|
अयोध्येतून ‘सनातन प्रभात’चे विशेष वार्तांकन
श्री. नीलेश कुलकर्णी, विशेष प्रतिनिधी, सनातन प्रभात
अयोध्या, २१ जानेवारी (वार्ता.) – गेल्या ५०० वर्षांपासून हिंदू ज्या क्षणाची वाट पहात होते, तो क्षण आता अवघ्या काही घंट्यांवर येऊन ठेपला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी या दिवशी श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या वेळी उत्तरप्रदेशचे मुख्ममंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी देशभरातून निमंत्रित अनेक साधू, संत, विविध आखाड्यांचे श्रीमहंत, महंत, महामंडलेश्वर पीठाधीश्वीर आणि मान्यवर यांचे अयोध्यानगरीत आगमन झाले आहे. या वेळी भव्य श्रीराममंदिराचेही उद्घाटन होणार आहे. श्रीरामाची नवी मूर्ती याच मंदिरात विराजमान होणार आहे. या मंदिराच्या उभारणीमुळे असंख्य कारसेवकांनी दिलेले बलीदान सार्थकी लागल्याची भावना श्रीरामभक्तांनी व्यक्त केली आहे. एकूणच या सोहळ्यामुळे अयोध्यानगरीत २२ जानेवारीला सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला जाणार आहे.
अशी सजली आहे अयोध्यानगरी !१. अयोध्यानगरीच्या प्रवेशद्वारावरच भाविकांच्या स्वागतासाठी सुर्यदेवाची मूर्ती असलेली भव्य कमान लावण्यात आली आहे. सप्तअश्वांवर विराजमान सुर्यदेवाची ही भव्य मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. श्रीराम रघुवंशीय असल्याने त्याचे प्रतीक म्हणून ही मूर्ती येथे बसवण्यात आली असल्याचे या वेळी सांगण्यात आले. २. कमानीतून आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूंनी रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतींवर रामायणातील विविध प्रसंगांची शिल्पे कोरण्यात आली आहेत. ३. रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकांवर दिव्यांचे अनेक खांब उभारण्यात आले आहेत. हे खांब अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने सजवण्यात आले आहेत. प्रत्येक खांबावर पिवळ्या रंगातील सुर्याची प्रतिकृती बसवण्यात आली आहे. याखेरीज या खांबावर श्री हनुमंताची गदा कोरण्यात आली असून त्याच्या वरच्या बाजूला ‘जय श्रीराम’ अशी अक्षरेही कोरण्यात आली आहेत. या खांबांसह रस्त्याच्या दुतर्फा, तर्सच प्रत्येक चौकाची झेंडूच्या आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे. ४. अयोध्येतील प्रत्येक चौक, प्रत्येक दुकान, प्रत्येक ठिकाण, तसेच घराघरांवर भगवे झेंडे लावण्यात आले असून त्यावर भगवान श्रीरामाचा आणि श्रीराममंदिराचे छायाचित्र आहे. ५. सरकारने मंदिरापासून दूरपर्यंत ठिकठिकाणी ध्वनीक्षेपक यंत्रणा लावली असून त्यावर श्रीरामाची गीते लावण्यात येत आहेत. ६. या सर्वांमुळे अवघी अयोध्यानगरी राममय झाली असून प्रत्येकालाच आता श्रीरामाच्या आगमनाची ओढ लागली आहे. ७. सर्वांच्या मुखी केवळ आणि केवळ ‘जय श्रीराम’ची घोषणा आहे. |
श्रीरामजन्मभूमीकडे जाणारे रस्ते फुलांनी सजवले !
श्रीरामजन्मभूमीकडे जाणारा मुख्य रस्ता काही किलोमीटरपर्यंत फुलांच्या माळांनी सजवण्यात आला आहे. मार्गावरील झाडांवरही फुलांच्या माळा लावण्यात आल्या आहेत. या मार्गावर प्रभु श्रीराम, माता सीता, श्री हनुमान, लक्ष्मण, ऋषी वाल्मिकी यांच्या आकर्षक भव्य मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. या मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
श्रीरामजन्मभूमीकडे जाणार्या रस्त्यांवर आकर्षक नक्षीदार कमानी लावण्यत आल्या असून त्यावर वीजेची रोषणाई करण्यात आली आहे. यासह ठराविक अंतरावरील खांबांवर श्रीरामाचे उभे चित्र (कटआऊट) लावण्यात आले आहेत.
सर्वसामान्य भाविकांसाठी २ दिवस दर्शन बंद !
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य भाविकांसाठी २१ आणि २२ जानेवारी या दिवशी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. २३ पासून भाविकांना पुन्हा नेहमीप्रमाणे दर्शन घेण्यात आले आहे.
मोठा पोलीस बंदोबस्त !
संपूर्ण अयोध्येतच प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अयोध्येच्या प्रवेशद्वारापासून पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसून येत आहे. चौकाचौकांत तात्पुरते अडथळे (बॅरेकेड्स) लावून वाहनांची तपासणी केली जात आहे. केवळ पास असणारी वाहने आणि व्यक्ती यांनाच पुढे पाठवले जात आहे. सर्वज ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. राज्य, तसेच केंद्रीय पोलीस दलांचीही मोठ्या प्रमाणात सशस्त्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
अयोध्येत श्री रामललाचे अवतरण, ही जणू रामराज्यरूपी हिंदु राष्ट्र्राचीच नांदी !त्रेतायुगात रावणाचा वध करून प्रभु श्रीराम अयोध्येत परतले आणि कलियुगात हिंदूंनी ५०० वर्षांच्या केलेल्या प्रदीर्घ संघर्षानंतर आज रामलला श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिरात विराजमान होत आहेत. त्रेतायुगात अयोध्यावासियांनी प्रत्यक्ष सगुण रूपातील श्रीराम पाहिले, तर कलियुगातील, म्हणजे सध्याचे आपण सर्व श्रीरामभक्त निर्गुण स्वरूपातील श्रीरामतत्त्व अनुभवत आहोत. त्रेतायुगात प्रभु श्रीराम परतल्यानंतर रामराज्य अवतरले, त्याचप्रमाणे अयोध्येत श्रीरामललाचे अवतरण ही जणू रामराज्यरूपी हिंदु राष्ट्राचीच नांदी आहे. येथे आलेले साधू-संतसुद्धा हेच सांगत आहेत. याचीच अनुभूती सध्या अयोध्येतील प्रत्येक हिंदू घेत आहे. |