भारतीय जनता युवा मोर्चाकडून आंदोलन
थिरूवनंतपूरम् – यावर्षी मोठ्या संख्येने भाविक भगवान अय्यप्पा यांच्या शबरीमला मंदिराला भेट देत आहेत. मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने गोंधळ उडाला आहे. यात्रेकरूंनी मूलभूत सुविधा आणि सुरक्षा यांचा अभाव असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी भगवान अय्यप्पाच्या मंदिरात सुविधांचा अभाव असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. भाजपने शबरीमाला व्यवस्थापनातील त्रुटींच्या सूत्रावरून केरळ सरकारचा निषेध केला. भारतीय जनता युवा मोर्चाकडून आंदोलनकडून या वेळी आंदोलनही करण्यात आले.
मुख्यमंत्री विजयन् यांनी संबंधित अधिकार्यांना गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि भाविकांना आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी यंत्रणा सुनिश्चित करण्याचा आदेश दिला आहे. ६ डिसेंबरपासून भाविकांच्या संख्येत वाढ झाली असून प्रतिदिन ८८ सहस्र भाविक मंदिराला भेट देत आहेत. ‘गर्दी वाढल्यामुळे दर्शनाची वेळ एका घंट्याने वाढवण्यात आली आहे’, असे त्यांनी सांगितले.