman Flag Removed : पोलिसांनी १०८ फूट उंच फडकणारा हनुमान ध्वज उतरवला !

  • मंड्या (कर्नाटक) येथील केरागाडू गावातील घटना

  • विरोध करणार्‍या गावकर्‍यांवर केला लाठीमार !

  • भाजप संपूर्ण राज्यात आंदोलन करणार !

हिंदू कार्यकर्त्यांकडून ध्वज हिसकावताना कर्नाटक पोलीस (डावीकडे) कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (उजवीकडे)

मंड्या (कर्नाटक) – मंड्या जिल्ह्यातील केरागोडू गावामध्ये हिंदूंनी अर्पण गोळा करून १०८ फूट उंच खांबावर लावलेला श्री हनुमानाचे चित्र असलेला भगवा ध्वज कर्नाटक पोलिसांनी बलपूर्वक उतरवला. याला हिंदूंनी विरोध केला असता पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केल्याची घटना २७ जानेवारीच्या रात्री घडली. या गावात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण कर्नाटकात उमटत आहेत.

१. गावातील रंगमंदिराजवळ ध्वज असलेला हा खांब लावला होता. यासाठी ग्रामपंचायतीची अनुमतीही घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र गावातील काही लोकांना ते आवडले नाही आणि त्यांनी त्याविरोधात तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे मंड्याच्या प्रशासनाने २७ जानेवारीला रात्रीच्या वेळी खांबावरील ध्वज हटवला. या वेळी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला होता. विरोध करणार्‍या गावकर्‍यांवर लाठीमार करण्यात आला.

२. २८ जानेवारीला सकाळी येथील वातावरण तणावपूर्ण बनले होते. ध्वज काढण्यात आल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी केरागोडू बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ग्रामस्थांनी काँग्रेसचे स्थानिक आमदार रवींद्र कुमार यांचे फलक फाडून निषेध केला. काही लोकांनी या संपूर्ण प्रकरणामागे रवींद्र कुमार यांचाच हात असल्याचा आरोप केला आहे.

३. येथे उपस्थित असलेले बजरंग दल, भाजप आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे कार्यकर्ते निदर्शने करत आहेत आणि भगवा ध्वज पुन्हा लावण्याची मागणी करत आहेत.

कर्नाटकातील सर्व जिल्ह्यात आंदोलन करणार ! – भाजप

भाजपचे नेते आणि हिंदु संघटनांचे कार्यकर्ते यांनी हनुमान ध्वज काढून टाकल्याचा तीव्र निषेध केला आहे. भाजपचे नेते आर्. अशोक यांनी राज्यातील काँग्रेस सरकारच्या कृतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत हनुमान ध्वज ग्रामपंचायतीच्या मान्यतेने फडकावल्याचा युक्तीवाद केला. या प्रकरणी आम्ही कर्नाटकातील सर्व जिल्ह्यात आंदोलन करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रध्वज फडकवण्याची अनुमती घेऊन भगवा ध्वज फडकावण्यात आला ! – मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा आरोप

मुख्यमंत्री सिद्धरामय्या या घटनेविषयी म्हणाले की, जिथे तिरंगा फडकावला जातो तिथे भगवा ध्वज फडकावणे नियमांच्या विरोधात आहे. राष्ट्रध्वज फडकावण्याची अनुमती घेण्यात आली होती; मात्र तेथे दुसरा ध्वज फडकावण्यात आला. यामागे राजकारण असू शकते. मला ठाऊक नाही यामागे कोण आहे ? हा देश लोकशाही आणि राज्यघटना यांच्यानुसार चालतो. एका ठिकाणी अनुमती दिल्यास इतर ठिकाणीही अशी स्थिती लागू होईल. उद्या ‘जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भगवा ध्वज फडकावा’, असेही म्हणू शकतात, त्यासाठी अनुमती देता येईल का ? आम्ही आमच्या तरुणांना दुखावण्यासाठी येथे आलो नाही. मी अधिकारी, पोलीस आणि तरुण यांच्याशी बोललो आहे. आम्ही खासगी ठिकाणी किंवा मंदिराजवळ हनुमान ध्वज लावण्यासाठी सिद्ध आहोत. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. आम्हीही रामभक्त आहोत.

संपादकीय भूमिका

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंनी टिपू सुलतानच्या राजवटीत रहात असल्याचे अनुभव प्रतिदिन येऊ लागले आहेत. काँग्रेसला मत देऊन हिंदूंनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतल्याचा हा परिणाम आहे. आता अशा घटनांना राज्यभरातील हिंदूंनी संघटित होऊन विरोध करत राहिल्यावरच सरकारवर दबाव निर्माण होईल !