७५ टक्के जंतूसंसर्ग झाल्यावर औषधोपचारांच्या समवेत सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर बरे वाटल्याची साधिकेला आलेली अनुभूती !

स्वतःवर संकट येणार असल्याची साधिकेला स्वप्नाद्वारे मिळालेली पूर्वसूचना !

सौ. भाग्यश्री भार्गव वझे

‘मी शौचालयाच्या टाकीत पडण्याचा प्रसंग घडल्यानंतर मला आठवले, ‘त्याच दिवशी, म्हणजे ५.६.२०२३ या दिवशी पहाटे मला स्वप्नात दिसले, ‘मी माझ्या धाकट्या बहिणीच्या समवेत पायरहाटाद्वारे (टीप) पाणी लाटण्यासाठी (वर काढण्यासाठी) विहिरीच्या मध्यभागी लाकडी फळ्यांवर बसले होते. तेव्हा मी तिला म्हणाले, ‘‘आपण दोघी विहिरीत पडू शकतो.’’ नंतर मला जाग आली आणि मी तोंड धुऊन या स्वप्नाविषयी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून) आत्मनिवेदन केले; पण त्या वेळी ‘स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी प्रार्थना करायला हवी’, हे माझ्या लक्षात आले नाही. नंतर १ घंट्याने फुले काढत असतांना मी शौचालयाच्या टाकीत पडले. यावरून ‘गुरुदेवांनी मला या घटनेची पूर्वसूचना दिली होती’, असे माझ्या लक्षात आले.

टीप – पायरहाट म्हणजे मातीच्या लोट्यांच्या माळेद्वारे विहिरीतून पाणी काढले जाते. हे लोटे क्रमाने भरून वर येतात अन् रिकामे होऊन खाली जातात. रहाटाने पाणी काढतांना हात आणि पाय यांचा क्रम चुकल्यास तोल जाऊन विहिरीत पडण्याची शक्यता असते.’

– सौ. भाग्यश्री भार्गव वझे (४.८.२०२३)

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. बागेतील फुले काढत असतांना शौचालयाच्या टाकीवरील कडप्पा तुटून ५ फूट खोल असलेल्या शौचालयाच्या टाकीत पडणे आणि कुटुंबियांनी टाकीतून बाहेर काढणे

‘५.६.२०२३ या दिवशी सकाळी ८ वाजता मी घराच्या जवळ असलेल्या बागेतील फुले काढत होते. मी नेहमीप्रमाणे शौचालयाच्या टाकीवरील कडप्प्यावर उभी राहून कर्दळीची फुले काढली. नंतर मी तेथून निघतांना टाकीच्या मध्यभागी येताच कडप्पा तुटला आणि मी साधारणतः ५ फूट खोल असलेल्या शौचालयाच्या टाकीत पडले. तेव्हा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतांना मी त्यातील पाण्यात बुचकळले. मी टाकीत पडतांनाचा आवाज ऐकून अनुमाने ५० फुटांच्या अंतरावरून माझा पुतण्या श्री. विजयानंद लगेच तिथे आला. तेव्हा त्याने समयसूचकतेने लगेच माझा मोठा मुलगा महेश्वर याच्यासह सर्व कुटुंबियांना बोलावले. नंतर त्यांनी शौचालयाच्या टाकीत शिडी उभी करून मला बाहेर काढले आणि मला अंघोळ घातली. त्या वेळी मला धाप लागल्याने श्वास घेण्यास त्रास होत होता. त्या वेळी मी मनातल्या मनात ‘गुरुदेवांच्याच कृपेमुळे मी वाचले !’, असे म्हणत होते.

२. श्वास घेण्यास त्रास होऊ लागणे आणि कुटुंबियांनी आग्रहपूर्वक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेणे

त्यानंतर आमचे कौटुंबिक (फॅमिली) आधुनिक वैद्य डॉ. जयंत भिडे यांनी माझी तपासणी करून मला ३ ‘इंजेक्शन्स’ दिली. ते मला म्हणाले, ‘‘पुढील उपचारांसाठी रत्नागिरीतील रुग्णालयात चला !’’ त्या वेळी मी रुग्णालयात जाण्यास सिद्ध नव्हते. नंतर मला थोडे बरे वाटू लागले. संध्याकाळी मी शौचाला जाऊन आल्यावर मला परत श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. आमच्या शेजारी रहाणारे श्री. गौरव जोशी मला रुग्णालयात नेण्यासाठी चारचाकी गाडी घेऊन आले. तेव्हा मी सर्वांना सांगितले, ‘‘मी कुठेही जाणार नाही. मला बरे वाटण्यासाठी डॉ. भिडेच औषध देतील.’’

६.६.२०२३ या दिवशी सकाळी माझा धाकटा मुलगा श्री. गिरिधर रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातून आला. तो मला म्हणाला, ‘‘आई, आपण रत्नागिरीतील रुग्णालयात जाऊया !’’ तरीही मी त्याला ‘नाही’ म्हणाले. सर्वांनी मला आग्रहपूर्वक रुग्णालयात नेण्याची सिद्धता केली. प्रथम मला कोतवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

३. श्री साई मंदिरातील श्री. शरद वारेकर यांनी अंगारा आणि गंगेचे तीर्थ देणे

गावातील श्री साई मंदिरातील श्री. शरद वारेकर यांनी मला श्री साईबाबांचा अंगारा आणि पवित्र गंगानदीचे तीर्थ दिले, तसेच त्यांनी श्री साईबाबांच्या काही अनुभूती सांगून मला मानसिक अन् आध्यात्मिक आधार दिला.

४. रत्नागिरी येथील रुग्णालयात जातांना प्रार्थना आणि नामजप करणे अन् तेथे औषधोपचार चालू करणे

मी घरून रुग्णालयात जात असतांना नामजप करत होते. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केली, ‘गुरुदेवा, तुम्ही माझ्या समवेत या आणि तुम्हीच माझ्यावर सर्व उपचार करा !’ नंतर मला ‘सिलिंडर’द्वारे ‘ऑक्सिजन’चा पुरवठा करत चारचाकी गाडीतून रत्नागिरी येथील ‘चिंतामणि हॉस्पिटल’मध्ये नेण्यात आले. तिथे जाताच माझ्यावर अतीदक्षता विभागात उपचार चालू केले.

५. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी नामजपादी उपाय करण्यास सांगणे

गिरिधरने सद्गुरु गाडगीळकाकांना (सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना) संपर्क करून माझ्यासाठी नामजपादी उपाय विचारले. तेव्हा सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितले, ‘‘आई स्वतःसाठी नामजप करू शकत नाही. त्यामुळे तिच्यासाठी कुटुंबियांनी स्वतःच्या अनाहतचक्रावर हात ठेवून ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय । ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्री हनुमते नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप सतत करावा, तसेच एका हाताचा तळवा डोक्याच्या डाव्या भागावर, म्हणजे डाव्या कानाच्या वरच्या भागावर आणि दुसर्‍या हाताचा तळवा अनाहतचक्रावर ठेवून ‘निर्गुण’ हा नामजप ४ घंटे करावा.

६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या ३ साधकांनी प्रत्येकी १ घंटा ‘निर्गुण’ हा नामजप करावा आणि कुटुंबियांनी वेळेची वर्गवारी करून एकूण ४ घंटे नामजप पूर्ण करावा.’’

६. सद्गुरु गाडगीळकाकांची सूक्ष्मातून जाणण्याची अफाट क्षमता !

नंतर रुग्णालयातील डॉ. चेतन औरंगाबादकर यांनी महेश्वरला सांगितले, ‘‘रुग्णाच्या हृदयामध्ये ७५ टक्के जंतूसंसर्ग (इन्फेक्शन) झाला आहे. त्यामुळे रुग्ण बरा होण्याची निश्चिती नाही; पण आपण प्रयत्न करूया !’’ आधुनिक वैद्यांनी सांगितलेली माझी ही गंभीर स्थिती आरंभी सद्गुरु गाडगीळकाकांना कळवणे शक्य झाले नव्हते, तरीही ‘एक्स-रे’ काढल्यावर ज्या ठिकाणी जंतूसंसर्ग झाल्याचे निदान करण्यात आले होते, त्या ठिकाणी म्हणजे डोक्याच्या डाव्या भागात अन् श्वास घेण्याचा त्रास दूर होण्यासाठी हृदयावर (अनाहतचक्राच्या ठिकाणी) न्यास करून सद्गुरु काकांनी वरील नामजप करायला सांगितले. यावरून सद्गुरु काकांची सूक्ष्मातून जाणण्याची अफाट क्षमता लक्षात येऊन आमच्याकडून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

७. वैद्यकीय उपचार आणि सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेले नामजपादी उपाय यांमुळे बरे वाटणे

साधक आणि कुटुंबीय माझ्यासाठी प्रतिदिन नामजप करत होते आणि अतीदक्षता विभागात माझ्यावर वैद्यकीय उपचारही चालू होते. या दोन्हींचा परिणाम म्हणून ९.६.२०२३ या दिवशी डॉ. चेतन औरंगाबादकर यांनी महेश्वरला सांगितले, ‘‘आईच्या प्रकृतीत ८० टक्के सुधारणा झाली आहे. २ दिवसांनी आईला अतीदक्षता विभागातून बाहेर आणता येईल.’’ १२.६.२०२३ या दिवशी मी स्वतः १ – २ घंटे नामजप करू लागले. त्या दिवशी सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितले, ‘‘यापुढे इतरांनी आईसाठी नामजप करायला नको. आता आईने प्रतिदिन ३ घंटे ‘महाशून्य’ हा नामजप करावा.’’ १५.६.२०२३ या दिवशी रुग्णालयातून घरी पाठवतांना डॉ. चेतन औरंगाबादकर मला म्हणाले, ‘‘तुमच्या ‘एक्स-रे’चा अहवाल (रिपोर्ट) अपेक्षेपेक्षा अधिक चांगला आहे. हा तुमचा पुनर्जन्मच आहे.’’

रुग्णालयातून कोतवडे येथे घरी गेल्यावर मला पूर्वीच्या तुलनेत अधिक चांगले वाटले. अशा प्रकारे वैद्यकीय उपचार आणि सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेले नामजपादी उपाय यांमुळे मला बरे वाटले. त्यामुळे माझ्याकडून सद्गुरु डॉ. गाडगीळकाका आणि प.पू. गुरुदेव यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

‘गुरुदेवा, ‘मी तुमच्या कृपेमुळे या मृत्यूयोगातून वाचले आणि ही अनुभूतीही तुम्हीच माझ्याकडून लिहून घेतली’, याबद्दल मी तुमच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– सौ. भाग्यश्री भार्गव वझे (वय ६३ वर्षे), कोतवडे, जिल्हा रत्नागिरी. (४.८.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक