ACB Seized 100Crores TelanganaOfficial : सरकारी अधिकारी शिव बालकृष्ण यांच्याकडून तब्बल १०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त !

  • ‘तेलंगाणा रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी’चे सचिव आहेत बालकृष्ण

  • लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाडी घातल्यानंतर अटक

शिव बालकृष्ण यांच्या घरावरील धाडीत जप्त करण्यात आलेली मालमत्ता

भाग्यनगर (तेलंगाणा) – तेलंगणामधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ‘तेलंगाणा रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी’ (तेलंगाणा भूमी खरेदी-विक्री नियामक प्राधिकरण) या सरकारी विभागाचे सचिव शिव बालकृष्ण यांच्या घरावर धाडी घातली. या वेळी त्यांच्या घराच्या परिसरातून तब्बल १०० कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता जप्त करण्यात आली. शिव बालकृष्ण आणि त्यांच्या नातेवाइक यांची घरे अन् कार्यालये यांसह २० ठिकाणी धाडी घालण्यात आल्या. या वेळी बालकृष्ण यांना अटक करण्यात आली.

१. या वेळी ४० लाख रुपये रोख, २ किलो सोने, ६० महागडी घड्याळे, १४ स्मार्टफोन, १० लॅपटॉप आणि स्थावर मालमत्तेशी संबंधित अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली.

२. या सर्वांची किंमत १०० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

३. बालकृष्ण यांच्या घरातून नोटा मोजण्याचे यंत्रही जप्त करण्यात आले आहे.

४. बालकृष्ण हे ‘हैदराबाद महानगर विकास प्राधिकरणा’चे संचालकही राहिले आहेत.

५. भूमीच्या खरेदी-विक्रीशी संबंधित व्यवसाय करणार्‍या अनेक आस्थापनांना ‘परमिट सुविधा’ देऊन त्यांनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत.

संपादकीय भूमिका

  • भ्रष्टाचारातून एवढी अवाढव्य रक्कम जमा होईपर्यंत पोलीस आणि अन्वेषण यंत्रणा झोपल्या होत्या का ? त्यामुळे या प्रकरणी आता केवळ बालकृष्ण यांचीच नव्हे, तर त्यांचे वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी, मंत्री आणि पोलीस अधिकारी यांचीही चौकशी झाली पाहिजे ! त्यांच्यापैकी ज्यांच्याकडे अशा प्रकारची संपत्ती सापडेल, त्या सर्वांना अटक करून आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !