Sabarimala Temple Propaganda Exposed : शबरीमला मंदिराविषयी होणारे अपप्रचार खोडून काढणारा ‘मल्लिकापूरम्’ चित्रपट !

गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या ५४व्या आंतरराष्ट्रीय चिटपट महोत्सवाच्या निमित्ताने . . . 

‘मल्लिकापूरम्’ हा वर्ष २०२२ मधील मल्याळम् भाषेतील भारतीय चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णु शशी शंकर यांनी केले असून अभिलाष पिल्लई यांनी लिहिला आहे. या चित्रपटात उन्नी मुकुंदन्, बालकलाकार कुमारी देवा नंदा आणि कुमार श्रीपथ हे प्रमुख भूमिकेत आहेत. शबरीमला मंदिराविषयी होणारे अपप्रचार खोडून काढण्यासाठी हा चित्रपट बनवण्यात आल्याचे उन्नी मुकुंदन् यांनी सांगितले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा पुष्कळ चांगला प्रतिसाद मिळाला.

श्री. अश्विन गावकर, प्रतिनिधी, पणजी

‘मलिकप्पुरम’ मल्याळम चित्रपट

चित्रपटाची कथा ८ वर्षांच्या कल्लू (कुमारी देवा नंदा) नावाच्या मुलीभोवती फिरते. कल्लूला शबरीमला मंदिराला भेट देण्याची तीव्र इच्छा असते. तिला रात्री अय्यप्पा स्वामींची स्वप्ने पडतात. कल्लूचा चुलत भाऊ अप्पू (कुमार श्रीपथ) हाही तिच्याच वर्गात शिकत असतो. अनेक वेळा हट्ट केल्यावर कल्लूचे वडील तिला शबरीमलाला नेण्यासाठी सिद्ध होतात; परंतु मध्येच तिच्या वडिलांचा मृत्यू होतो. त्यानंतर एक दिवस कल्लू आणि अप्पू शाळेतून घरी परत जात असतांना दोघेही शबरीमलाला जाण्यास निघतात. त्याच गाडीत मुलींना पळवणारा एक गुंड तिच्या मागे लागतो आणि दोघा मुलांचे तिकीट काढून त्यांचा नातेवाईक असल्याचे वाहकांना सांगून फसवतो. कल्लू भोळी असल्याने तिला काही समजत नाही; पण अप्पूला त्या गुंडाचे वागणे आवडत नाही आणि तो बहिणीची काळजी घेतो.

चित्रपटातील एका दृश्यात डावीकडून कल्लू (कु. देवा नंदा), नायक (उन्नी मुकुंदन्) आणि अप्पू (कु. श्रीपथ)

शबरीमलापर्यंतच्या प्रवासात एक गृहस्थ (चित्रपटाचा मुख्य नायक उन्नी मुकुंदन् हा) बसमध्ये चढतो आणि मुलांना शबरीमलाला जाण्यास साहाय्य करतो. कल्लूला त्याच्यात अय्यप्पा स्वामींचे दर्शन होते. ‘अय्यप्पा स्वामी स्वतः लहान भक्ताच्या हाकेला धावून आला’, असे तिला वाटते. तो नायक मुलांना गुंडांपासून वाचवतो; पण ‘उशीर झाल्याने त्या दिवशी दर्शन घेणे शक्य नाही’, असे समजते. कल्लू अय्यप्पा स्वामींचे दर्शन घ्यायचा हट्ट करते. नायक मुलांना जंगलातून जाणार्‍या दुसर्‍या मार्गाने मंदिरात घेऊन जातो. याचा गुंडांना सुगावा लागतो आणि ते मुलांना जंगलात पकडण्याचा कट रचतात. जंगलात नायक गुंडांशी प्रतिकार करून मुलांना वाचवतो. त्या वेळी कल्लूला ‘तो अय्यप्पा स्वामीच आहे’, असे भासते. कल्लूला तो नायक भगवंताच्या पांढर्‍या शुभ्र वेशात, धोतर नेसलेला आणि हातात धनुष्य बाण घेऊन दुष्टांचा नाश करणार्‍या रूपात दिसतो. अशा प्रकारे नायक मुलांना शबरीमला मंदिरापर्यंत सुखरूप नेतो. तिथे गेल्यावर शेवटच्या १७ सोनेरी पायर्‍या जवळ आल्यावर तो मुलांना पुढे जाण्यास सांगतो आणि दिसेनासा होतो. मुले गर्दीत जरा हरवतात. तेव्हा कल्लू घाबरून मोठ्याने देवाला हाक मारते. तेव्हा नायक पुन्हा समोर येतो आणि तिला धीर देतो. ‘देवाला आर्ततेने हाक मारली की, देव लगेच येतो’, असे या दृश्यातून दाखवले आहे.

 (सौजन्य : Anto Joseph Film Company)

चित्रपटातील संगीत, दिग्दर्शन, अभिनय अप्रतिम आहे. चित्रपटातील दृश्यात मुले मंदिरात पोचतात, तेव्हा प्रेक्षकांना अय्यप्पा स्वामींचे दर्शन घेतल्याचा आनंद मिळतो आणि भाव जागृत होतो. चित्रपटानंतर प्रेक्षकांनी ‘मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतल्याचा अनुभव घेऊ शकलो’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. एक महिला मुख्य कलाकाराला अय्यप्पा स्वामी मानून पाया पडू लागली.