अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरच श्रीरामाचे मंदिर होण्यासाठी भक्तांनी केलेला त्याग !

श्री रामलला तंबूमध्ये असल्याने २३ वर्षे अविवाहित रहाणारे आणि चपला न घालणारे बिहारचे देबू दास !

देबू दास

किशनगंज (बिहार) येथील देबू दास या रामभक्ताने २३ वर्षे चपला घातल्या नाहीत. ते वर्ष २००१ मध्ये अयोध्येत श्रीरामजन्मभूमीच्या दर्शनासाठी गेले होते. तेथे त्यांनी श्री रामललाला तंबूमध्ये ठेवल्याचे पाहिल्यावर ‘जोपर्यंत येथे श्रीराममंदिर बांधले जाणार नाही, तोपर्यंत अविवाहित राहीन आणि पायांमध्ये चपला घालणार नाही’, अशी शपथ घेतली. तेव्हापासून ते अविवाहित असून अनवाणीच फिरत होते. आता श्रीराममंदिराचे उद्घाटन होत असल्याने ते श्री रामललाचे दर्शन घेतल्यानंतर चपला घालणार आहेत. देबू दास यांनी सांगितले की, श्रीरामाच्या कृपेने गेल्या २३ वर्षांत माझ्या पायामध्ये कधीही काटा रुतला नाही !


श्रीराममंदिरासाठी अयोध्येतील सूर्यवंशी समाजाने ५०० वर्षे पगडी परिधान केली नाही !

५०० वर्षांनंतर पगडी घातलेले सूर्यवंशी समाजातील नागरिक

अयोध्येपासून १५ कि.मी. अंतरावर असणार्‍या सरायवंशी गावातील सूर्यवंशी नागरिकांनी ‘जोपर्यंत श्रीराममंदिर बांधले जात नाही, तोपर्यंत डोक्यावर पगडी आणि पायामध्ये चामड्याच्या चपला घालणार नाही’, अशी शपथ ५०० वर्षांपूर्वी घेतली होती. त्यांच्या अनेक पिढ्यांनी श्रीराममंदिरासाठी बलीदान दिले आहे. या समाजाचे म्हणणे होते की, जर प्रभु श्रीराम त्यांच्या स्थानावर विराजमान होऊ शकत नसतील, तर आम्ही सुखासीन आयुष्य कसे जगू शकतो ?


अयोध्येत श्रीराममंदिर बांधेपर्यंत विवाह न करण्याची ३१ वर्षांपासून शपथ घेतलेले भोपाळ येथील भोजपाली बाबा !

भोजपाली बाबा

भोपाळ (मध्यप्रदेश) येथील रवींद्र गुप्ता उपाख्य भोजपाली बाबा यांनी श्रीराममंदिर बांधल्याविना विवाह न करण्याचा संकल्प केला होता. वर्ष १९९२ मध्ये बाबरी ढाचा पाडण्याच्या वेळी भोजपाली बाबा अयोध्येत गेले होते. त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षी ‘अयोध्येत श्रीराममंदिर बांधल्याखेरीज विवाह करणार नाही’, अशी शपथ घेतली होती. घरच्यांनी त्यांना विवाहासाठी अनेकदा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी नकार दिला. आज त्यांचे वय ५२ वर्षे आहे. गेल्या ३१ वर्षांपासून सनातन धर्माच्या रक्षणासाठी विविध हिंदु संघटनांमध्ये ते कार्यरत आहेत. भोजपाली बाबांनी विवाह न करता उर्वरित आयुष्य सनातन धर्माला समर्पित करण्याचा निर्णय घेतला होता.


श्रीराममंदिरासाठी ३१ वर्षे मौनव्रत पाळणार्‍या धनबाद (झारखंड) येथील सरस्वतीदेवी !

सरस्वतीदेवी

रांची (झारखंड) – अयोध्येत २२ जानेवारीला श्रीराममंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना होत आहे. श्रीराममंदिरासाठी गेल्या ३१ वर्षांपासून झारखंडच्या धनबाद येथील ८५ वर्षीय सरस्वतीदेवी मौनव्रत पाळत आहेत. श्रीराममंदिराच्या उद्घाटनासाठी त्या अयोध्येला पोचल्या आहेत. येथे त्या त्यांचे मौनव्रत सोडणार आहेत. सरस्वतीदेवी यांच्या कुटुंबियांनी सांगितले की, वर्ष १९९२ मध्ये बाबरी ढाचा पाडल्यापासून त्या शांत झाल्या होत्या. त्यांनी शपथ घेतली होती, ‘जेव्हा श्रीराममंदिर बांधले जाईल, तेव्हाच मौनव्रत सोडणार.’ महंत नृत्य गोपाल दास यांच्या प्रेरणेने त्यांनी मौनव्रत पाळले आहे. त्या अयोध्येत ‘मौनीमाता’ या नावाने प्रसिद्ध आहेत. त्या आमच्याशी हातवारे करून बोलत असतात. काही सांगायला अवघड असेल, तर त्या लिहून सांगतात.