कोल्हापूर – वाहतूकदारांनी जो संप पुकारला आहे, त्याला पाठिंबा देत शाळेत जाणार्या बसचालकांनी बस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘शाळा बसचालकांनी संपात सहभागी होऊ नये; अन्यथा प्रसंगी कारवाई करण्याविषयी विचार करावा लागेल’, अशी चेतावणी शालेय शिक्षणमंत्री श्री. दीपक केसरकर यांनी दिली आहे. ते कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलत होते. संपामुळे अनेक पंपांवर इंधन उपलब्ध होत नसल्याने शाळा बस रस्त्यावर धावणार नाहीत, असे शाळा बसचालकांनी सांगितले. ही गोष्ट शाळा बसमालकांनी संबधित शाळेस कळवली आहे.
मंत्री दीपक केसरकर पुढे म्हणाले, ‘‘नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असे कुणीही वागू नये. मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करण्यात येणार आहे.’’