ललित पाटील याला कह्यात घेण्‍याचा पुणे पोलिसांचा मार्ग मोकळा !

न्‍यायालयाकडून ‘प्रॉडक्‍शन वॉरंट’ जारी !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – अमली पदार्थांची विक्री करणारा ललित पाटील हा ‘ससून’मधून पसार झाला होता. त्‍याला मुंबईतील साकीनाका पोलिसांनी बेंगळुरूमधून अटक केली होती. मुंबईतील न्‍यायालयाने ललितला ३० ऑक्‍टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आता पुणे पोलिसांनी ललितला अटक करण्‍याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून येथील न्‍यायालयाकडून ‘प्रॉडक्‍शन वॉरंट’ (गुन्‍हेगार कारागृहात असतांना अन्‍य पोलीस ठाण्‍याला अटक करायचे असल्‍यास न्‍यायालयाकडून अटकपत्र मिळवावे लागते, त्‍याला ‘प्रॉडक्‍शन वॉरंट’ म्‍हणतात) मिळवले आहे. त्‍यामुळे ललित पाटील याला कह्यात घेण्‍याचा पुणे पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे. ललितसह शिवाजी शिंदे आणि राहुल पंडित या आरोपींना कह्यात मिळावे, असेही अर्जामध्‍ये नमूद केले आहे.

या प्रकरणी ललितची मैत्रीण प्रज्ञा पाटील, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, विनय अहाना, अरविंदकुमार लोहरे, रेहान उपाख्‍य गोलू, अन्‍सारी यांना पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे. आता ललितला कह्यात घेतल्‍यानंतर सर्वांचे समोरासमोर अन्‍वेषण होईल. या अन्‍वेषणातून अमली पदार्थ विक्रीची यंत्रणा आणि गुन्‍ह्यातील घडामोडींचा उलगडा होण्‍याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे, तसेच त्‍यांना कुणीकुणी साहाय्‍य केले ? यात कुणाचा सहभाग आहे ? या सर्व गोष्‍टी स्‍पष्‍ट होण्‍याची शक्‍यता आहे.