सध्या केस गळण्याची समस्या ही सर्वत्र आढळणारी आहे. नेहमीप्रमाणे ‘केस गळत आहेत, तर अमुक तेल लावून बघ, मग तमुक औषध घेऊन बघ’, असे सल्ले दिले जातात; पण अपेक्षित परिणाम दिसला नाही की, निराशा येते. आजच्या लेखात आपण ‘केसांच्या समस्या का उद्भववतात ?’, ते जाणून घेऊया. या समस्येमागील कारणे टाळायचा सर्वप्रथम प्रयत्न केला, तरी ५० टक्के समस्या सुटतील. या समस्येवर औषधोपचार मात्र वैद्यांकडूनच करून घ्यावेत.
१. केस गळण्याची कारणे
याची अनेकविध कारणे आहेत. आपले कारण नेमके कोणते ते प्रत्येकाने अभ्यासायला हवे.
अ. डोक्याच्या त्वचेचा कोणता आजार झाला आहे का ? ते बघावे. डोक्यामध्ये पुष्कळ घाम येत असेल, नियमित डोके धुतले जात नसेल, डोक्यावरची त्वचा स्वच्छ रहात नसेल, तरी केस गळायला लागतात.
आ. केस रंगवण्यासाठी कृत्रिम रंगांचा वापर, डोके धुण्यासाठी विविध शाम्पू वापरणे इत्यादी. सध्या विविध विज्ञापनांना फसून विविध प्रकारचे महागडे शाम्पू घेण्याचे प्रस्थ वाढले आहे.
इ. शरिरातील ‘हार्मोन्स’चे (संप्रेरकांचे) असंतुलन होणे.
ई. विविध आजार असणे, उदाहरणार्थ जुना ताप, लठ्ठपणा, मधुमेह, रक्तक्षय, कुपोषण इत्यादींमुळे केस गळू लागतात.
उ. आहारात पुष्कळ मसालेदार पदार्थ आहारात असणे, आहारात जीवनसत्त्व ए आणि बी, तसेच प्रथिने अन् कॅल्शियम यांची कमतरता असणे.
ऊ. पुष्कळ खारट, आंबट, तुरट चवीचे पदार्थ खाणे. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास लोणचे आणि पापड अधिक प्रमाणात खाणे, विकत मिळणारे चिप्स, कुरकुरे पुष्कळ आंबट आणि खारट असतात. तरुणांमध्ये सर्रास हे पदार्थ आवडीने आणि अधिक प्रमाणात खाल्ले जातात.
ए. आहारात अधिक प्रमाणात मीठ घेणे, आंबवलेले पदार्थ असणे उदाहरणार्थ इडली, डोसा, ढोकळा, पाव, बिस्किटे इत्यादी.
ऐ. पुष्कळ जागरण करणे, मानसिक ताण तणाव, अतीप्रमाणात व्यायाम, अतीश्रम, उन्हात पुष्कळ फिरणे इत्यादींमुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते .
ओ. केसांना अजिबात तेल न लावणे, केसांना विविध रंग लावणे, केस आवळून बांधणे इत्यादी चुकीच्या सवयी केस गळण्याची समस्या वाढवतात.
प्रत्येक रुग्णामध्ये केस गळण्याचे कारण वेगवेगळे असते. त्यामुळे एकच औषध सरसकट सर्वांना लागू होत नाही, हे तर आपल्याला यातून स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे इथून पुढे तरी आपण महागडे शाम्पू आणि केसांना लावण्यात येणार्या विविध केमिकलयुक्त पदार्थांना फसणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.
२. केस न गळण्यासाठी करायचे उपाय
केस गळत असल्यास सर्वप्रथम आपल्या दिनचर्या आणि आहारात पालट करावा. जसे की,
अ. जेवणाच्या वेळा पाळाव्यात. जेवणात आठवड्यातून एकदा कडधान्ये भिजवून आणि शिजवून खावीत. प्रतिदिन १ वाटी वरण असायलाच हवे. त्यामुळे प्रथिने शरिरात जातात. पालेभाज्या आठवड्यातून १-२ वेळा खाव्यात; पण त्या शिजवूनच खाव्यात, सलाड स्वरूपात खाऊ नये. काकडी, कांदा, गाजर यांच्या २-४ फोडी आहारात असाव्यात.
आ. आवळा, नारळ, खजूर/खारीक, तीळ इत्यादींचा आहारात समावेश करावा. हिवाळ्यात आवर्जून आवळे, मोरावळा, च्यवनप्राश खावे.
इ. रात्रीचे जागरण टाळावे. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावे.
ई. प्रतिदिन नियमित व्यायाम आवश्यक आहे.
उ. डोक्याला आठवड्यातून किमान २ वेळा कोमट तेलाने मालिश करावे. ‘तेल कोणते लावावे ?’, हा प्रश्न सर्वांना असतो. आवळ्याचे तेल, खोबरेल तेल आणि भृंगराज तेल हे वापरू शकतो. तेल लावतांना ते केसांच्या मुळाशी योग्य पद्धतीने लागेल, असे लावून मालिश करावे. त्यामुळे रक्तप्रवाह योग्य पद्धतीने होऊन केस गळण्याचे प्रमाण उणावते. मसाज करतांना डोक्याच्या त्वचेवर जोराने घर्षण करू नये. याने केसांची मुळे नाजूक होऊन केस गळतात.
ऊ. केस धुतांना शिकेकाई, रिठा आणि त्रिफळा यांच्या काढ्याने धुवावेत. केस पुष्कळ तेलकट जाणवले, तर १५ दिवसांतून एकदा शाम्पू लावायला हरकत नाही. तो लावतांना पाण्यात मिसळूनच लावावा.
ए. केस हे कोमट वा थंड पाण्याने धुवावेत. गरम पाण्याने केस धुवू नयेत.
ऐ. आपल्या शरिरात कोणते जीवनसत्त्व अथवा खनिजे यांची कमतरता आहे, हे वैद्यांकडून जाणून घेऊन त्याप्रमाणे औषध घ्यावीत.
ओ. आयुर्वेदानुसार केस आणि हाडे यांचा जवळचा संबंध आहे. तेव्हा हाडे जेवढी चांगली तेवढे चांगले केस. ‘केसांच्या तक्रारी या कोणत्या दोषानुसार आहेत ?’, याचा अभ्यास करून शिरोधारा (कपाळावर तेल आणि काढा इत्यादी पदार्थांची धार सोडणे) , शिरोबस्ती (डोक्यावर काही काळ तेल धरून ठेवणे), बस्ती, रक्तमोक्षण (दूषित रक्त बाहेर काढणे) असे विविध उपचार रुग्णाच्या प्रकृतीनुसार केल्यास त्याचा लाभ होतो.
औ. केसांसाठी आयुर्वेदाची औषधे घेतांना ‘आपली प्रकृती कोणती ?’, ‘आपल्याला अन्य कोणते आजार आहेत का ?’, ‘वय’ आणि ‘किती दिवस औषध घ्यावे ?’, याचा विचार व्हायला हवा.
– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे (१२.१२.२०२३)